Hemant Dhome on Namdev Dhasal Poetry Censor Board : बंडखोर कवी व दलित पॅथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या चळवळीवर भाष्य करणारा एक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. ‘चल हल्ला बोल’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट प्रामुख्याने दलित पँथर, युवा क्रांती दल या चळवळीवर आधारित आहे. हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. परंतु, सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील नामदेव ढसाळांच्या कवितांवर आक्षेप घेतल्याचा दावा चित्रपटाच्या टीमने केला आहे. तसेच सेन्सॉर बोर्डाने या कविता चित्रपटातून हटवण्यास सांगितलं आहे. या कवितांमध्ये शिव्या आहेत, अश्लीलता आहे असं मत सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्याने मांडल्याचं चित्रपटाच्या टीमने सांगितलं. तसेच या अधिकाऱ्याला नामदेव ढसाळांबाबत माहिती दिली असता त्याने “कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही”. असं उद्दाम वक्तव्य केल्याचा दावा चित्रपटाच्या टीमने केला आहे. यामुळे दलित चळवळीतील कार्यकर्ते व महाराष्ट्रातील जनतेकडून संताप व्यक्त केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

दरम्यान, प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेता हेमंत ढोमे याने या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे. ढोमे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की “जातीचा सैतान कुठं नेऊन पुरावा?” हा प्रश्न विचारणारा आणि अनेकांना खटकणारा पँथर होते नामदेव ढसाळ! आता या सैतानांना सोईने हे नाव विसरायचं असेल तर त्यांना ठणकावून सांगा… समता आणि मानवतेचा प्रसार करणारे पॅंथर होते नामदेव ढसाळ! महाराष्ट्राने, देशाने जगभरात सगळ्यांनी गौरवलेला… बहुजनांचा नायक, अफाट वैश्विक महाकवी होता ‘नामदेव ढसाळ’. आपण ठणकावून सांगितलं तर आणि तरंच हे चित्र बदलेल! नुसता एक माणूस हाकलून चालणार नाही, आख्खी व्यवस्थाच बदलावी लागणार आहे. या नायकाने पेटवलेली माणसं पुन्हा पेटवावी लागणार!”

दरम्यान, नामदेव ढसाळ यांच्या पत्नी व ज्येष्ठ कवयित्री मलिका अमिर शेख यांनी देखील या सगळ्या प्रकारावर संताप व्यक्त केली आहे. अशा उद्दाम अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्यात यावं अशी मागणी मलिका अमर शेख यांनी केली आहे. तसेच त्यांनी याप्रकरणी सरकारला जाब विचारला आहे की, अशा व्यक्तीची तुम्ही सेन्सॉर बोर्डावर कशी काय नियुक्ती करता?

मलिका अमर शेख यांचा संताप

मलिका अमर शेख यांनी सोमवारी (१ मार्च) प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, “ज्या माणसाने त्याच्या शब्दप्रभूत्त्वाने संपूर्ण मराठी साहित्याला उज्ज्वल केलं. जाने केवळ आपल्या मातीतच नव्हे तर जागतिक साहित्यात नाव कमावलं. जगभर आपल्या मराठीचा झेंडा मिरवला, त्या माणसाचं नाव घेऊन तुम्ही त्यांचा अपमान करता. नामदेव ढसाळ यांचा अपमान करणाऱ्या त्या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करायला हवं. मी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करते. त्या माणसाला त्याच्या पदावरून काढून टाकलं पाहिजे, अशी मी मागणी करते. मुळात अशी माणसं तुम्ही इतक्या महत्त्वाच्या पदांवर नेमताच कशी?”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hemant dhome slams censor board as cbfc officers ask who is namdev dhasal asc