Happy Birthday Dream Girl Hema Malini: ड्रीम गर्ल हे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कुणाचं नाव येतं? बरोबर हेमा मालिनी यांचंच. हेमा मालिनी म्हणजे ‘स्वप्न सुंदरी’ असं म्हटलं गेलंच आहे कारण हेमा मालिनी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ‘सपनो का सौदागर’ या सिनेमापासून केली होती. यामध्ये त्या राज कपूर यांच्यासह अभिनेत्री झळकल्या होत्या. सध्या त्या भाजपाच्या खासदार आहेत. अभिनय आणि नृत्य या त्यांच्या कलांसाठी त्या ओळखल्या जातात. त्या चित्रपटांमधून आता फारशा दिसत नाहीत. मात्र ‘भरतनाट्यम’ हा नृत्यप्रकार त्या आजही करतात. काही विशेष कार्यक्रमांमध्ये त्या आजही हा नृत्यप्रकार करतात. वैजयंती माला यांची परंपरा पुढे चालवणाऱ्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आज आपण जाणून घेणार आहोत हेमा मालिनी यांच्या विषयी काही अशा गोष्टी फारशा समोर आलेल्या नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजही फिट अँड फाईन

हेमामालिनी या आपल्या फिटनेसचं सगळं श्रेय त्यांच्या नृत्यकलेला देतात. तसंच त्या योगासनं रोज करतात आणि डाएटवरही प्रचंड भर देतात असं त्यांनी मुलाखतीत सांगितलं होतं. १९६८ मध्ये आलेल्या ‘सपनो का सौदागर’ या सिनेमातून हेमा मालिनी यांनी सुरुवात केली. १९६४ मध्ये तमिळ फिल्म दिग्दर्शक सी.व्ही. श्रीधर यांनी एका सिनेमासाठी रिजेक्ट केलं होतं. अभिनेत्री म्हणून हेमा मालिनी परफेक्ट नाहीत असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र पुढे काय घडलं ते सगळ्यांनाच माहित आहेत. त्यावेळी राजेश खन्ना सुपरस्टार होता. राजेश खन्नासह ‘कुदरत’, ‘प्रेम नगर’,
हम दोनो’, ‘बंदिश’, ‘राजपूत’, ‘बाबू’, ‘अंदाज’, ‘दर्द’ आणि ‘दुर्गा’ अशा सिनेमांमध्ये हेमा मालिनी यांनी काम केलं.

धर्मेंद्र यांच्यासह ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन केमिस्ट्री

हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासह सर्वाधिक म्हणजेच ४० चित्रपटांमध्ये काम केलं. ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘रजिया सुलतान’, ‘अलीबाबा चालीस चोर’, ‘ड्रीम गर्ल’ अशी कितीतरी नावं घेता येतील. ‘शोले’ सिनेमाच्या सेटवर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचं प्रेम बहरलं होतं. अभिनेते सचिन यांनी एका मुलाखतीत एक किस्सा सांगितला होता की ‘शोले’तला ‘चक्की पिसिंग’चा सीन करण्यासाठी धर्मेंद तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीवर चढले होते.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन केमिस्ट्रीही गाजली.

हेमा मालिनी यांच्यासाठी जेव्हा धर्मेंद्र यांनी दूधवाल्याकडे मागितली होती सायकल

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र हे दोघंही ‘रझिया सुलतान’ नावाच्या सिनेमाचं शुटिंग करत होते. त्यांचं शुटिंग संपलं पण घ्यायला येणारी कार आली नाही. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र दोघंही वाट बघत होते. शेवटी हेमा मालिनी यांना वाट पाहून वैताग आला. त्यांना वैताग आला हे पाहून धर्मेंद्रना रहावेना. त्यांनी जवळच उभ्या असलेल्या दूधवाल्याकडे त्याची सायकल मागितली आणि सांगितलं मी हॉटेलवर पोहचतो आणि तुझी सायकल तुला परत पाठवतो. त्यानंतर त्यांनी हेमा मालिनी यांना सायकलवर बसवलं आणि हॉटेलवर सोडलं. मात्र त्यांचा हा सायकल प्रवास सोपा नव्हता. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी सायकलवर चाललेत पाहून गर्दी जमा व्हायला लागली. त्यावेळी धर्मेंद्र यांनी इतक्या जोरात सायकल चालवली की ते गर्दी टाळून हेमा मालिनीला घेऊन हॉटेलवर पोहचू शकले. एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनीच हा किस्सा सांगितला आहे.

धर्मेंद्रच नाही जितेंद्र आणि संजीव कुमारही झाले होते ड्रीम गर्लवर फिदा

हिंदी सिनेसृष्टीतले हरहुन्नरी कलावंत संजीव कुमार यांनाही हेमा मालिनी आवडत होती. संजीव कुमार यांनी तर त्यांना प्रपोजही केलं होतं. तसंच जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचं लग्न जवळपास ठरलंच होतं. मात्र त्यावेळी धर्मेंद्र यांनी इतके फोन केले की जितेंद्र यांना अखेर माघार घ्यावी लागली होती. संजीव कुमार आणि हेमा मालिनी ‘सीता और गीता’ मध्ये एकत्र झळकले होते. त्याचवेळी संजीव कुमार यांना हेमा मालिनी आवडू लागल्या होत्या. मात्र धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांचं प्रेम मिळवलं. ‘शोले’ सिनेमात हेमा मालिनी आणि संजीव कुमार हे दोघं पुन्हा एकत्र आले. मात्र असा किस्सा सांगितला जातो की सिनेमातल्या संवादांशिवाय या दोघांमध्ये काहीही चर्चा व्हायची नाही. तसंच दोघांची मैत्रीही संपुष्टात आली होती.

हेमा मालिनी आणि प्राण एका सिनेमाच्या प्रसंगात (फोटो-फेसबुक)

‘शोले’तल्या विरुची भूमिका धर्मेंद्र यांनी स्वीकारली कारण त्यांना माहित होतं की ‘बसंती’च्या भूमिकेत हेमा मालिनी असणार आहेत. धर्मेंद्र यांचं लग्न झालेलं होतं. त्यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून चार मुलंही होती. तरीही त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना घटस्फोट दिला नाही. त्यानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी इस्लाम धर्म स्वीकारुन लग्न केलं. १९८० मध्ये धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांचं लग्न झालं. हेमा मालिनी यांना धर्मेंद्र यांच्यापासून इशा देओल आणि अहना देओल या दोन मुली आहेत.

हेमा मालिनी यांनी त्यांच्या कारकिर्दीचा आलेख उंचावत नेला. त्यांनी ‘सीता और गीता’ मध्ये डबल रोल करुन सगळ्यांना चकीत केलं होतं. याच सिनेमावर आधारित श्रीदेवीचा ‘चालबाज’ सिनेमाही आला होता आणि तो चांगलाच गाजलाही होता.

देवानंद आणि हेमामालिनी यांचीही जोडी हिट

१९७० मध्ये आलेला ‘जॉनी मेरा नाम’ हा हेमा मालिनी आणि देवानंद यांचा सुपरहिट सिनेमा होता. यातली गाणीही चांगलीच गाजली होती. हेमा मालिनी यांच्यावर चित्रित झालेलं ‘ओ बाबूल प्यारे…’ हे गाणं असेल किंवा ‘ओ मेरे राजा..’, ‘पल भर के लिये कोई मुझे प्यार कर ले’ ही देवानंद आणि हेमामालिनी यांच्यावर चित्रीत झालेली गाणीही सुपरहिट ठरली. ‘जोशीला’ आणि ‘आमीर गरीब’ या सिनेमांतही देवानंद आणि हेमामालिनी यांची जोडी होती जी सुपरहिट ठरली.

देवानंद आणि हेमामालिनी यांची जोडीही प्रेक्षकांना भावली (फोटो-फेसबुक)

राजेंद्र कुमार, राजेश खन्ना, देवानंद, अमिताभ बच्चन, जितेंद्र यांच्यासह हेमा मालिनी यांनी काम केलं आहे. मात्र हेमामालिनी या आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या. तसंच भरतनाट्यम या नृत्यकलेमुळे त्यांचं चिरतरुण राहणं हे देखील लोकांना भावलं. त्यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही आजही इतक्या सुंदर दिसता त्यामागचं कारण काय? त्यावर त्या हसून म्हणाल्या की तुमचा दृष्टीकोन चांगला आहे म्हणून मी तुम्हाला आजही सुंदर दिसते. कलाकार जितका विनम्र तितकाच तो लोकांना भावतो. हेमामालिनी यांचंही तसंच आहे. चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांची सेकंड इनिंगही चांगलीच चर्चेत राहिली. अमिताभ बच्चन यांच्यासह केलेला ‘बागबान’ हा चित्रपट लोकांना खूप आवडला. खरंतर हा सिनेमा काहीसा राजेश खन्ना यांच्या अवतार या सिनेमाची आठवण करुन देणारा होता. मात्र तरीही लोकांना हेमा मालिनी आणि अमिताभ यांची जोडी आवडली आणि लोकांनी या सिनेमाला चांगला प्रतिसादही दिला.
२०२० मध्ये आलेल्या ‘शिमला मिर्ची’ या सिनेमानंतर हेमामालिनी चित्रपटांत दिसलेल्या नाहीत.

शाहरुख खानला दिला ब्रेक

निर्माती म्हणून शाहरुख खानला सिनेसृष्टीत आणण्याचं श्रेय जातं ते हेमामालिनी यांनाच. ‘दिल आशना है’ मधून शाहरुख खानला त्यांनी आणलं. त्याच्या फौजी या सीरियलमधली भूमिका पाहून ‘दिल आशना है’ या सिनेमात त्यांनी शाहरुख खानला चान्स दिला. ‘दिवाना’ आणि चमत्कार हे दोन चित्रपट आधी रिलिज झाले. मात्र ‘दिल आशना है’ हा सिनेमा आधी सुरु झाला होता. या सिनेमात शाहरुख खान आणि दिव्या भारती यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘दिवाना’ या सिनेमात ऋषी कपूर हिरो होता. तर चमत्कार सिनेमात नसीरुद्दीन शाहची महत्त्वाची भूमिका होती. हिरो म्हणून पूर्ण लांबीच्या भूमिकेत शाहरुख दिसला तो दिल आशना है या सिनेमातच. त्यामुळे शाहरुखच्या यशातही हेमामालिनी यांचा सिंहाचा वाटा आहे यात शंकाच नाही.

हेमा मालिनी यांची गणना श्रेष्ठ अभिनेत्रींमध्ये का होते?

हेमा मालिनी यांची गणना त्यांच्या काळातला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रींमध्ये होते याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचा अभिनय, त्यांचं सौंदर्य आणि त्यांची खास अशी संवाद म्हणण्याची शैली. झीनत अमान यांच्यानंतर सर्वाधिक मानधन घेणाऱ्या त्या दुसऱ्या अभिनेत्री होत्या. सर्व प्रकारच्या भूमिकांचं शिवधनुष्य त्यांनी लिलया पेललं. २०२२ मध्ये आऊटलुकने बॉलिवूडच्या सर्वश्रेष्ठ ७५ अभिनेत्रींची यादी जाहीर केली होती त्यात हेमा मालिनी यांचं नाव पहिल्या दहा अभिनेत्रींमध्ये होतं. ड्रीम गर्ल हा जो टॅग त्यांच्या नावापुढे लागला तो अगदी कायमचाच. त्यामुळे ड्रीम गर्ल म्हटलं की हेमा मालिनी हे समीकरणही भारतीय सिनेमा प्रेक्षकांच्या मनात अगदी पक्कं बसलं आहे आणि ते तसंच राहिल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hema malini birth day special article know about films love life and other unknown things scj
Show comments