बॉलिवूडची ‘क्विन’ म्हणजेच कंगना राणावतचा आज वाढदिवस. बॉलिवूडमध्ये आपले नशिब आजमावण्यासाठी आलेल्या कंगना राणावतला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. तिच्या या खडतर प्रवासाला ‘क्विन’ चित्रपटाच्या रुपाने यशाचा मार्ग गवसला. ‘क्विन’ चित्रपटातील तिच्या भूमिकेने कंगनामधील अनभिज्ञ अशा अभिनेत्रीची चुणूक दाखवून दिली. या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेसाठी जवळजवळ सर्व पुरस्कार सोहळ्यातून तिने उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. समीक्षक आणि प्रेक्षकांनी तिच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले. खुद्द अमिताभ बच्चन यांनी कंगनाला पुष्पगुच्छ पाठवून तिचे कौतुक केले, तर बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखाने पहाटे तीनच्या सुमारास स्वत: तिच्या घरी जाऊन कंगनाला ‘क्विन’ चित्रपटासाठीचा उत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा पुरस्कार प्रदान केला. ‘क्विन’ चित्रपटाच्या यशानंतर कंगनाच्या घरी चित्रपट निर्मात्यांची लाईन लागली आहे. कंगनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, चित्रपट निवडताना कंगना योग्य निर्णय घेऊन येणाऱ्या काळात चाहात्यांना चांगल्या चित्रपटांची मेजवानी देईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.

Story img Loader