राम मंदिर उभारण्याची मागणी घेऊन काही हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत एकत्र येणार आहेत. दसरा मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी आपण २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार हजारो शिवसैनिकांसह उद्धव ठाकरे सहपरिवार अयोध्येत दाखल झाले आहेत. या दौऱ्यावर जाताना शिवनेरी गडावरील मातीचा कलशही त्यांनी सोबत घेतला आहे. या संपूर्ण घटनेवर अभिनेता हेमंत ढोमेनं ट्विट करत सणसणीत टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती अयोध्येला जाणार. का? काय संबंध? म्हणजे काय करायचंय नेमकं? अहो मातीत चाललेले त्यांचे गडकिल्ले बांधायचं बघा आधी. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागायची जुनी खोड,’ अशी संतप्त प्रतिक्रिया त्याने दिली आहे. ते मंदिर बांधून दुष्काळ मिटेल? शेतकरी आत्महत्या थांबतील? गरिबी जाईल? भूकबळी थांबतील? दरवाढ कमी होईल? मरण स्वस्त होईल? अन्न, वस्त्र, निवारा सगळं मिळेल, असे प्रश्न त्याने उपस्थित केले आहेत. इतकंच नव्हे तर शिवनेरी गडावरील माती नेण्यामागचं कारण काय असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारलं असता त्यावर उत्तर देताना हेमंतने शिवसेनेला टोमणा मारला आहे. ‘प्रभु रामचंद्राचे भक्त होते छत्रपती शिवाजी महाराज! म्हणून त्यांच्या ढासळलेल्या किल्ल्याची माती मंदिर बांधायला न्यायचीय! तसा खूप व्यापक आणि गहन विचार आहे. आपल्या सगळ्यांना काळाच्या पुढे घेऊन जाणार हे सग्गळं! खुप पुढे,’ असं तो म्हणाला.

दरम्यान, २५ नोव्हेंबरला (रविवारी) उद्धव ठाकरे सहपरिवार सकाळी ९ वाजता रामलल्लाचे दर्शन घेतील. दरम्यान, एका सभेद्वारे उपस्थितांना ते संबोधित करणार आहेत. या ठिकाणी ते हिंदीतून भाषण करण्याची शक्यता आहे. यावेळी राम मंदिर उभारण्याची आग्रही मागणी करण्यात येणार आहे. शिवसेना-भाजपामधील तणावाचे वातावरण पाहता या सभेमध्ये मोदी सरकारसह फडणवीस सरकारवरही उद्धव ठाकरे बरसण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hemant dhome reaction on shiv sena chief uddhav thackeray ayodhya visit
Show comments