स्पर्धा, चित्रिकरणाचे व्यस्त वेळापत्रक, सततची भ्रमंती, बदलते वातावरण, पाणी, खाणे व जेवणाच्या अनियमित वेळा, कमी झोप, कामाचा व्याप यामुळे कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या आरोग्याची हेळसांड होत असते. अर्थात याला काही कलाकार अपवाद आहेत. हे कलाकार आपल्या कामाबरोबरच स्वत:चे आरोग्य, प्रकृतीबाबतही जागरूक असतात. मात्र बहुसंख्य कलाकार स्वत:च्या आरोग्याची हेळसांड करून घेतात. प्रसिद्धी, पैसा, ग्लॅमरची आणि अन्य नशा यात ते नको तितके गुरफटून जातात. शारीरिक तक्रारी, किरकोळ आजारपण सुरू झाले की अनेक वर्षे आरोग्याकडे केलेल्या दुर्लक्षाची ही फळे आहेत, हे हळूहळू त्यांना कळायला लागते. पण तोपर्यंत वेळ आणि वय निघून गेलेले असते.
यातूनच अनेकांना हृदयविकार, मधुमेह, थॉयराईड, गुडघेदुखी, झोप कमी होणे किंवा अजिबात न लागणे, यकृत, मूत्रपिंड विकार आणि व्यवसायानुरुप अन्य आजार, दुखणी सुरू होतात. कामाच्या व्यग्रतेमुळे या कलाकारांना आरोग्य/वैद्यकीय तपासणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे शिवसेना चित्रपट सेनेतर्फे आता कलाकार-तंत्रज्ञांच्या आरोग्य तपासणीसाठी थेट चित्रीकरण स्थळी वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक मुंबईतील चित्रिकरणस्थळी स्टुडिओत जाऊन कलाकार आणि तंत्रज्ञांच्या आरोग्याची तपासणी करणार आहे.या शिबिरात इसीजी, अस्थमा, थॉयराईड, यकृत, मुत्रपिंड, रक्तदाब, मधुमेह, हाडे, गुडघा आणि मणका, डोळे, घसा, कान, नाक तपासणीबरोबरच नेत्रचिकित्सा, अवयवदान, मरणोत्तर नेत्रदान, देहदान याविषयी माहिती दिली जाणार आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव येथे नुकतेच असे पहिले शिबीर आयोजि करण्यात आले होते. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांनी याचा लाभ घेतला. डॉ. अनिरुद्ध आंबेकर, गोरेगाव येथील ‘लाइफलाइन मेडिकेअर’चे डॉक्टर व अन्य कर्मचारी यात सहभागी झाले होते. शिवसेना चित्रपट शाखेचे अध्यक्ष आदेश बांदेकर, उपाध्यक्ष शरद पोंक्षे, शिवसेना उपनेते अरविंद सावंत आणि अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा