भारतरत्न लता मंगेशकर यांची आज जयंती आहे, त्यानिमित्ताने अनेक कलाकारांसह चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज ठाकरे आणि अनेक नेतेमंडळींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. टीव्ही अभिनेत्री हेमांगी कवीनेही फेसबूक पोस्ट करत लतादीदींची आठवण काढली. हेमांगीने पोस्टमध्ये तिचं आणि लतादीदींचं अनोखं नातं असल्याचा उलगडा केलाय.
“मला जर कुणी विचारलं दैवी म्हणजे काय तर मी म्हणेन ‘हा आवाज’, जादू म्हणजे काय तर हा आवाज, निखळ, नितळ, तरल म्हणजे काय तर हा आवाज, शाश्वत म्हणजे काय तर हा आवाज! आमचं भाग्य ज्या शतकात हा आवाज जन्माला आला त्याच शतकात, काळात आम्ही जन्माला आलो! धन्य धन्य झालो आम्ही! आपण लहान माणसं अशा महान व्यक्तींशी काही न काही साम्य जोडत असतो. आवाजाची साम्यता जोडायला मला १० जन्म घ्यावे लागतील पण तुमचं पहीलं आणि खरं नाव ‘हेमा’ आहे कळल्यावर मला किती किती धन्य वाटलं होतं काय, कसं सांगू? हेमा/ लता मंगेशकर वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!,” अशी पोस्ट तिने शेअर केलीय.
लता मंगेशकर यांचा जन्म झाल्यानंतर नामकरणावेळी त्यांचे नाव ‘हेमा’ असं ठेवण्यात आलं होतं. त्यांचे वडील दिनानाथ मंगेशकर यांनी ‘भावबंधन’ नावाच्या नाटकात काम केलं होतं. त्या नाटकात मुख्य स्त्री पात्राचं नाव ‘लतिका’ होतं. त्यांना हे नाव खूप आवडल्याने त्यांनी दीदींचं नाव बदलून ‘लता’ केलं. त्यांचं नाव हेमा होतं, हे ऐकल्यानंतर आपल्याला खूप आनंद झाल्याचं हेमांगीने सांगितलंय.