दिग्दर्शक राहुल जाधव यांच्या ‘हॅलो नंदन’ या आगामी चित्रपटाच्या संगीत अनावरणाचा कार्यक्रम अलिकडेच मुंबईत पार पडला. प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या हस्ते या चित्रपटाच्या संगीताचे अनावरण मोठ्या दिमाखात संपन्न झाले. कार्यक्रमादरम्यान सर्व प्रथम चित्रपटातील धमाल शीर्षक गीत उपस्थितांना ऐकवण्यात आले. त्यानंतर चित्रपटातील कलाकार आदिनाथ कोठारे आणि मृणाल ठाकूर या जोडीने एक धमाकेदार परफॉर्मन्स सादर केला आणि उपस्थितांची मने जिंकली. चित्रपटात एकूण पाच गाणी असून, ए. व्ही. प्रफुल्लचंद्र, केदार शार्दुल, गुरु ठाकूर आणि रुपेश यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार ए. व्ही.  प्रफुल्लचंद्र आणि अमितराज यांनी संगीत दिले आहे. यावेळी दिग्दर्शक राहुल जाधव म्हणाले, प्रफुल्लचंद्र या अतिशय हुशार संगीतकाराने अतिशय उत्तम असे संगीत या चित्रपटासाठी दिले आहे.
तरुणांना भावतील अशी विविध प्रकारची गाणी यात आहेत. तसेच संगीतकार अमितराज यांनी रचलेले `बेधुंद तू…’ हे गाणे तर अतिशय सुंदर झाले आहे. रसिक श्रोत्यांना चित्रपटातील सर्व गाणी आवडतील अशी आशादेखील त्यांनी व्यक्त केली.
तर संगीतकार अमितराज म्हणाले की, राहुल जाधव आणि सचिन दरेकर यांच्या सहकार्यामुळेच आज मी मराठी चित्रपटसृष्टीत काम करत आहे. या चित्रपटासाठी एक गाणे संगीतबद्ध करण्याची संधी मला दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. चित्रपट आणि चित्रपटाच्या संगीताविषयी बोलताना अभिनेते महेश कोठारे म्हणाले, चित्रपटातील संगीत खूपच छान झाले असून, गाण्यांचे चित्रीकरण देखील अतिशय उत्तम झाले आहे. चित्रपटात आदिनाथ आणि मृणालची जोडी खूप सुंदर दिसत असून प्रेक्षकांना देखील ही नवीन जोडी आवडेल याची मला खात्री आहे. लेमोनेड प्रॉडक्शन लिमिटेड प्रस्तुत, नॉक नॉक इंटरटेन्मेटची निर्मिती असलेल्या ‘हॅलो नंदन’ या चित्रपटाच्या संगीत अनावरणाच्या कार्यक्रमाला लेमोनेड प्रॉडक्शनचे कपिल गांधी, रिशी जैन आणि अमित धारीवाल, नॉक नॉक एंटरटेन्मेटचे नवीन रमनानी आणि रीनू ओहलान, सहनिर्माते अभिनव मिश्रा, अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री मृणाल ठाकूर, देवेंद्र भगत, अनंत जोग, संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र, अमितराज, गीतकार गुरु ठाकूर, केदार शार्दुल, लेखक सौरभ भावे व तंत्रज्ज्ञ मंडळी उपस्थित होती.

Story img Loader