अभिनेता हरमन बावेजाने सरते शेवटी बिपाशा बासू आणि त्याच्यातील रिलेशनशिपचा स्वीकार केला आहे. या दोघांना अनेक वेळा, अनेक ठिकाणी एकत्र पाहिले गेले आहे. असे असले तरी बिपाशा आणि हरमनने त्यांच्यातील नातेसंबंधांबाबत नेहमीच मौन पाळणे पसंत केले होते. परंतु, एका वृत्तपत्राला दिलेल्या खास मुलाखतीत हरमनने बिपाशा आणि त्याच्यातील रिलेशनशिपचा स्वीकार केला आहे.
बिपाशा आणि त्याच्यातील रिलेशनशिपच्या प्रश्नाला त्याने होकारार्थी उत्तर दिले आहे. तो म्हणाला, आम्ही एकमेकांना ओळखत होतो, परंतु, कधी बोललो नव्हतो. अमिताभ बच्चन यांच्या ७०व्या वाढदिवसाच्या पार्टीत आम्ही पहिल्यांदा एकमेकांना जवळून भेटलो आणि संवाद साधला. साजिद खानच्या ‘हमशकल्स’ चित्रपटाच्या चित्रीकरणात सध्या व्यस्त असलेल्या बिपाशाने आपल्या या नव्या रिलेशनशिपबाबत अद्याप मौन पाळले आहे. असे असले तरी हरमनबरोबर नववर्षाच्या स्वागतासाठी तिचे गोव्यात असणे आणि मागील महिन्यात तिच्या ३५व्या वाढदिवसाच्या दिवशी जवळच्या मित्रांसमवेत असलेली हरमनची उपस्थिती बरेच काही सांगून जाते.
या आधी बिपाशा जॉन अब्राहमबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. जवळजवळ ९ वर्ष ते एकत्र होते. परंतु, त्यांच्यातील मतभेदाने ते एकमेकांपासून दुरावले. यानंतर काही काळासाठी बिपाशा ग्लॅमरच्या दुनियेपासून दुरावली होती. परंतु, आता तिच्या आयुष्यात सर्वकाही ठिकठाक असल्याचे जाणवते. तर दुसरीकडे हरमन जवळजवळ पाच वर्षे प्रियांका चोप्राबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. परंतु, त्यांच्या रिलेशनशिपचेसुद्धा ब्रेकअपमध्ये रुपांतर झाले. प्रियांकाने हरमनाला ‘ढिश्क्याँव’ या त्याच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. २८ मार्चला चित्रपटगृहात दाखल होण्याची शक्यता असलेला ‘ढिश्क्याँव’ हा चित्रपट मुंबईतील अंडरवर्ल्डवर आधारित आहे.

Story img Loader