दिलीप प्रभावळकर हे चतुरस्र कलावंत आहेत. त्यांच्यात एका श्रेष्ठ अभिनेत्याबरोबरच सिद्धहस्त लेखक, दिग्दर्शक आणि मार्मिक रसिकही मौजूद आहे. प्रेक्षकांची (आणि वाचकांचीही!) अचूक नाडी जोखण्याचं तीक्ष्ण नाक त्यांच्याकडे आहे. त्यांचा पाचेक दशकांचा रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील वावर हा सतत
त्यांनी आपल्यातल्या कलाकाराचा कस जोखण्यासाठी स्वत:च एक भन्नाट प्रयोग काही वर्षांमागे केला.. ‘हसवाफसवी’! आपली लेखणी, दिग्दर्शकीय कौशल्य आणि अभिनेतेपण ‘हसवाफसवी’त त्यांनी अक्षरश: पणाला लावलं. आणि या कसोटीत ते खरेही उतरले. रसिकांनी त्यांच्या या भन्नाट ‘प्रयोगा’ला भरभरून दाद दिली. ‘दिलीप प्रभावळकर हे अभिनयाचं एक स्वतंत्र विद्यापीठ आहे,’ अशी खणखणीत थाप भल्याभल्यांनी त्यांच्या पाठीवर दिली. परंतु ते या कौतुकात हरवून गेले नाहीत. ‘हसवाफसवी’चं आपल्यालाच अजीर्ण व्हायच्या आत पैसा, मानसन्मान, प्रसिद्धी देणारा हा प्रयोग त्यांनी सादर करायचं थांबवलं. वाढतं वय आणि रसिकांची आपल्या नाटकातली रुची संपलेली असतानासुद्धा काही कलाकार आपली लखलखीत मुद्रा उमटलेलं नाटक वर्षांनुवर्षे प्रेक्षकांच्या माथी मारत राहतात, हा मराठी रंगभूमीचा इतिहास असताना दिलीप प्रभावळकरांनी त्याला छेद दिला. रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असतानाच त्यांनी ‘हसवाफसवी’चे प्रयोग थांबवले. आणि ते पुढे चालत राहिले.
असं हे ‘हसवाफसवी’! शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’मधील अप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेचं आव्हान जसं आयुष्यात एकदा तरी पेलावं, अशी प्रत्येक सच्च्या कलावंताची इच्छा असते, तद्वत ‘हसवाफसवी’चं हे शिवधनुष्य पेलणंही तितकंच अवघड आहे. त्यातल्या सहा भिन्न भिन्न प्रकृतीच्या व्यक्तिरेखा थोडीही उसंत न घेता एकामागोमाग लीलया साकारणं, ही गोष्ट खचितच सोपी नाही. म्हणूनच बहुधा आजवर हे धाडस कुणी केलं नव्हतं. पुष्कर श्रोत्री यांना मात्र ‘हसवाफसवी’चं हे आव्हान स्वीकारावंसं वाटलं आणि त्यांनी हे शिवधनुष्य उचललं. अर्थात् चंद्रकांत कुलकर्णीसारखा खंदा दिग्दर्शक त्यांच्या पाठीशी उभा होता, हेही तितकंच महत्त्वाचं. त्यामुळे त्यांचं निम्मंअधिक दडपण कमी झालं असणार. कुठल्याही कलाकाराकडून आपल्याला हवं ते(च!) काढून घेण्यात कुलकर्णी वाकबगार आहेत. अनेकांना त्यांच्या कारकीर्दीतल्या मैलाचा दगड ठरलेल्या भूमिका चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिल्या आहेत. साहजिकच त्यांच्या हाती स्वत:ला सोपवलं की झालं, असा विचार श्रोत्रींनी केला असणार. परंतु एवढय़ानं भागत नाही. पुष्कर श्रोत्रींना स्वत: बरेच कष्ट घ्यावे लागणार होते. आणि ‘हसवाफसवी’चा प्रयोग पाहत असताना त्यांनी ते अगदी मनापासून घेतले आहेत याची खात्री पटते.
वयाची ऐंशी पार केलेल्या कृष्णराव हेरंबकर या जुन्या गायक नटाच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन एका संस्थेनं केलेलं असतं. परंतु कोकणातील आपल्या गावाहून मुंबईला यायला निघालेले कृष्णराव सत्काराची घटिका जवळ आली तरी समारंभस्थळी येऊन पोचलेले नसतात. त्यामुळे आयोजक वाघमारे आणि त्यांची सहकारी कार्यकर्ती मोनिका अस्वस्थ झालेले असतात. बरं, कृष्णराव मोबाइलही वापरत नसल्याने आणखीनच पंचाईत. इकडे त्यांचा ठावठिकाणा नाही; अन् समारंभाला तर त्यांच्या चाहत्यांची ही गर्दी झालेली! त्या गर्दीत चिं. वि. जोश्यांचे ‘चिमणराव’ही आलेले. ते आपल्या नित्याच्या धांदरटपणामुळे चुकून थेट स्टेजवरच येतात आणि गडबडतात. आपल्या या चुकीबद्दल क्षमा मागता मागता आपल्या नाटय़प्रेमाचे आणि त्यापायी झालेल्या घोटाळ्यांचे किस्से सांगताना त्यातच रंगून जातात.
एवीतेवी कृष्णराव वेळेवर न पोचल्यानं श्रोत्यांना थोपवून धरण्याचं कर्मकठीण काम आयोजकांना पार पाडायचंच असतं. चिमणरावांच्या येण्यानं त्यांना थोडासा दिलासा मिळतो. तेवढाच श्रोत्यांना टाइमपास होतो.
पण पुढं काय?
तेवढय़ात मोनिकाला आपल्या मैत्रिणीच्या नवऱ्याची- चिंगपॉंग आयलंडचे राजे प्रिन्स वांटुंग पिन-पिन यांची आठवण होते. तेही कृष्णरावांच्या सत्काराला सपत्नीक आलेले असतात. वेळ काढण्याकरता त्यांनाच गळ घालून त्यांच्या देशाबद्दल मुलाखतीतून जाणून घेतलं तर..? तेवढीच श्रोत्यांच्या ज्ञानात भर आणि वेळही कटेल. मोनिका प्रिन्स वांटुंगना स्टेजवर बोलावते आणि त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सुरू होतो. चीनच्या निकट असलेला इवलासा त्यांचा देश, तिथल्या चालीरीती, त्यांचं मराठी मुलीच्या प्रेमात पडून लग्न करणं.. वगैरे वगैरे ते रंगवून रंगवून सांगू लागतात. त्यांची ‘चिनी’ मराठी समजून घेता घेता सर्वाची चांगलीच करमणूक होते. ही मुलाखत सुरू असतानाच त्यांच्या देशात क्रांती होऊन त्यांची सत्तेवरून हकालपट्टी केली गेल्याचं वर्तमान कळल्यानं ते घाईघाईत निघून जातात. तरीही कृष्णरावांचा पत्ता नसतो..
एवढय़ात नाना पुंजे नामक कोंबडय़ांचे व्यापारी पुढे आलेले दात-ओठ खात मंचावर अवतरतात. त्यांच्या ढगळ बोलण्यातून ते स्टेजवर का आलेत, हेच सुरुवातीला कळत नाही. बरंच चर्वितचर्वण करून ते मुद्दय़ाशी येतात. कृष्णराव त्यांच्या कोंबडय़ांच्या गाडीतून इकडे यायला निघालले असताना गाडीला अपघात झालेला असतो. त्यात त्यांच्या बऱ्याच कोंबडय़ा ‘शहीद’ झालेल्या असतात. मात्र, कृष्णराव सुखरूप असतात. पण नंतर ते कुठं गेले, हे त्यांना माहीत नसतं.
तेवढय़ात आफ्रिकेतून आलेली कुणी लुमुम्बा नामक बाई प्रेक्षकांतून अचानक स्टेजवर येते. तिच्या पोरांनी धुडगुस घातलेला असतो. त्यांना डाफरतच ती अवतरते. ही बाई पुष्कर श्रोत्रींसारखी दिसते. तेव्हा ती स्वत:च खुलासा करते, की ती खरंच त्यांची बहीण आहे. लहानपणी जत्रेत हरवल्यानं आपल्या कुटुंबापासून ती दूर गेलेली असते. आफ्रिकेतल्या पटेल नावाच्या बाईला ती आपलीच मुलगी वाटल्यानं ती तिला घेऊन चक्क आफ्रिकेला जाते. त्यामुळे तिचं सगळं आयुष्यच बदलतं. मोठी झाल्यावर तिचं आफ्रिकन लुमुम्बा कुटुंबात लग्न होतं. सध्या ती सुट्टीवर आपल्या सहा मुलांसह घेऊन भारतात आलेली असते. नाटय़संगीताची चाहती असल्यानं या कार्यक्रमाला ती आलेली असते. तिची ही कहाणी ऐकताना प्रेक्षक हरवून जातात. आयोजकांनाही कृष्णराव प्रकरणात थोडीशी उसंत मिळते. पण तितक्यात पोरांच्या कलकलाटानं कावून लुमुम्बा त्यांना आवरायला जाते; आणि पुन्हा आयोजकांच्या पोटात खड्डा पडतो.
इतक्यातच एक झुल्पंवाला रॉक गायक तरुण अंगाला झटके देत अगम्य रॉक गाणं गात मंचावर येतो. त्याच्या वडिलांनी आयोजकांना प्रायोजित केलेल्या वस्तू देण्यासाठी त्याला पाठवलेलं असतं. बॉबी मॉड त्याचं नाव. त्याची ब्याद मंचावरून जाईतो कृष्णरावांचा पत्ता लागतो. ते कार्यक्रस्थळीच यायला निघालेले असतात.
यथावकाश कृष्णरावांचं सपत्नीक आगमन होतं आणि त्यांचा हृद्य सत्कार पार पडतो. ‘संगीत सौभद्र’मधील ‘प्रिये पहा, रात्रीचा समय सरूनी..’ हे त्यांचं गाजलेलं पद ते वयाचा परिणाम वगळता खणखणीतपणे पेश करतात. सत्कारानंतरच्या आपल्या मनोगतात ते म्हातारपणाची मन विदीर्ण करणारी व्यथा मांडतात आणि ‘वृद्धांना जपा’ असा संदेश देतात.
एका वृद्ध गायक नटाच्या सत्काराच्या निमित्तानं दिलीप प्रभावळकरांनी विभिन्न देश-काल-परिस्थितीतल्या सहा वल्ली ‘हसवाफसवी’त एकत्रित पेश केल्या आहेत. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी काळानुरूप त्यात आणखी काही गमतीजमतींची भर घातली आहे. वानगीदाखल ‘डर्टी पिक्चर’मधलं ‘उलाला’ हे गाणं कृष्णरावांनी अंगाईगीत म्हणून पेश करण्याच्या प्रकाराचा करता येईल. कुलकर्णी यांनी प्रयोगात अधिक सफाईदारपणा आणि काटेकोरता आणली आहे. प्रभावळकरांच्या प्रयोगाचा परिणाम पुसणं शक्य नसलं तरी नवा प्रयोग प्रेक्षकांनी कोऱ्या पाटीनं पाहावा याकरता आवश्यक ते बदल त्यांनी केले आहेत.
पुष्कर श्रोत्री यांनी ही सहा पात्रं साकारताना प्रचंड मेहनत घेतली आहे यात शंकाच नाही. त्यातही चिमणराव, प्रिन्स वांटुंग आणि कृष्णराव हेरंबकर या भूमिका त्यांनी अत्यंत उत्तमरीत्या पेश केल्या आहेत. त्यांचा कृष्णराव तर अप्रतिमच. प्रिन्स वांटुंगचं त्याच्या स्थानिक भाषेतलं बोलणं मस्तच. मात्र, मधेच ते भूमिकेतून बाहेर येत ‘नॉर्मल’ पुटपुटतात तेव्हा त्यातली गंमत काहीशी उणावते. चिमणरावांचं भेदरलेपण, धांदरटपणा आणि बालसुलभ निरागसता त्यांनी छान दाखवलीय. नाना पुंजेंचं गावठी बेअरिंगही त्यांना अचूक सापडलंय. या धमाल वल्लीचं अर्कचित्र त्यांनी विश्वसनीय केलं आहे. पूर्वी श्रोत्री तथा पटेल तथा लुमुम्बाचं दिसणं आणि असणं- दोन्ही पुष्कर श्रोत्रींसारखंच आहे. त्यांचं या भूमिकेतलं बायकी बोलणं पुरुषी वाटत नाही खरं; परंतु यात ते काहीसे सैलावलेले दिसतात. तीच गोष्ट बॉबी मॉडची. बॉबीच्या भूमिकेत त्यांचा आत्मविश्वास अतिच जाणवतो.
वैखरी पाठक (मोनिका) आणि सतीश जोशी (वाघमारे) यांनी कार्यकर्त्यांची गोची उत्तम वठवली आहे. कल्पेश बाविस्करांचा आगाऊ कोयंडेही विरंगुळा आणतो.
संग्रहित लेख, दिनांक 4th May 2014 रोजी प्रकाशित
हसवाफसवी: ज्यादातर खुशी, थोडा गम
दिलीप प्रभावळकर हे चतुरस्र कलावंत आहेत. त्यांच्यात एका श्रेष्ठ अभिनेत्याबरोबरच सिद्धहस्त लेखक, दिग्दर्शक आणि मार्मिक रसिकही मौजूद आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 04-05-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hasva fasvi marathi comedy play