इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्यातील कामाच्या तासांबद्दल एक विधान केलं होतं. तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम करायला हवं, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे कुणी समर्थन केले तर काहींनी मात्र विरोध केला होता. अशातच आता उद्योगपती हर्ष गोएंका यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे. नारायण मूर्ती आणि सोशल मीडिया एन्फ्ल्युएन्सर तसेच बॉलीवूडकरांचा बेस्ट फ्रेंड ओरहान अवत्रामणी यांच्यात कामाच्या तासांबद्दल डिबेट व्हायला हवी, असं त्यांनी म्हटलं आहे.
उद्योगपती हर्ष गोएंका यांनी ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवर एक मजेशील पोस्ट टाकली आहे. “आठवड्यातून ७० तास काम करण्याच्या गरेजवर कोणीतरी नारायण मूर्ती आणि ओरी यांच्यादरम्यान चर्चासत्र आयोजित करेल का?” अशी पोस्ट गोएंका यांनी केली आहे. याबरोबरच त्यांनी ओरी व नारायण मूर्ती यांचे फोटोही शेअर केले आहेत.
दरम्यान, हर्ष गोएंका यांच्या या पोस्टवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. काहींच्या मते ‘ओरी आठवड्यातून फक्त सात तास काम करा’ असं सांगेल. तर काहींनी आपल्यालाही दोघांमधील हे चर्चासत्र बघायला आवडेल अशा कमेंट्स केल्या आहेत. या दोघांमधील चर्चासत्र होस्ट कोण करेल, असा प्रश्न करणाऱ्या युजरला हर्ष यांनी उत्तर दिलं. त्या चर्चासत्राचा होस्ट मी असेन, असं ते म्हणाले. एकंदरीतच हर्ष गोएंकांच्या या पोस्टची एक्सवर चांगलीच चर्चा रंगली आहे.
प्रसिद्ध अभिनेत्रीने सॉफ्टवेअर इंजिनिअरशी केलं लग्न; सोहळ्याचे खास फोटो पाहिलेत का?
काही दिवसांपूर्वीच इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांना आठवड्यातून ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. तरुणांनी दिवसाचे १२ तास आणि आठवड्यातून सहा दिवस काम करावं, असंही त्यांचं म्हणणं होतं. देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी भारतीय तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम करायला हवं, असं ते म्हणाले आणि वादाला तोंड फुटलं होतं. अनेकांनी त्याचे समर्थन केले, तर अनेकांनी इतकं काम करण्याचा विरोध केला होता.
दरम्यान, सेलिब्रिटींचा बेस्ट फ्रेंड ओरी नेमका काय करतो, हे कुणालाच ठाऊक नाही. त्याच्या कामाबद्दल बरीच चर्चा होते. तो स्वतःला उद्योजक, चित्रकार, आयुष्य भरभरून जगणारा म्हणतो. पण त्याच्या कामाबद्दल कोणालाही माहिती नाही. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तो सेलिब्रिटींबरोबरचे फोटो पोस्ट करत असतो. एकदा त्याने आपण सेल्फीसाठी २० ते ३० लाख रुपये घेत असल्याचं म्हटलं होतं. पण नंतर मात्र त्याने यु-टर्न घेत आपण खोटं बोलल्याचं म्हटलं होतं.