‘हॅरी पॉटर’ची चित्रमालिका संपली तरी त्याबद्दलचे आकर्षण संपलेले नाही. हॅरीला जन्माला घालणारी लेखिका जे के रोलिंग सध्या एका पोस्टकार्डच्या शोधात आहे. ‘इंग्लिश पीईएन’ या स्वयंसेवी संस्थेला आर्थिक मदत करण्यासाठी रोलिंगने एका पोस्ट कार्डवर हॅरी पॉटरची गोष्ट स्वत: ८०० शब्दांत लिहून काढली होती. आज या कार्डची किंमत ३२,१३० अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त आहे. मात्र हे पोस्टकार्ड २००८ मध्ये बरहिंगम येथील एका ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनातून चोरीला गेले होते. आता तब्बल ९ वर्षांनंतर ते पोस्टकार्ड विकण्याचा प्रयत्न होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली आहे.
‘व्होल्डमार्ट’ हॅरी पॉटरच्या आई-वडिलांना ठार करतो. दरम्यान या हल्यातून बचावलेल्या लहानग्या हॅरीच्या शरीरात व्होल्डमार्टच्या शक्तीचा अंश प्रवेश करतो. पुढे याच हॅरी पॉटरकडे व्होल्डमार्टचा विनाशकर्ता म्हणून पाहिले जाते. ‘अल्बस डम्बलडोअर’ आणि त्याचा छुपा समर्थक ‘सिव्हीरियस स्नेप’ यांच्या मदतीने हॅरी व त्याचे मित्र ‘रॉन विजली’, ‘हरमायनी ग्रेंजर’ व्होल्डमार्टचे साम्राज्य एक एक करत कसे उद्धस्त करतात याचे चित्तथरारक वर्णन हॅरी पॉटर कादंबरीतील पहिल्या सात भागांमध्ये आहे. परंतु यात हॅरीचे आई-वडील ‘जेम्स पॉटर’ व ‘लिली पॉटर’ यांच्याबद्दल काही विशेष संदर्भ नाहीत. या पोस्टकार्डवर कादंबरीत उल्लेख नसलेल्या अशा अनेक गोष्टींचे वर्णन केले आहे. त्यामुळे या सामान्य कार्डला विशेष महत्व प्राप्त झाले.
रोलिंगने या संदर्भात पोलिस तक्रार केली असुन ‘पी सी पॉल’ हे पोलिस अधिकारी गेले ९ वर्षे या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही चोरी एखाद्या ऐतिहासिक वस्तू चोरी करण्याऱ्या टोळीचे काम आहे. तसेच हे कार्ड हॅरी पॉटरचा खरा प्रशंसकच विकत घेइल. असे मत पॉल यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान पोलिसांनी कार्ड कोणी विकत घेउ नये आणि कोणी विकण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांना खबर द्यावी अशी विनंती केली आहे.