‘फँटम’ हे नाव ऐकताच अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी, विकास बहल आणि मधू मंटेना ही चार नावं डोळ्यांसमोर येतात. या निर्मिती संस्थेच्या बॅनरअंतर्गत अनुरागने ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटांची सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणली. तर फँटमअंतर्गत विक्रमादित्यने ‘लुटेरा’, विकास बहलने ‘क्वीन’ आणि मधू मंटेनाने ‘ट्रॅप्ड’ या चित्रपटांची निर्मिती केली. मात्र आता हे चौघे या बॅनरअंतर्गत एकत्र काम करणार नाहीत. कारण या चौघांनी आपापले मार्ग वेगळे केले असून फँटम कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विक्रमादित्य मोटवानीने ट्विट करत याची घोषणा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मी, विकास, मधू आणि अनुराग आम्ही चौघांनी मिळून फँटमची पार्टनरशिप तोडण्याचा निर्णय घेतला आहे. फँटमचा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत मजेशीर आणि अविस्मरणीय राहिला. माझे हे तीन पार्टनर माझ्या कुटुंबियांसारखे आहेत. सात वर्षांपर्यंत आम्ही एकमेकांची साथ दिली. त्या तिघांनाही मी भविष्यासाठी शुभेच्छा देतो,’ असं ट्विट मोटवानीने केलं.

Video: रणवीर- दीपिकाचा ‘खलीबली’ डान्स पाहिलात का?

दमदार चित्रपटांसोबत फँटमने तुफान लोकप्रिय झालेल्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजचीसुद्धा निर्मिती केली होती. त्यामुळे ही संस्था अचानक बंद करण्यामागचं नेमकं कारण तरी काय असा प्रश्न अनेकांना पडला. ‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार दिग्दर्शक विकास बहलवर महिलेसोबत गैरवर्तणुकीचे आरोप झाल्यापासून चौघांमध्ये मतभेद सुरु झाले. ‘क्वीन’ चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल याच्यावर एका तरुणीने छेडछाडीचा आरोप केला होता. तेव्हापासून अनुराग आणि विकास यांच्यात वाद सुरू झाले. या चौघांची पार्टनरशीप तुटण्यामागे हे सर्वांत मोठं कारण असल्याचं म्हटलं जात आहे.

https://twitter.com/VikramMotwane/status/1048303234308177920

अनुराग कश्यपनेही ट्विट करत फँटमविषयी लिहिलं, ‘फँटम एक स्वप्न होतं, एक अत्यंत सुंदर स्वप्न आणि प्रत्येक स्वप्नाचा अंत हा होतोच. आम्ही खूप मेहनत केली, यशस्वी ठरलो आणि फेलसुद्धा झालो. पण यापुढे आम्ही आणखी मजबूत होऊन पुढे येऊ आणि आपापल्या मार्गावर चालत स्वप्न पूर्ण करू.’
अनुराग, विकास, मधू आणि विक्रमादित्य हे गेल्या सातहून अधिक वर्षांपासून एकत्र काम करत होते. नुकत्याच या निर्मिती संस्थेनं ‘मनमर्जियां’ चित्रपटाची निर्मिती केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Here is why anurag kashyap vikramaditya motwane phantom films is headed for dissolution