मराठी मालिकांवर आपली छाप पाडणारी प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी आज २५वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेत वैनुडी वैनुडी करत कुहूची भूमिका करणा-या स्पृहा जोशीचा जन्म १३ ऑक्टोबर १९८९ रोजी झाला. बालमोहन विद्या मंदिरमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. तिला त्यासाठी बक्षिसेही मिळाली होती. शाळेत असताना तिला सर्जनशील लिखाणासाठीचा राज्य शासनाचा ‘बालश्री २००३’ हा पुरस्कारही मिळाला होता. स्पृहा पहिल्यांदा टीव्हीच्या पडद्यावर आली ती ‘दे धमाल’ या मालिकेमुळे. तेव्हा ती शाळेत असली तरी तिने साकारलेली हुशार मुलगी आजही अनेकांच्या स्मरणामध्ये आहे.
फोटो गॅलरीः स्पृहा जोशी लिखित ‘लोपामुद्रा’ काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा
रुईया कॉलेजच्या मिलिंद बोकील यांच्या गाजलेल्या ‘शाळा’ या कादंबरीवर आधारित ‘गमभन’ या एकांकिकेमध्ये तिने साकारलेले शिरोडकर हे पात्र चांगलेच गाजले. त्यानंतर तिने ‘युग्मक’, ‘अनन्या’ अशा एकांकिकांमध्ये उत्तम भूमिका साकारली आणि अनेक पारितोषिकेदेखील पटकावली. प्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या ‘चिरायू’ या लघुपटातही स्पृहाने काम केले होते. तिने लिहलेल्या ‘चांदणचुरा’ या काव्यसंग्रहासाठी तिला कवी ‘कुसुमाग्रज’ हा पुरस्कार मिळाला होता. काही दिवसांपूर्वीच ‘लोपामुद्रा’ हा तिचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला.
प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणारी स्पृहा झी मराठी वाहिनीवरील ‘अग्निहोत्र’, ‘उंच माझा झोका’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ व ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ इत्यादी मालिकांमध्ये चमकली. ‘उंच माझा झोका’मध्ये रमाबाई रानडेंची तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली आहे. याव्यतिरीक्त तिने ‘मोरया’, ‘मायबाप’ यांसारखे चित्रपट केले आहेत. आगामी ‘बायोस्कोप’ चित्रपटात ‘एक होता काऊ’ या कथेत ती झळकणार आहे. ‘स्वामी’ या मालिकेत मृणाल कुलकर्णीने साकारलेली रमा साकारण्याचे स्पृहाचे स्वप्न आहे. तसेच, भक्ती बर्वें, स्मिता पाटील, नीना कुलकर्णी, सुहास जोशी, रसिका जोशी, मुक्ता बर्वे यांच्यासारखं काम आपल्यालाही करता यावं अशी तिची इच्छा आहे.
आपल्या लाडक्या अभिनेत्रीला तुम्हीही खालील प्रतिक्रिया बॉक्समध्ये शुभेच्छा देऊ शकता.
(छाया सौजन्यः स्पृहा जोशी फेसबुक पेज)
स्पृहा जोशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेत वैनुडी वैनुडी करत कुहूची भूमिका करणा-या स्पृहा जोशीचा जन्म १३ ऑक्टोबर १९८९ रोजी झाला.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 13-10-2014 at 09:35 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday spruha joshi