काही महिन्यांपूर्वी मराठी रंगभूमीवर एक नवं कोरं खणखणीत नाटक आलं, ज्याचं नाव आहे ‘भूमिका.’ या नाटकाच्या माध्यमातून २१ वर्षांनी सचिन खेडेकर व्यावसायिक रंगभूमीवर पुन्हा एकदा आले. क्षितिज पटवर्धन लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘भूमिका’ या नाटकात सचिन खेडेकर एका सशक्त भूमिकेत पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासह या नाटकात समिधा गुरू, अतुल महाजन, सुयश झुंजूरके, जयश्री जगताप, जाई खांडेकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सध्या ‘भूमिका’ या नाटकाचं सर्वत्र कौतुक होतं आहे. नुकतीच हेमंत ढोमेनं ‘भूमिका’ नाटकाविषयी खास पोस्ट लिहिली आहे.
हेमंत ढोमेनं ‘भूमिका’ या नाटकाचा सचिन खेडेकरांचा पोस्टर शेअर करून लिहिलं, “Ours is a battle, not for wealth nor for power. Ours is a battle for freedom, for reclamation of human personality! – Babasaheb Ambedkar…हा विचार खूप मोठा आहे आणि एका महामानवाने तो रुजावा यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं! इतरांसाठी, समाजासाठी आयुष्य वेचणारे आता घडत नाहीत हे तर खरं आहेच. पण, या विचारांची खुंटी बळकट करणारे देखील खूप कमी आढळतात…पण, पण, पण ( हे म्हणताना मन अक्षरशः नाचतंय ) “
पुढे हेमंत ढोमेनं लिहिलं, “आजच्या या कठीण काळात जिथं माणूस स्वार्थी होतं चाललाय, विचारांची बैठकच हरवून बसलाय त्या काळात रखरखीत उन्हात विचारांच्या सावलीचा आल्हाददायक गारवा देणारं एक भक्कम सशक्त नाटक तुम्हा आम्हा सगळ्यांच्या भेटीला आलंय… डोळ्यात पाणी आणून आपल्याला जागं करणारं, विचार करायला भाग पाडणारं हे नाटक आपल्या जवळच्या माणसाने लिहिलं आहे, याहून जास्त अभिमानाची गोष्ट नाही! क्षितिज पटवर्धन या माझ्या अत्यंत हुशार लेखकाचं हे नाटक चुकवायचं नाही म्हणजे ते चुकवून चालणारंच नाही!”
“भंपक, सपक, गोडी गुलाबी वगैरे असल्या मनोरंजनाच्या मागे धावणाऱ्या या काळात हे नाटक भारतीय रंगभूमीवरचा मैलाचा दगड ठरणार यात तिळमात्रही शंका नाही. डावं-उजवं-मधलं असं कुठलंही न राहता ( तारेवरची अवघड कसरत करत ) माणसाचं माणूसपण महत्त्वाचं हे पुन्हा एकदा अधोरेखित केल्याबद्दल क्षितिजसह संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार. क्या बात है क्षितिज मित्रा… असाच लिहीत राहा… आता जबाबदारी अत्यंत वाढलीय, आम्ही सगळे तुझ्याकडे आशेने पाहतोय…आता थांबायचं नाही. जी साथ लागेल ती कायम देत राहणार,” असं हेमंतनं लिहिलं आहे.
नंतर हेमंतनं सचिन खेडेकरांच्या कामाचं कौतुक करत लिहिलं की, या सगळ्यात एक अत्यंत महत्त्वाचा जादूई नट, होय जादूईच. या नाटकात आहे जो हा सारा विचार आपल्या कानांना सुखावह करत थेट काळजात पोहोचवतो तो म्हणजे सचिन खेडेकर. आमच्या आवाक्याबाहेरचा आवाका आहे या नटाचा… निशब्द! लाजवाब अभिनय… लाजवाबच! मंडळी हा अभिनय तर कृपया चुकवू नका. कळकळीची विनंती आहे…आजच्या काळात ‘भूमिका’ घेणारं चंद्रकात कुलकर्णी दिग्दर्शित हे नाटक कृपया लवकरात लवकर बघा. या नाटकाच्या मागे भक्कपणे उभ्या असलेल्या निर्मात्यांचं विशेष कौतुक, आदर आणि संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन. Proud… Proud… Proud!!!”
दरम्यान, हेमंत ढोमेच्या या पोस्टनं सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेलं आहे. या पोस्टवर इतर कलाकारांसह चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आदिनाथ कोठारे, क्षितिज पटवर्धन, सचिन खेडेकर, सुयश झुंजूरके यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.