‘बिग बॉस’च्या घरातले वातावरण कसे ही असो, या कार्यक्रमाची आणि यातील स्पर्धकांची चर्चा प्रेक्षकांमध्ये चांगलीच रंगते. ‘बिग बॉस’च्या घरातील प्रत्येक स्पर्धकाचा खास असा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील या स्पर्धकांच्या वस्तू मिळवण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. ऑनलाइन खरेदी-विक्रीसाठीची वेबसाइट ‘ओएलएक्स.इन’च्या (OLX.in) साह्याने ‘बिग बॉस’ ही संधी चाहत्यांना उपलब्ध करून देत आहे. या उपक्रमातून मिळणारी धनराशी समाजसेवेच्या कार्यासाठी वापरण्यात येणार आहे. देशातील ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या ‘टच’ (Touch) या सामाजिक संस्थेला ही जमाराशी सुपूर्द करण्यात येणार आहे.
सध्या ‘बिग बॉस’च्या घरात ‘अंतिम आठ’मध्ये तमिषा मुखर्जी, अरमान कोहली, व्हिजे अॅण्डी, संग्राम सिंग, कुशाल टंडन, गौहर खान, एजाझ खान आणि कामया पंजाबी यांचा समावेश आहे. या उपक्रमात ‘बिग बॉस’ स्पर्धकांचे डिझायनर कपडे, त्यांनी वापरलेल्या फॅशनेबल वस्तू, दागिने आणि अन्य काही वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
आपल्या आवडत्या स्पर्धकाची वस्तू मिळवण्यासाठी ११ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या वेळेत चाहत्यांनी OLX.in वेबसाइटवर लॉग इन करून, ‘घर बैठे दुआ कमाओ’ या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे. आपल्या आवडत्या स्पर्धकाची वस्तूची निवड करून ती वस्तू खरेदी करण्यासाठीची किंमत नोंदवायची आहे. तुम्ही दिलेला पैसा ग्रामीण भागातील मुलांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी वापरण्यात येणार असल्याने जास्तीत जास्त किंमत नोंदवण्याचे आवाहन उपक्रमकर्त्यांमार्फत करण्यात आले आहे. १२ डिसेंबर रोजी वैयक्तिक ई-मेलद्वारे भाग्यवान विजेत्याचे नाव घोषित केले जाईल.

Story img Loader