नवी मुंबईत आदर्श वृद्धाश्रम उभारण्याचे ड्रीमगर्ल हेमामालिनीचे स्वप्न अखेर भंगले. सिडकोच्या नवी मुंबई क्षेत्रात आता सामाजिक संस्थांनाही निविदेद्वारेच भूखंड घ्यावे लागत असल्याने रुपेरी पडद्यावरील ड्रीमगर्लला विस्तीर्ण असा भूखंड देण्यास सिडकोने असमर्थता दर्शवली आहे. जगप्रसिद्ध नृत्यांगना असणाऱ्या हेमा मालिनी मध्यंतरी सिडकोत आल्या होत्या. त्यांच्या नृत्य अकादमीसाठी भूखंड मागण्यास त्या आल्याची चर्चा होती पण प्रत्यक्षात त्यांना एक आदर्श वृद्धाश्रम उभारण्याची इच्छा आहे. ‘बागबान’ चित्रपटात ताटातूट झालेल्या दाम्पत्याची व्यक्तिरेखा चितारल्यानंतर त्यांनी वृद्धाश्रम बांधण्याचा निश्चय केला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर १३ मार्चला हेमामालिनी बेलापूर येथील सिडकोच्या मुख्यालयात आल्या होत्या. हेमामालिनीचे चित्रपट पाहतच मोठे झालेल्या सिडकोतील शेकडो अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहण्यास गर्दी केली होती. मुरबाडमध्ये अडीच वर्षांपूर्वी झालेल्या दुर्गा महोत्सवाच्या निमित्ताने हेमामालिनी यांचे हिंदुराव कुटुंबाबरोबर सलोख्याचे संबंध निर्माण झाले आहेत. त्यात हिंदुराव यांच्या एका नातेवाईकाचे चित्रपट क्षेत्राशी असलेल्या ऋणानुबंधामुळे हेमामालिनी एक महिन्यापूर्वी सिडकोत थेट हिंदुराव यांना भेटायला आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी खारघर, पनवेल, द्रोणागिरी परिसरात एका भूखंडाची मागणी केली, पण जमीन विल्हेवाट अधिनियम २००८ नंतर सिडकोने सामाजिक संस्थांना मागणीनुसार भूखंड देण्याची योजना बंद केल्याने सामाजिक वापरातील भूखंडही निविदेद्वारे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ड्रीमगर्लच्या मागणीनुसार भूखंड देता येणार नाही, असे सिडकोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. आचारसंहिता लागल्यामुळे याबाबत स्पष्ट काही सांगताही येत नव्हते. यापूर्वी सिडकोत सामाजिक वापरासाठी सुमारे ६०० भूखंड देण्यात आले आहेत. सामाजिक क्षेत्राच्या नावाखाली सिडकोने अशा भूखंडांची अक्षरश: खैरात केल्याची अनेक उदाहरणे आहेत. खारघरमध्ये सत्यसाईबाबा ट्रस्टला एक रुपया प्रती मीटर लीजने दिलेला भूखंड अशाच प्रकारात मोडणारा होता.
सत्यसाईबाबा ट्रस्टने भूखंड परत केला
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आग्रहामुळे केवळ एक रुपया प्रती चौरस मीटर दराने लीजवर खारघर येथे (सेंट्रल पार्कजवळ) देण्यात आलेला पाच एकरचा भूखंड या संस्थेने सिडकोला परत केल्याचे समजते. लीजचे कारण देऊन हा भूखंड परत करण्यात आला आहे. प्रत्यक्षात सत्यसाईबाबांच्या निधनानंतर संस्थेला आपल्या कार्याचा विस्तार करता येणे शक्य नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा