#MeToo या मोहिमेवर बॉलिवूडसह अन्य क्षेत्रातील महिलांनीही त्यांच्यावर झालेल्या अन्यायचं कथन केलं. त्यामुळे याप्रकरणी अनेक मान्यवरांची नावं समोर आली. मी टू या मोहिमेचा सर्वात जास्त प्रभाव बॉलिवूडवर पडला होता. यामुळे बी टाऊनमध्ये दोन गटही पडले होते. तर एक गट असा होता जो केवळ तटस्थपणे त्यांची भूमिका मांडत होता. यामध्ये आता अभिनेत्री हेमा मालिनी यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
ज्येष्ठ अभिनेता संजय खान यांच्या ऑटोबायॉग्राफी नुकतीच लॉन्च करण्यात आली. या सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. यात हेमा मालिनी यांचीदेखील उपस्थिती होती. यावेळी प्रसारमाध्यमांनी हेमा मालिनी यांना #MeToo मोहिमेविषयी काही प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तर देताना ‘मी टू विषयी मला काहीच वाटत नाही’ असं म्हटलं आहे.
‘सध्या जे काही घडत आहे ते पाहून मला काहीच वाटत नाहीये. अनेकांना हे धक्कादायक वाटत असेल परंतु मला तसं काहीच वाटत नाही. यात धक्कादायक असं काहीच नाही’, असं हेमा मालिनी म्हणाल्या.
पुढे त्या असंही म्हणाली, ‘देशभरामध्ये सध्या सारेच जण metoo विषयी बोलत आहेत. व्यक्त होत आहेत. काही जण महिलांना पाठिंबा देत आहेत. तर काही जण टीकाही करत आहेत. पण या साऱ्यामध्ये महिलांना स्वत:चं रक्षण स्वत:च करावं लागणार आहे. त्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्यात अर्थ नाही. कोणती व्यक्ती कशी आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे’. हेमा मालिनी यांनी ‘मी टू’ यावर दिलेली ही प्रतिक्रिया ऐकून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे त्या चर्चेमध्ये आल्या आहेत.