‘सो कुल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा आज वाढदिवस. मराठी चित्रपटांतून सशक्त भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणा-या सोनालीने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘दोघी’, ‘देऊळ,’ ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘मुक्ता’, ‘अगं बाई अरेच्चा-२’, ‘पुणे-५२’, ‘रिंगा रिंगा’ आदी मराठी चित्रपट तसंच ‘टॅक्सी नं- ९२११’, ‘दिल चाहता है’, ‘डरना जरूरी है’, ‘सिंघम’, ‘दिल विल प्यार व्यार’ या हिंदी चित्रपटांतूनसुद्धा तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. स्तंभलेखिका म्हणून सुध्दा सोनाली प्रसिध्द आहे.
२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल चाहता है’मधील सोनालीने साकारलेली पूजाची भूमिका प्रेक्षकांना आजही लक्षात आहे. हा चित्रपट आजही प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. एका मुलाखतीत सोनालीने तिची या चित्रपटासाठी निवड कशी झाली होती हे सांगितलं. ‘झोया अख्तरने या चित्रपटासाठी कलाकार निवडले होते. माझीसुद्धा तिनेच निवड केली. हा माझ्या कारकिर्दीतला महत्त्वाचा चित्रपट ठरला. कारण या चित्रपटाने मला बॉलिवूडमध्ये ओळख दिली. माझा संपूर्ण मेकओव्हर झाला. कसे कपडे घालावेत, कोणत्या रंगाचे कपडे वापरावेत, पर्स कोणती या छोट्या छोट्या गोष्टींबाबत मी सजग झाले,’ असं ती म्हणाली.
‘दिल चाहता है’मधील ‘वो लडकी है कहाँ’ हे गाणं सोनाली आणि सैफ अली खानवर चित्रीत झालं होतं. तेव्हाची गंमत सोनाली सांगते, ‘गाण्याची कोरिओग्राफी फराह खानने केली होती. गाण्याच्या स्टेप्स इतक्या मजेशीर होत्या की मलाच काय सेटवरील इतर लोकांनाही खूप हसू येत होतं. पण तेच गाणं आज संस्मरणीय झालं आहे.’
आठवणीतला वाढदिवस
‘दिल चाहता है’ चित्रपटात सैफ अली खानची गर्लफ्रेंड पूजाची भूमिका सोनालीने साकारली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवरच सोनालीचा वाढदिवस साजरा करण्याता आला होता. त्याबद्दल तिने सांगितलं, ‘आमिर, सैफ, अक्षय असे मोठे कलाकार या चित्रपटात होते. पण हे तिघंही अत्यंत विनम्र आहेत. त्यांच्यासोबत काम करताना ही गोष्ट मला सतत जाणवली. शूटिंगदरम्यान माझा वाढदिवससुद्धा साजरा झाला. त्यावेळी सगळ्यांनी माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. तो वाढदिवस आठवणीतला होता.’
सोनाली कुलकर्णी आगामी ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींची व्यक्तिरेखा साकारत आहे. हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.