राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता अतुल कुलकर्णीचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत आदराने घेतले जाते. या हरहुन्नरी कलाकाराचा आज ४९ वा वाढदिवस. कर्नाटकमधील बेळगावात जन्माला आलेल्या या गुणी कलाकाराने नानाविध भूमिका साकारून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली. शाळेतील दिवसांमध्ये अतुलने नाटकांमधून काम करत अभिनयाची आवड जोपासली. नंतर कॉलेजच्या दिवसात त्याने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला. शिकत असतानाच तो सोलापूरमधील ‘नाट्य आराधना’ या हौशी कलाकारांच्या ग्रुपमध्ये सामील झाला. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ नवी दिल्ली येथून अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेल्या अतुलला ‘हे राम’ (२०००) आणि ‘चांदनी बार’ (२००२) चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आत्तापर्यंत ७ भाषांमधून ६० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेल्या अतुलने अनेक मानसन्मान प्राप्त केले. हा संवेदनशील अभिनेता सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर आपल्या लेखांद्वारे आणि मुलाखतींमध्ये रोखठोक मते मांडतांना पाहायला मिळतो. ‘हे राम’, ‘चांदनी बार’, ‘खाकी’, ‘पेज ३’, ‘रंग दे बसंती’, ‘वळू’, ‘नटरंग’, ‘पोपट’, ‘एका प्रेमाची गोष्ट’सारख्या चित्रपटांमधून त्याने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. ‘हॅपी जर्नी’ या आगामी चित्रपटात तो प्रिया बापटबरोबर दिसणार आहे.
हॅपी बर्थडे अतुल!

Story img Loader