नाटककार अशोक पाटोळेलिखित ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’ हे नाटक काही वर्षांपूर्वी ‘सुयोग’ संस्थेनं रंगमंचावर आणलं होतं. मधल्या खंडानंतर आता पुनश्च ते नव्या संचात रंगभूमीवर आलं आहे. प्रेम या विषयावरचं काहीही प्रेक्षक/ वाचकाला आकर्षित करतं असं ‘सुयोग’चे निर्माते सुधीर भट यांचं म्हणणं असे. त्यामुळे प्रेम या संकल्पनेवरच्या नाटकांची निर्मिती करताना त्यांचा मूळचा अखंड उत्साह आणखीनच ओसंडून जात असे. त्यावेळीही या नाटकाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. सहा-सातशेच्या वर प्रयोग झाले होते. आज पुन्हा नव्याने ते विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाखाली रंगमंचावर सादर झालं आहे. मात्र, ते नव्यानं रंगमंचान्वित करताना एक गोष्ट विसरली गेलीय. ती ही, की काळाचा एक तुकडा मधल्या खंडात मागे पडलाय. त्यामुळे नाटकाचा विषय व सादरीकरण यादृष्टीने संहितेतली गंमत कालौघात उणावलीय. परिणामी यातल्या मुख्य पात्राच्या तोंडची अलंकारिक वाक्यं आज प्रेक्षकाच्या मनात कसलेच तरंग उमटवीत नाहीत. नाटकाची वीणही जुनाट वाटते. अर्थात कलाकारांच्या अभिनयाच्या जोरावर त्यावर काही अंशी मात होऊ शकते. परंतु इथे मध्यवर्ती भूमिकेतील डॉ. अमोल कोल्हे हेच भूमिकेची नस सापडण्याच्या बाबतीत अद्यापि चाचपडताना दिसतात. आजवर ऐतिहासिक भूमिकांमध्येच अधिक काळ रमल्यानं बहुधा असं घडलं असावं. या नाटकातली चापलूस आणि विनोदाची उत्तम समज असण्याची मागणी करणारी भूमिका म्हणूनच त्यांच्या पचनी पडलेली दिसत नाही. नाटकात ते काम करतात, परंतु पात्राच्या अंतरंगात शिरणं त्यांना जमलेलं नाही. अर्थात तरी संतोष मयेकर, अदिती देशपांडे यांच्यासारख्या कसलेल्या कलाकारांमुळे नाटक प्रेक्षकांना बांधून ठेवतं, हेही खरं.
डॉ. राहुल देशपांडे हा गुलछबू डेन्टिस्ट नित्य नव्या तरुणीशी प्रेमाचे रंग उधळीत असतो. लग्नाच्या बेडीत न अडकता नुसतीच रोमिओगिरी करण्यात त्याला धन्यता वाटते. त्यापायी त्याचं लग्नाचं वयही उलटून चाललेलं असतं. त्याचा मित्र सुधाकर त्याला परोपरीनं या धोकादायक खेळापासून दूर राहण्यास सांगतो. कधीतरी तो अंगाशी येण्याची शक्यताही त्याच्या निदर्शनास आणून देतो. पण राहुल ते हसण्यावारी नेतो. त्याच्या क्लीनिकमधली साहाय्यिका मिस् करुणा दाते ही राहुलचं क्लीनिक सांभाळण्याबरोबरच त्याची सर्व ती काळजी घेत असते. परंतु तो चुकूनही कधी तिच्या कामाची प्रशंसा करत नाही, की तिच्यामुळे आपलं आयुष्य धड चाललंय हेही त्याच्या गावी नसतं. ती मात्र कधीतरी आपलं राहुलवरील प्रेम त्याला कळेल, या वेडय़ा आशेवर असते. सध्या माणिक नावाच्या एका कॉलेजकन्येशी राहुलचं गॅटम्यॅट चाललेलं असतं. पण ती जेव्हा त्याला लग्नाबद्दल विचारते, तेव्हा मात्र तो तिला झटकू पाहतो. त्यासाठी आपलं लग्न झालेलं असून बायकोशी पटत नसल्याचं खोटंच तिला सांगतो. बायको म्हणून बिनदिक्कत करुणाकडे बोट दाखवतो. करुणा खरं काय ते माणिकला सांगू बघते; परंतु राहुलला माणिक प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी सुधाकर तिला थोडय़ा वेळाकरता त्याच्या बायकोचं ‘नाटक’ करण्याकरता विनवतो. राहुलवरील प्रेमापोटी नाइलाजानं ती त्यास राजी होते. परंतु तिचं ‘नाटक’ जरा अतीच झाल्यानं ते राहुलच्या अंगाशी येतं. एकीकडे माणिकला त्याला गमावायचंही नसतं आणि तिच्याशी लग्नही करायचं नसतं. पण राहुलच्या या भानगडीत करुणा आणि सुधाकरची मात्र नस्ती फरफट होते. शेवटी ते दोघं मिळून राहुलला कसं ताळ्यावर आणतात, हीच तर खरी या नाटकातली गंमत आहे!
अशोक पाटोळे यांचं हे फार्सिकल कॉमेडी नाटक फटाक्यांच्या माळेप्रमाणे थापेबाजीच्या शंृखलेतून आकार घेत जातं. चमकदार संवाद हे त्यांच्या नाटकाचं वैशिष्टय़ याही नाटकात आढळतं. परंतु त्यांनी डॉ. राहुलच्या तोंडी घातलेली काही अलंकारिक वाक्यं आज अर्थहीन वाटतात. तरुणाईचं उच्छृंखल प्रेम आणि प्रौढत्वी अबोल, निस्सीम प्रेम यांतला फरक अप्रत्यक्षपणे उलगडून दाखविण्याचा प्रयत्न या नाटकात आहे. थापेबाज, धरसोड वृत्तीच्या उटपटांग तरुणाईचं चित्रण करीत असताना खऱ्या प्रेमाला असणारी गांभीर्याची, बांधीलकीची किनार प्रयोगात नीटशी अधोरेखित मात्र होत नाही. दिग्दर्शक विजय केंकरे यांनी नाटक सफाईनं बसवलं आहे. परंतु कलाकारांचं परस्परांशी उत्तम टय़ुनिंग अद्यापि जमलेलं नाहीए. याकरता डॉ. राहुलच्या भूमिकेतील डॉ. अमोल कोल्हे जितक्या लवकर आपल्या भूमिकेशी समरस होतील तेव्हाच नाटक अधिक रंगतदार होईल. ही एक बेतलेली सुखात्मिका आहे. त्यामुळे त्या मर्यादेत कलाकारांनी त्यात रंगत भरणं अपेक्षित आहे. क्रिया-प्रतिक्रिया तसंच प्रतिक्षिप्त क्रियांचा खेळ जितका सहजत्स्फूर्त होईल, तितकं नाटक प्रेक्षकांची अधिक पकड घेईल. इथं त्याची थोडी उणीव जाणवते. संतोष मयेकर, अदिती देशपांडे, रोहित हळदीकर हे आपल्या परीनं नाटक हसतं-खेळतं ठेवतात. तथापि सर्वच कलाकार त्या एकतानतेनं प्रयोगात एकजीव झाले असते तर नाटक अधिक उसळलं असतं असं सतत वाटत राहतं. विनोदी भूमिकेची नस लीलया पकडणारे संतोष मयेकर यांनी आपल्या दीर्घानुभवाच्या जोरावर सुधाकरच्या भूमिकेत अतिशयोक्तीचा खुबीनं वापर करत ठणकावून हशे वसूल केले आहेत. त्यांचा सहज वावर, लवचिक मुद्राभिनय आणि संवादफेकीचं टायमिंग दाद देण्याजोगंच. अदिती देशपांडे यांनी डॉ. राहुलची साहाय्यिका आणि त्याच्यावर अबोल प्रेम करणारी प्रेयसी- मिस् करुणा प्रभावीरीत्या साकारली आहे. रोहित हळदीकर यांनी अर्कचित्रात्मक शैलीत माणिकवर प्रेम करणारा माशुक बबन पितळे छान वठवला आहे. सुखदा खांडकेकर यांची भाबडी अन् बालिश माणिकही यथातथ्य! डॉ. अमोल कोल्हे यांनी राहुलची चिरतरुण रोमिओगिरी दाखविण्याचा कसोशीनं प्रयत्न केला आहे. परंतु संहितेतील नटानं भरावयाच्या रिक्त जागा त्यांना अद्याप सापडलेल्या नाहीत. ते संहितेशी प्रामाणिक असले तरी अभिनेते म्हणून आपलं स्वत:चंही योगदान त्यात आवश्यक आहे याचं भान त्यांना यायचं आहे. असं असलं तरी चार घटका विरंगुळा म्हणून नाटक पाहणाऱ्यांना प्रेमाची ही गंमत आवडायला हरकत नाही.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा