बॉलिवूड स्टार रनवीर सिंग आणि दिपीका पदुकोन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘राम-लीला’ चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये अडथळा ठरू शकणारी प्रदर्शन बंदीची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरूवारी फेटाळली. याचिकाकर्त्या स्वयंसेवी संस्थेने ‘राम-लीला’ चित्रपटामध्ये लैंगिक दृष्ये, हिंसा व बाष्कळपणावर भर देण्यात आला असून, हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप ठेवत उच्च न्यायालयामध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी अशी याचिका दाखल केली होती.
‘राष्ट्रवादी शिव सेना’ या स्वयंसेवी संस्थेने दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांच्या राम-लीला चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका असणाऱ्या अभिनेता रनवीर सिंग आणि दिपीका पदुकोण यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कलात्मकता नसल्याचे म्हटले होते. त्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने ‘राष्ट्रवादी शिव सेना’ या स्वयंसेवी संस्थेला ५०,००० रूपयांचा दंड केला आहे.            
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एन.व्ही रामन व न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली. राष्ट्रवादी शिव सेनेचे अध्यक्ष जयभगवान गोयल यांनी ‘राम-लीला’ चित्रपटाविरोधामध्ये याचिका दाखल केली होती. गोयल यांनी चित्रपटाच्या नावामध्ये हिंदूंचे दैवत रामाचे नाव वापरण्यावर अक्षेप घेतला आहे.      
“कुणीही रामाचे नाव वापरू नये असाच हुकूम तुम्ही आम्हाला काढायला लावू पाहत आहात,” असे म्हणत न्यायालयाने गोयल यांची याचिका फेटाळली. राष्ट्रवादी शिव सेनेच्या वतीने करण्यात आलेल्या याचिकेमध्ये पूराणाशी ‘राम-लीला’ चित्रपटाचा कोणताही संबंध नसताना चित्रपटाच्या नावामध्ये रामाचे नाव वापरले असल्याचे म्हटले आहे.
“भनसाली यांच्या ‘राम-लीला’ चित्रपटाचे नाव दिशाभूल करणारे असून, त्यामध्ये कोणतीही कलात्मकता नाही,” असे राष्ट्रवादी शिव सेनेच्या याचिकेमध्ये म्हटले आहे.