तब्बल २१ वर्षाने भारताने ‘मिस युनिव्हर्स २०२१’चा खिताब जिंकला. भारताची सौंदर्यवती हरनाझ संधू ‘मिस युनिव्हर्स २०२१’ या मुकुटाची मानकरी ठरली. यंदाची ‘मिस युनिव्हर्स’ ही स्पर्धा इस्त्रायलमध्ये पार पडली. तिच्या आधी सुश्मिता सेन आणि लारा दत्ता यांनी अनुक्रमे १९९४ आणि २००० मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा खिताब जिंकला होता. त्यानतंर तब्बल २१ वर्षाने भारताला ‘मिस युनिव्हर्स’चा खिताब मिळाला. ‘मिस युनिव्हर्स’ म्हणून तिचे नाव जाहीर होताच ती भावूक झाली.

मिस युनिव्हर्सचा खिताब मिळवल्यानंतर हरनाझवर भारतासह जगभरातून वर्षाव केला जात आहे. अनेक सेलिब्रेटींसह राजकीय व्यक्ती, व्यावसायिकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तिचे अभिनंदन केले आहे. यानंतर सोशल मीडियावर हरनाझ संधू असा टॅगही ट्रेंड होताना दिसत आहे. मिस युनिव्हर्सच्या मुकुटाची मानकरी ठरल्यानंतर हरनाझने तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी ती म्हणाली, ‘चक दे फट्टे इंडिया’. यानतंर तिचा आणखी एक अधिकृत व्हिडीओ समोर आला आहे. यात ती तिच्या कुटुंबियांचे, देशवासियांचे आभार मानताना दिसत आहे.

यावेळी ती म्हणाली, “नमस्ते. तुमच्या सर्वांचे धन्यवाद. मी देवाची ऋणी आहे. त्यासोबतच मी माझ्या पालकांचेही आभार मानते. पहिल्या दिवसापासून मला मार्गदर्शन केल्याबद्दल आणि माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल ‘द मिस इंडिया’ ऑर्गनायझेशनचंही मी आभार मानते. तसेच भारतासाठी २१ वर्षांनंतर मिस युनिवर्सचा किताब परत आणणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे,” असेही तिने यावेळी म्हटले.

कोण आहे हरनाझ संधू?

चंदीगडच्या हरनाझ संधूचा जन्म शीख कुटुंबात झाला. फिटनेस आणि योगाची आवड असलेल्या हरनाझने किशोरवयातच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तीने २०१७ मध्ये मिस चंदीगडचा किताब जिंकला होता. २०१८ मध्ये, तिला मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८ चा अवॉर्ड मिळाला होता. दोन प्रतिष्ठित खिताब जिंकल्यानंतर, हरनाझने मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला. तिथे तिने टॉप १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने मिस दिवा युनिव्हर्स इंडिया २०२१ चा मुकुट पटकावला. ती पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहे.