लोकप्रिय मराठी अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस. अशोक सराफ यांनी अनेक माराठी आणि हिंदी चित्रपट, नाटक तसेच टिव्ही मालिकांमधून विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत.  आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटवला. विनोदी भूमिका सादर करतांनाचे त्याचे टायमिंग लाजवाब असे आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे मराठीतले सुपरस्टार आहेत. अशोक सराफ यांनी केवळ विनोदी धाटणीच्या भूमिका न करता गंभीर  आणि खलनायकी स्वरूपाच्या  भूमिका देखील केल्या आहेत.
मुंबईत जन्मलेले अशोक सराफ मुळचे बेळगावचे असून दक्षिण मुंबईच्या चिखलवाडी भागात त्यांचे बालपण गेले. सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड असलेल्या अशोक सराफ यांनी वयाच्या १८ व्या वर्षी शिरवाडकरांच्या ‘ ययाती आणि देवयानी ‘ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. त्यांनी काही संगीत नाटकांतूनदेखील भूमिका केल्या आहेत. मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अशोक सराफ यांना अभिनयाची अनेक पारितोषिके व पुरस्कार मिळविले आहेत.
पांडू हवालदार , कळत नकळत, भस्म, वजीर, चौकट राजा या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. त्याचप्रमाणे लक्ष्मीकांत बेर्डेबरोबरची त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली.  सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांबरोबर नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान, आई नंबर वन’ व ‘एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर’पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले.
अशोक सराफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येथे असलेल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा (ऑनलाईन कॉमेन्ट) या सुविधेचा वापर करा.

Story img Loader