First Class Dabhade : मराठी मनोरंजन विश्वात सध्या ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाची मोठी चर्चा सुरू आहे. २४ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यातील कौटुंबिक वाद, प्रेम आणि नात्यातील जिव्हाळा रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तिकीट बारीवर सध्या हा चित्रपट जोरदार कमाई करताना दिसत आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे. तर यामध्ये क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, निवेदिता सराफ, अमेय वाघ, राजन भिसे, हरिष दुधाडे या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. कलाकारांची तगडी स्टारकास्ट आणि कौटुंबिक चित्रपट असल्याने प्रेक्षक या चित्रपटावर भरभरून प्रेम करत आहेत. या चित्रपटामुळे क्षिती जोग आणि हेमंत ढोमे दोघे पती पत्नीसुद्धा चर्चेत आहेत. नुकतेच या दोघांनी घटस्फोटाच्या वाढलेल्या प्रमाणावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या जोडप्याने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना घटस्फोटाच्या वाढलेल्या प्रमाणाबद्दल त्यांचं मत विचारण्यात आलं. यावर हेमंत आणि क्षिती या दोघांनी सध्याच्या पिढीवर काही भाष्य केलं. तसेच घटस्फोटाच्या वाढलेल्या प्रमाणावर त्यांना काय वाटतं हे सांगितलं. आपलं मत सांगताना क्षिती म्हणाली की, “आताच्या पिढीचा लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मनावर जास्त दबाव ठेवून ते याकडे पाहतात. लग्न झालं म्हणजे आम्ही आयुष्यासाठी बांधले गेलो आहोत, अशा पद्धतीने लग्नाकडे पाहिलं जातं. असे अनेक विचार नवीन पिढीच्या डोक्यात येतात आणि ते लग्न न करण्याचा निर्णय घेतात.”
तसेच घटस्फोटाचे वाढलेले प्रमाण पाहता त्यावर बोलताना हेमंत ढोमेने सांगितलं की, “अनेकदा घटस्फोट तरुणांच्या अंतर्गत रिलेशनशिप्समुळे होतो. घटस्फोट घेणं आजकाल फार सोप्पं झालं आहे. जास्तीत जास्त आपण वेगळे होऊ, असा विचार तरुण पिढी करते.” त्याला जोडून क्षिती पुढे सांगते की, “हे एका अर्थाने बरोबरसुद्धा आहे, कारण अनेकदा जोडप्यांचं एकमेकांशी अजिबात पटत नाही. आम्ही सर्व प्रयत्न करून पाहिले, मात्र तरीही आम्ही या नात्यात सुखी नाही, असं असल्यास तुम्ही वेगळं होऊ शकता. कारण फक्त लग्न झालं आहे म्हणून आम्ही एकत्र राहतो असं म्हणणं आणि सुख नसलेल्या संसारात राहण्यात काहीच अर्थ नाही.”
आई बाबांना घटस्फोट देता येत नाही…
पुढे हेमंतने पती पत्नीचे नाते तुटू नये यासाठी कसा विचार केला पाहिजे यावर सांगितलं की, “आपण आपल्या आईला घटस्फोट देत नाही, बाबांना घटस्फोट देत नाही. विचार जुळले नाही तरी ते आपले आहेत आणि आपण त्यांना समजून घेतो, त्यामुळे आपण जेव्हा लग्न करतो आणि ही व्यक्ती आपल्याबरोबर आयुष्यभर साथ देण्यासाठी असावी असं ठरवतो, तेव्हा त्या पद्धतीने समजून घेतले पाहिजे.”
घटस्फोट झाला म्हणजे आयुष्य संपलं…
“घटस्फोट झाला म्हणजे त्या व्यक्तीचं आयुष्य संपलं असं होत नाही. मी अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत, ज्यामध्ये घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करून व्यक्ती सुखी आहेत; तर काही जण दुसरं लग्न न करता एकटे राहूनही सुखी आहेत”, असं क्षितीने या मुलाखतीत सांगितलं आहे.