Hemant Dhome : गेल्या काही दिवसांपासून अभिनेते राहुल सोलापूरकर हे चर्चेत आले होते. एका पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत त्यांनी केलेल्या एका विधानावरून वाद निर्माण झाला होता. राहुल सोलापूरकर यांच्यावर या विधानासाठी सामान्य नागरिकांप्रमाणेच राजकीय वर्तुळातूनही टीका-टिप्पणी केली जात होती. दरम्यान अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याने राहुल सोलापूरकर यांना स्वस्तातले इतिहासाचार्य असं म्हटलं आहे आणि त्यांच्यावर टीका केली आहे.
राहुल सोलापूरकर यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
राहुल सोलापूरकर यांनी एका यूट्यूब चॅनलवरच्या पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत विधान केलं होतं. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण कळावं म्हणून हिरकणीची कथा रचली गेली आहे. गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे वगैरे सांगत. हिरकणी घडलेलीच नाही. असं काहीही नाही. असा इतिहासच नाही. पण ते लिहिलं गेलं. महाराज आग्र्याहून सुटले ते मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते. महाराज चक्क लाच देऊन आले आहेत. त्यासाठी किती हुंड्या सोडवल्या याचे पुरावे आहेत. औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली गेली. मौसिन खान किंवा मोईन खान नाव आहे त्याचं. त्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले होते. स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले त्याच्या परवान्याची खूणही आहे अजूनही. गोष्टी रुपात करताना ते रंजक करुन सांगितलं गेलं आहे. त्यामुळे खरा इतिहास लोकांसमोर जात नाही”, असा दावा राहुल सोलापूरकर यांनी केला होता.
हेमंत ढोमेची पोस्ट काय?
इतिहासाला त्याच्या जागी राहूद्या! आम्हाला आमच्या महाराजांच्या “रंजक” गोष्टींमधेच रमूद्या! रोज उठून नवा इतिहास सांगणारे स्वतःचे भविष्य अंधारात असणारे असतात! असल्या दुर्लक्षित आणि स्वतःकडे लक्ष वेधू पाहणाऱ्या स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सूज्ञांनी लक्ष न दिलेले बरे! उगाच सगळे सोलापूरकर बदनाम होतात! अशी पोस्ट हेमंत ढोमेने केली आहे.
राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केली दिलगिरी
दरम्यान, लाच शब्द वापरल्याबद्दल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. “साम-दाम-दंड-भेद या चारही बाबतींत छत्रपती शिवराय फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले यावर मी वेगळं काही संगायची गरज नाही. छत्रपती राजश्री शाहू महाराजांची भूमिकाही मी अत्यंत व्यवस्थित पार पाडली होती. सगळा इतिहास अभ्यासून. जगभर गेली अनेक वर्षं वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतची अनेक व्याख्यानं मी दिली आहेत. जगभरातल्या लोकांनी ते वाखाणलेलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचं माझ्या मनातही येऊ शकत नाही. कुणीतरी फक्त त्या पॉडकास्टमधली दोन वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असं हा बोलला असं म्हणून त्यावरून गदारोळ उठवण्याचा प्रयत्न केला आहे”, असं राहुल सोलापूरकर स्पष्टीकरणाच्या व्हिडीओत म्हणाले आहेत.