ऐंशी- नव्वदीच्या दशकातील हिंदी चित्रपटांमध्ये बहारदार संवादांची पेरणी करून विनोद आणि गंभीर व्यक्तिरेखांचा अजब संसार उभारणारे ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. विनोदी अभिनेता अशी ओळख निर्माण करण्याआधी ते खलनायकाच्या भूमिकेतही होते. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडनं सोशल मीडियाच्या माध्यामातून शोक व्यक्त केला. मात्र शक्ती कपूर यांनी कादर खान यांच्याकडे नंतरच्या काळात अनेकांनी पाठ फिरवली असं म्हणत आपली खंत व्यक्त केली.

‘जेव्हा कलाकार जिवंत असतो तेव्हा कोणालाही त्याची आठवण येत नाही. कलाकार हयात असताना कोणीही त्याच्याबद्दल चांगलं बोलत नाही, हे असं का घडतं? केवळ मृत्यूनंतरच चांगलं बोलावं का? कलाकाराच्या उमेदीच्या काळात त्याच्याविषयी चांगले शब्द का निघत नाही ? कादर खान यांची तब्येत कित्येक वर्षांपासून खालावली होती त्यावेळी कोणीही त्यांच्या प्रकृतीबद्दल काळजी दर्शवली नाही. कादर खान शेवटच्या काळात पूर्णपणे एकटे होते. कित्येक कलाकारांनी त्यांची भेटही घेतली नाही, ना त्यांच्यासोबत वेळ घालवला. सुदैवानं कादर खान यांची आर्थिक स्थिती चांगली होती त्यामुळे उपचारात अडचणी आल्या नाहीत मात्र त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सगळ्यांनीच एकटं पाडलं’ अशी खंत शक्ती कपूर यांनी ‘हिंदुस्थान टाइम्स’शी बोलताना व्यक्त केली.

शक्ती कपूर आणि कादर खान यांनी जवळपास १०० चित्रपटात एकत्र काम केलं. कादर खान यांच्या जाण्यानं शक्ती कपूर यांनी हळहळ व्यक्त केली. गेल्या चार महिन्यांपासून प्रकृती ढासळ्यानं कादर खान यांच्यावर उपचार सुरू होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागण्यानं त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आलं होतं. अभिनयासोबतच त्यांनी अनेक चित्रपटासाठी संवादलेखनही केलं. कालांतरानं त्यांना भूमिका मिळणं कमी होत गेल्या. २०१५ मध्ये ‘तेवर’ आणि २०१७ मध्ये ‘मस्ती नही सस्ती’ या चित्रपटात त्यांनी काम केलं. ‘मला काही काळ बरं वाटतं नव्हतं तेव्हा काही लोकांनी मला चित्रपटात परत घेण्यास नकार दिला’असं कादर खान २०१५ मध्ये एका मुलाखतीत म्हणाले होते. कालांतरानं ते मुलासह बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर कॅनडाला निघून गेले.

 

Story img Loader