ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी जावयाविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. कोमात गेलेली कन्या पायल सिन्हाची जावयाने भेट घेऊ न दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावर आता मुंबई हायकोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे. दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने हे प्रकरण परस्पर सामंजस्याने सोडवण्याचे आदेश दिले. कुठलाही आक्षेप असल्यास पुन्हा कोर्टाचे दरवाजे ठोठावू शकता, असंही कोर्टाने सांगितलं आहे. त्याचप्रमाणे मौसमी यांना कन्येशी संबंधित वैद्यकीय कागदपत्रं पोहोचवण्याचे आदेश कोर्टाने जावई डिकी सिन्हा यांना दिले आहेत.

मौसमी यांची मुलगी पायल सिन्हा २०१७ मध्ये कोमात गेली. एप्रिल २०१८ मध्ये त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आणि तेव्हापासून त्या पतीच्या घरी आहेत. मौसमी चॅटर्जी आणि त्यांचे पती जयंत मुखर्जी यांनी केलेले आरोप तथ्यहीन असल्याचा दावा डिकी सिन्हा यांनी केला आहे. ‘पत्नीची भेट घेण्यापासून सासू- सासऱ्यांना कधीच थांबवलं नाही. इतकंच नव्हे तर ज्या दिवशी याचिका दाखल केली, त्याच दिवशी दोघांनी तिची भेट घेतल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या भेटीचं सीसीटीव्ही फुटेज पुरावा असल्याचंही सिन्हा यांनी सांगितलं.

‘यापुढे जेव्हा जेव्हा मौसमी आणि जयंत यांना मुलीची भेट घ्यायला यायचं असेल, त्यांनी खुशाल यावं. पती म्हणून मी पायलची व्यवस्थित काळजी घेत आहे. देखभालीसाठी प्रशिक्षित नर्सही ठेवली आहे,’ असं डिकी सिन्हा यांनी कोर्टात स्पष्ट केलं.

२०१० मध्ये पायल आणि डिकी सिन्हा यांचा विवाह झाला होता.