करोनामुळे देशात अत्यंत वाईट आणि हृदय पिळवटून टाकणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण मुंबईत लॉकडाऊन जाहीर केल्यापासून करोना रूग्ण संख्या हळुहळु ओसरताना पहायला मिळतेय. रुग्णालयात बेड, ऑक्सिजन मिळवण्यासाठीची धडपड, करोना कमी करण्यासाठी जाहीर केलेला लॉकडाऊन आणि यामधून बिघडलेले आर्थिक गणित या सगळ्यांशी सामना करत मुंबईकरांनी संयम ठेवत कठोर निर्बंध पाळले आणि करोना रूग्ण संख्या ओसरण्याच्या अगदी जवळ मुंबईकर पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत मुंबईकरांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी अभिनेत्री हेमांगी कवीने तिच्या फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मिडीयावर वाऱ्यासारखी व्हायरल झालीय.

अभिनेत्री हेमांगी कवी ही नेहमीच तिच्या सोशल मीडियावर आपले रोखठोक मत मांडत असते. अभिनेत्री हेमांगी कवी ही आपल्या अभिनयाबरोबरच आपल्या रोखठोक मतांसाठी देखील प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे तिचे चाहते आणि सोबतच सोशल मीडियाची ट्रोल आर्मी मोठ्या प्रमाणात तिला फॉलो करतात. आताही असेच झाले असून तिने व्यक्त केलेली एक पोस्ट सध्या व्हायरल होतेय.

या पोस्टमध्ये तिने लिहीलंय, “दर 10 मिनिटांनी ऍम्ब्यूलन्सचे येणारे आवाज कमी झालेत. मुंबईची परिस्थिती सुधारतेय. सकारात्मक ! अजून थोडा संयम मंडळी ! हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, पोलिस डिपार्टमेंट, फ्रंटलाईन वर्कर्स तुम्हाला आणखी शक्ती मिळू देत! अशा शब्दांमध्ये तिने ही पोस्ट लिहीली आहे. या पोस्टसोबत तिने #StayStrongIndia हा हॅशटॅग देखील वापरलाय.

एकीकडे मुंबईत करोना संख्या घटत असताना हेमांगी कवीची ही पोस्ट मुंबईकरांना जोश देणारी ठरतेय. गेल्या काही दिवसांपासून करोनाचा हाहाकार आणि त्याला लढा देत आतापर्यंत रूग्णालयातील डॉक्टरांना देखील रडू कोसळल्याच्या बातम्या दिसून आल्या. अशा परिस्थीतीत आता मुंबईकरांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला असून करोनाला हरवण्याच्या जवळजवळ आले असताना मुंबईकरांना आणखी सकारात्मक करणारी ही पोस्ट ठरलीये. या पोस्टवर हेमांगीच्या फॅन्सनी आणि इतर सेलिब्रीटींनीही कमेंट्स केल्या आहेत.

स्टार भारत चॅनलवर तिच्या ‘तेरी लाडली मै’ या मालिकेने नुकताच निरोप घेतलाय. याबाबतची एक पोस्ट तिने सोशल मिडीयावर टाकली होती. स्टार प्रवाहवर ‘मुलगी झाली हो’ ही मालिका चांगलीच गाजली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळू लागला. म्हणून याच कथेची मालिका हिंदी मध्ये स्टार भारत या चॅनलवर सुरू केली होती. या मालिकेत हेमांगी कवीने उर्मिलाची भूमिका साकारली आहे. पंरतू करोना काळातल्या परिस्थितीमुळे ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Story img Loader