कर्नाटकात सुरू असलेला हिजाब वादाचा मुद्दा आता देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. राजकीय वर्तुळातून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. दरम्यान कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांच्या हिजाब घालण्यावरून वाद अद्याप सुरूच आहे. यावर आता अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री आणि भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी एएनआयशी बोलताना या विषयावर आपलं मत मांडलं. त्या म्हणाल्या, ‘शाळा किंवा महाविद्यालयं ही शिक्षणासाठी असतात. धर्मिक गोष्टी तिथे घेऊन जाणं योग्य नाही. प्रत्येक शाळेचा एक गणवेश असतो आणि त्याचा सन्मान सर्वांनी करायला हवा. शाळेच्या बाहेर तुम्हाला जे काही घालायचं आहे, त्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्हाला जे घालायचं ते तुम्ही घालू शकता.’
दरम्यान कर्नाटकातील उडुपी कॉलेजमध्ये हिजाब परिधान केल्याच्या घटनेने सुरू झालेल्या वादाचे देशभरात पडसाद उमटत आहेत. अनेक विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावरून आंदोलनं करताना दिसत आहे. हिजाबच्या विरोधात काही विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली होती. आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे. शैक्षणिक संस्थांमधील हिजाबवरील बंदी प्रकरण बुधवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या व्यापक खंडपीठाकडे प्रविष्ट करण्यात आल़े आहे त्यावर आज, गुरुवारी सुनावणी होणार आहे.
काय आहे प्रकरण
कर्नाटकातील उडुपी येथील एका महाविद्यालयात सहा मुलींना महाविद्यालयीन गणवेश परिधान न करता हिजाब परिधान केल्यामुळे त्यांना वर्गात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. यानंतर मुलींनी आंदोलन केले होते. कॉलेजला न जुमानता त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यानंतर हा वाद कर्नाटकातील अनेक कॉलेजांमध्ये पेटला आहे.