एखादी कथा वा कादंबरीवर आधारित नाटक वा चित्रपट म्हटलं की त्याची मूळ रूपाशी तुलना केली जातेच. त्यातही साहित्यिकांचे चाहते तर काकदृष्टीनेच त्या कलाकृतीची चिरफाड करतात. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही, की प्रत्येक माध्यमाची गरज आणि हाताळणी वेगवेगळी असते. त्यानुरूप त्यात बदल करणं आवश्यक असतं. माध्यमांतरात काहीएक वेगळं अर्थनिर्णयन करायचं असू शकतं. त्यासाठी मूळ कथा वा कादंबरीतील घटना-प्रसंगांची पुनर्माडणी, त्यात बदल किंवा वेगळी भरही घालावी लागते. कारण तो त्या सर्जकाचा आविष्कार असतो. त्यामुळे मूळ साहित्यकृतीपेक्षा नवी कलाकृती अधिक उंचीवर जाऊ शकते. सत्यजीत रे, श्याम बेनेगल यांच्यासारख्या चित्रपट दिग्दर्शकांनी हे सिद्ध केलेलं आहे. म्हणूनच अशी तुलना करणं योग्य नव्हे. सदानंद देशमुख यांच्या ‘पात्र’ या कथेवर आधारित राम दौंड लिखित-दिग्दर्शित ‘हे राम’या नाटकानं हे पुनश्च एकदा सिद्ध केलं आहे. त्यांनी मूळ कथेला नवे संदर्भ देऊन ती अधिक सघन, सखोल आणि प्रत्ययकारीतेनं सादर केली आहे.

एका गावी दरवर्षी रामनवमी उत्सवात रामकथेवर नाटक सादर केलं जातं. त्यात अनेक सोंग नाचवली जातात. महाराष्ट्रात अनेक गावांत अशी लोककला परंपरा श्रद्धेनं जपली जाते. पिढय़ानुपिढय़ा चालत आलेली सोंगं काढण्याची ही परंपरा आता मोडीत निघणार की काय असा प्रश्न गावात निर्माण होतो. कारण सोंगं काढणारी आधीची पिढी थकलेली असते. आपल्या वारसांनी आता ही धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी अशी या पिढीची अपेक्षा असते. परंतु तरुण पिढीला त्यात जराही रस नसतो. मात्र, ही परंपरा खंडित करणं वयस्कांना मंजूर नसतं. मग नाइलाजानं आपल्याला जमेल, झेपेल तोवर आपणच ही प्रथा पाळू या असं ते ठरवतात.

यात रामाचं पात्र साकारणारा प्रभू हा मांग समाजातला एक गरीब तरुण आहे. त्याला हे पात्र रंगवण्याची नशा आहे. गावात त्यामुळे त्याला मान मिळतो; जो त्याचा आत्मसन्मान वाढवतो. १८८५ साली न्या. महादेव गोविंद रानडे यांनी गावात उत्सवावरून झालेल्या तंटय़ात निकाल देताना मांग समाजातील प्रभूच्या घराण्याला हा मान बहाल केलेला आहे. आणि याचा प्रभूला सार्थ अभिमान आहे. गावाबाहेर मसणवटीनजीक राहणारा प्रभू बायकोसह रोजंदारीवर मजुरी करून कशीबशी गुजराण करत असतो. त्याच्या मोडकळीला आलेल्या झोपडीची डागडुजी करायला त्यांच्याकडे पैसे नसतात. तरीही रामाचं पात्र साकारण्यासाठी तो पदरचे पैसे खर्च करत असतो. त्याकरता कर्ज काढून ते वर्षभर तो फेडत बसतो. रामाचं पात्र साकारण्यापूर्वी दीडेक महिना तो शुचिर्भूत होण्यासाठी आहार, मैथुनादी गोष्टींपासून श्रद्धेनं दूर राहतो. त्याच्या बायकोला (नागीताला) त्याचं हे सोंग वठवणं बिलकूल आवडत नाही. हाता-तोंडाची गाठ पडण्यासाठी राब राब राबूनही चार सुखाचे घास मिळत नसताना हे नस्ते धंदे करणाऱ्या नवऱ्याविषयी तिला चीड असते. पण प्रभूच्या या वेडापुढे तिचं काही चालत नाही.

यंदा नवमीच्या उत्सवाचं चित्रीकरण करण्यासाठी डिस्कव्हरी चॅनलची टीम येणार असल्याचं वर्तमान कळल्यावर सोंगं घेण्यासाठी गावकऱ्यांमध्ये अहमहमिका सुरू होते. तरणी पोरंही त्यासाठी पुढं सरसावतात. टीव्हीवर नाटकाचं प्रक्षेपण होणार असल्याने त्यात काम करणारे प्रकाशझोतात येणार असतात. प्रथम रामाची मुलाखत चित्रित केली जाणार असते. त्यामुळे अचानक प्रभूला महत्त्व येतं. गावातल्या नेत्यांना प्रभूला मिळालेलं हे महत्त्व चांगलंच खुपतं. पण त्यांचा नाइलाज असतो. ते मग चित्रीकरणात खुसपटं काढून ते बंद पाडतात. त्यातच एका घटनेनं त्यांना आयतंच कोलीत मिळतं आणि प्रभूकडून रामाची भूमिका काढून घेतली जाते. प्रभूला हा धक्काच असतो. तो अंथरूण धरतो.

मग पैसे कमावण्याकरता पात्रांची बोली लावण्याची शक्कल लढवली जाते. रामाचं पात्र रंगवण्याची बोली दारूडय़ा पिंटूशेट पैशाच्या जोरावर जिंकतो. अन्य पात्रंही भारी रकमेत विकली जातात. पण राक्षसाचं काम करायला मात्र कुणीच मिळत नाही. कारण हे पात्र रंगवणारा माणूस पुढच्या सहा महिन्यांतच गचकतो अशी गावात बोलवा असते. अशा घटना गेल्या दोन वर्षांत घडलेल्या असतात. त्यामुळे कुणीही हे पात्र करायला पुढे येत नाही. आणि या पात्राविना उत्सवाची सांगताही होऊ शकत नाही. राक्षसाचं पात्र वठवणाऱ्याला मंडळ मग पाच हजार रुपये देऊ करतं. परंतु तरीही कुणीच राजी होत नाही. शेवटी नेतेमंडळी प्रभूला साकडं घालतात. नागीता त्याला विरोध करते. पण गावच्या इभ्रतीखातर प्रभू राक्षस साकारायला तयार होतो..

लेखक-दिग्दर्शक राम दौंड यांनी मूळ कथेचा विस्तार करताना त्यात वर्तमान सामाजिकतेचं व जागतिकीकरणामुळे समाजमानसात निर्माण झालेल्या वखवखीचं अस्तर आणखीन गडद केलं आहे. मूळ कथेतील काही प्रसंगांची पुनर्माडणी करून, तसंच त्यात नवी भर घालून त्यांनी आशय अधिक टोकदार केला आहे. पण मूळ कथेचा शेवट लेखकानं सकारात्मक केलेला असताना नाटकात मात्र तो नकारात्मक करण्यामागचं प्रयोजन कळलं नाही. ही त्रुटी वगळता ‘हे राम’चा प्रयोग मात्र दृष्ट लागण्याजोगा होतो. प्रयोगाचं अस्सल गावरान अनघडपण (१ं६ल्ली२२) प्रेक्षकाची पकड घेतं. असंख्य पात्रांची रेलचेल असणारं हे नाटक हाताळणं येरागबाळ्याचं काम नोहे. यातलं प्रत्येक छोटं-मोठं पात्र लक्षवेधी करणं ही तर खचितच सोपी गोष्ट नाही. राम दौंड या दोन्ही कसोटय़ांत खरे उतरले आहेत. खरं तर पात्रनिवडीतच त्यांनी अर्धीअधिक लढाई जिंकलेली आहे. विधीनाटय़ाचा बाज, त्यातली संगीत-नृत्य-मुक्त अभिनयादी आयुधं त्यांनी प्रयोगात चपखल योजली आहेत. परिणामी प्रयोग अत्यंत प्रभावी झाला आहे. दृक्-श्राव्य-काव्यानुभव देणारा हा अप्रतिम प्रयोग रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील यात शंकाच नाही. ‘हे राम’च्या यशस्वीतेत लेखक-दिग्दर्शक राम दौंड यांच्या बरोबरीने तोलामोलाची कामगिरी केली आहे ती विनोद राठोड (प्रकाशयोजना), आशुतोष वाघमारे (संगीत), अरुण कदम (नेपथ्य), संतोष पवार (वेशभूषा) व रंगभूषाकारांनी! सूचक नेपथ्य, वास्तवदर्शी वातावरणनिर्मिती करणारी प्रकाशयोजना, लोककलेतलं लय-ताल-सुरांचं गारूड, अस्सल वेशभूषा यांचं सुंदर रसायन जमून आल्याने नाटकाची उंची शिगेला पोहोचते.

या नाटकाचं यश हे समूहाचं आहे. तब्बल ५५ कलाकार यात काम करत आहेत. आणि प्रत्येकानं सर्वस्व झोकून हे नाटक तोललं आहे. रंगमंचावरचं नुसतं अस्तित्व ते एखाद् दुसरं वाक्य वाटय़ाला आलेल्या कलाकारांनीही आपली भूमिका मन:पूर्वक वठवली आहे. यात निशांत कदम हा कलाकार प्रभूची भूमिका अक्षरश: जगला आहे असंच म्हटलं पाहिजे. या भूमिकेसाठी आवश्यक लोभस व्यक्तिमत्त्व, लय-तालाचं सजग भान, शब्दोच्चारावरील हुकूमत आणि संवादी चेहरा त्यांच्यापाशी मूळातच आहे. या सर्वाचा सुयोग्य व संयत वापर त्यांनी केला आहे. प्रभूच्या मनातली तसंच प्रत्यक्षातली भावनिक आंदोळ, त्यातले चढउतार त्यांनी प्रत्ययकारीतेनं दर्शविले आहेत. प्रभूच्या बायकोची- नागीताची उलघाल, तिचा भावोद्रेक, तिची तडफड, नवऱ्याच्या वेडाचारामागचं निरागसपण जाणवल्यावर तिला झालेली उपरती, अशुभाच्या सावटापासून त्याला वाचवण्यासाठी तिनं केलेली व्यर्थ धडपड या स्थित्यंतरांचा आलेख तेजस्वी परब यांनी उत्कटपणे रेखाटला आहे. उदय भ्राथे यांनी दारुडय़ा पिंटूशेठ साकारला आहे. पैशाचा माज व त्यातून आपल्याला पाहिजे ते साध्य करण्याची आलेली गुर्मी, रामाचं पात्र साकारण्याची पात्रता आपल्यात नाही- हा साक्षात्कार झाल्यावर परतीचा मार्ग न उरल्याने पिंटूशेठची झालेली दयनीय फरफट आणि पश्चात्ताप त्यांनी यथार्थरीत्या दाखवला. गोटीराम झालेल्या गौतम गायकवाड यांनी आपल्या अर्कचित्रात्मक शैलीने धमाल आणलीय. अमोल गवारे (चेअरमन), महेंद्र पाटील (सरपंच), सौरभ रानडे (पाटील) यांच्यासह सर्वाचीच कामं लक्षणीय झाली आहेत.
काहीही करून चुकवू नये असा हा नाटय़ानुभव आहे.