अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या खासगी आयुष्याबाबत नेहमीच बिनधास्तपणे बोलताना दिसली आहे. २०१८ मध्ये जेव्हा सुष्मितानं स्वतः पेक्षा वयाने लहान असलेल्या रोहमन शॉलला डेट करायला सुरुवात केली तेव्हाही तिनं आपल्या नात्याबाबत कोणतीही गोष्ट लपवून ठेवली नव्हती आणि त्यानंतर रोहमनशी ब्रेकअप झाल्याचे ही तिने सोशल मीडियावर एक पोस्ट करत सांगितले. आता एका लाइव्हमध्ये सुष्मिताने ब्रेकअपचे कारण सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच सुष्मिताने इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी तिने अप्रत्यक्षपणे रोहमनसोबतच्या ब्रेकअपचे कारण सांगितले आहे. ‘माझ्या आयुष्यात प्रेमापेक्षा जास्त आदराला महत्व आहे. ज्या नात्यामध्ये केवळ प्रेमावर लक्ष केंद्रीत केले जाते ते नाते फार काळ टिकत नाही. एकमेकांचा आदर हा करायलाच हवा’ असे सुष्मिता लाइव्हमध्ये म्हणाली होती.

या इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये सुष्मितासोबत तिच्या दोन मुली रिनी आणि अलिसा देखील होत्या. पुढे लाइव्हमध्ये सुष्मिता म्हणाली की, ‘प्रेम ही अशी भावना आहे जी तुम्हाला जाणवते आणि अचानक एक दिवस तुमच्या आयुष्यातून निघूनही जाते. पण ज्या नात्यामध्ये आदर नसतो तेथे प्रेमाला काही महत्त्व नसते. तुम्ही एकमेकांचा आदर करत असाल तर प्रेम पुन्हा आपली जागा मिळवते. प्रेमावर लक्ष केंद्रीत करुन कोणतेही नाते टिकत नाही.’

सुष्मिता आणि रोहमन यांची जोडी सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय होती. हे दोघंही लवकरच लग्न करतील असं बोललं जात होतं. सुष्मिता आणि रोहमन यांच्या वयात जवळपास १० वर्षांचं अंतर होतं. मात्र तरीही त्यांच्यातील बॉन्डिंग नेहमीच चांगलं होतं. एवढंच नाही तर रोहमन सुष्मिताच्या मुलींना स्वतःचं कुटुंब मानत होता. दरम्यान आता त्या दोघांचे ब्रेकअप झाले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Here is a reason of sushmita sen and rohman shawl breakup avb