नीलेश अडसूळ

नव्या लेखकांच्या कलाकृतींसाठी साधारण प्रायोगिक रंगभूमीचे व्यासपीठ खुले असते. कारण नवख्या लेखकाने लिहिलेला आशय व्यावसायिक रंगभूमीवर आणणे एकप्रकारची जोखीमच असते. त्यामुळे निर्माते-दिग्दर्शक सहसा या फंदात पडत नाही. परंतु दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर, राणी वर्मा या निर्मात्यांनी हे आव्हान पेलले आहे. प्रस्थापित लेखकांच्या मांदियाळीत, तेही एका नवख्या लेखिकेचे स्पर्धेतून निवडलेले नाटक त्यांनी थेट व्यावसायिक रंगभूमीवर आणले आहे. नाटक आहे ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’.

मराठी नाटक समूहातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नाटय़ लेखन स्पर्धेत ९० संहिता दाखल होत्या. त्यातून अंतिम फेरीत आलेल्या दहा एकांकिकांच्याच्या परीक्षणासाठी परीक्षक म्हणून माझी निवड करण्यात आली. त्यातून आम्ही पहिल्या तीन एकांकिका निवडल्या. परंतु प्रथम क्रमांक पटकावलेले नाटक माझ्या मनात घर करून होते. म्हणून मी पुढाकार घेऊन हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणायचे ठरवले, असे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी नाटकाविषयी बोलताना म्हणाले. तर प्रत्येक वेळी प्रथितयश कलाकार, मोठे लेखक असेच साचेबद्ध काम न करता कधी तरी असा वेगळा प्रयोगही करून पाहायला हवा, असेही ते सांगतात.

या नाटकात गेली पन्नास वर्ष रंगभूमीवर सातत्याने काम करणाऱ्या अभिनेत्री वंदना गुप्ते आणि हिंदी-मराठीत विविध भूमिकांमधून आपल्या अभिनयाचा वेगळा ‘पॅटर्न’ निर्माण करणाऱ्या अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांची चांगलीच गट्टी जमली आहे. ‘चारचौघी’ या नाटकानंतर बऱ्याच वर्षांनी दोघीही एकत्र काम करत आहेत. नाटकात वंदना गुप्ते यांनी आईची तर प्रतीक्षा लोणकर यांनी मुलीची भूमिका साकारली आहे. नाटकाविषयी बोलताना वंदना गुप्ते म्हणाल्या, ‘‘दहा वर्षांत अनेक नाटकाच्या संहिता वाचल्या, परंतु आपण काम करावं अशी एकही संहिता भावली नाही. या दरम्यान मालिका किंवा चित्रपट करत असले तरी नाटकाची ओढ स्वस्थ बसू देईना. याच दरम्यान चंद्रकांत कुलकर्णी यांनी या नाटकाविषयी विचारले आणि मी तातडीने होकार कळवला. या नाटकाच्या निमित्ताने मला माझा हरवलेला पत्ता मिळाला असे त्या सांगतात. तर हिंदी-मराठी मालिकांमधून विविध भूमिका साकारत असले तरी नाटक करून मिळणारे समाधान कुठे तरी हवेहवेसे वाटत होते आणि या समाधानाच्या, आनंदाच्या शोधात असतानाच हे नाटक मला मिळाले, असे प्रतीक्षा लोणकर म्हणाल्या. तर पुढे त्या असंही म्हणतात की, जे काम करायचंय ते पूर्णत: समजून उमजून करावं, त्या कलाकृतीला पुरेपूर वेळ द्यावा म्हणजे कलाकृतीही आपल्याला काही तरी देऊन जाते. त्यामुळे तूर्तास हे नाटकच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.’’

तर नाटकाची लेखिका स्वरा मोकाशी सांगते, ‘‘नाटक लिहिताना कधी विचारही केला नव्हता की नाटक रंगभूमीवर येईल. आता नाटक रंगभूमीवर आलेही आणि लोकांच्या पसंतीस उतरलेही. हा प्रवास माझ्यासाठी स्वप्नवत आहे.’’ तर नाटकात नातवाची भूमिका करणाऱ्या अथर्व नाकतीचे हे पहिलेच व्यावसायिक नाटक आहे. चंद्रकांत कुलकर्णीचा मला फोन आला हेच मुळात खरे वाटत नव्हते. नक्की हे चंद्रकांत कुलकर्णीच आहेत का हे अनेकदा पडताळून घ्यावे लागले, असे अथर्व सांगतो. नाटकाच्या ठाण्यातील गडकरीला झालेल्या प्रयोगाला अर्ध्याहून अधिक प्रेक्षक अर्थवला पाहायला आला होता. त्याच्या एंट्रीवर अगदी टाळ्या-शिटय़ा होत्या. याचं एकवेळाने आम्हालाच दडपण आले, असे चंद्रकांत गमतीने सांगतात. ‘‘मी नाटकातली नसल्याने माझ्यासाठी ही प्रक्रिया नवीनच होती. पण दिगज्ज कलाकारांसोबत होणाऱ्या नाटकाच्या तालमी, वाचन, त्यांचे संवादाचे टायमिंग हा अनुभव खूप काही शिकवणारा होता. विशेष म्हणजे संहितेचे नाटकात रूपांतर कसे होते ते जवळून पाहता आले’’, असे नाटकात पेइंग गेस्टची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीप्ती लेले सांगते. तर जावयाची भूमिका साकारणाऱ्या राजन जोशी या कलाकाराने आपल्या हिंदी व्यावसायिक नाटकाकडे पाठ फिरवत या नाटकाला प्राधान्य दिले. त्याच्या मते, मराठी रंगभूमीवर अशी कलाकृती करायला मिळणे हे भाग्य आहे. या नाटकातला जावई हा केवळ जावई नसून सासू आणि बायको या दोघींच्याही भूमिका समजून त्यांना न्याय देणारा माणूस आहे. तो केवळ गप्प बसून ऐकत नाही तर वेळप्रसंगी योग्यायोग्यतेची शहानिशा करून भाष्य करणारा आहे, असे तो सांगतो.  तर वंदना, प्रतीक्षा, दीप्ती अशा तीन पिढीच्या स्त्रिया या नाटकात एकत्र काम करत असून त्या तीन पिढय़ांचे नेतृत्व करणाऱ्या आहेत त्यामुळे हे नाटक तीन पिढय़ांची भूमिका मांडणारे आहे, असे दिग्दर्शक सांगतात.

नाटकाचा विषय काय..

अनेकदा आपण आपल्या जवळच्या माणसांकडून केवळ अपेक्षा करत राहतो. त्यामुळे नात्यातला मूळ सच्छील भाव बाजूला पडून स्वार्थाची भावना उपजू लागते. रक्ताच्या नात्याकडून असे अनुभव येत असतानाच दुसरीकडे मात्र आपला दूरवर संबंध नसणाऱ्या व्यक्तीही मनात घर करून जातात आणि अशा व्यक्तींसोबतही आपलं नातं नव्याने खुलू लागतं. काळाच्या ओघात हरवलेली नाती अधोरेखित करणारा हा ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ व्यावसायिक रंगभूमीवर अढळ स्थान निर्माण करत आहे. नात्यांचे विविध पदर उलगडत कर्तव्य, स्वार्थ आणि निर्व्याज प्रेम यावर तौलनिक भाष्य करण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आला आहे.

तेंडुलकरांची आठवण

त्या काळात अनेक कलाकृती येत होत्या आणि लोकप्रिय होत होत्या. परंतु तेंडुलकरांची शैली मात्र अनोखी होती. भाषेवर अलंकार चढवण्यापेक्षा तिला अनलंकृत करत त्यांनी वेगळे भाषिक सौंदर्य नाटकात आणले. सहज वाक्यता, स्पष्टपणा इतका गडद स्परूपात त्यांनी मांडला की ते पुढच्या पिढीचे आदर्श ठरले. घाशीराम, गिधाडे, अशी पाखरे येति, सखाराम, कमला अशा अजरामर कलाकृतींनी रंगभूमीची परिभाषा, रचना आणि स्वरूप  बदलून टाकले, असे चंद्रकांत कुलकर्णी यांनी  प्रत्येक लेखक हा वेगळा विचार घेऊन कलाकृती लिहीत असतो. नाटकाचे असे कोणतेच विशिष्ट समीकरण नाही यामध्ये या काळात असेच नाटक यायला हवे. पण समाजाच्या बदलत जाणाऱ्या अवस्थांचे चित्रण नाटकात यायला हवे. बदलत चालली नाती, व्यक्तिवाद, व्यक्तींमधील द्वंद्व, बदलत चाललेल्या राजकीय-सामाजिक भूमिका हे विषय मांडणे काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले

‘मी समृद्ध होत गेले..’

काळानुसार बदलत्या नाटकात काय फरक जाणवतो, या प्रश्नाचे उत्तर देताना वंदना सांगतात.. कानेटकर असो, तोडरमल, प्रशांत दळवी किंवा अभिराम भडकमकर. प्रत्येक लेखक हा काळाच्या पुढे जाऊन कलाकृती लिहीत असतो. गगनभेदी, कुलवधू, संध्याछाया, चारचौघी अशी किती तरी उदाहरणे देता येतील. या नाटय़ प्रवासात अनेक लेखकांची शैली आणि विचार जवळून अनुभवता आले ज्यातून मी अधिकच समृद्ध होत गेले.