चित्रिकरणा दरम्यान एका चाहत्याच्या श्रीमुखात भडकावून त्याला धमकावल्याचा कुठलाही पुरावा अभिनेता गोविंदा याच्याविरुद्ध नाही. तसेच तक्रारदाराने वर्षभरानंतर तक्रार केल्याचे स्पष्ट करीत मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी गोविंदाविरुद्ध महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर सुरू असलेली कारवाई रद्द करीत गोविंदाला दिलासा दिला.
गोविंदाने संतोष राय या चाहत्याच्या श्रीमुखात भडकावल्याचा आरोप होता. १६ जानेवारी २००८ रोजी घडलेल्या या घटनेनंतर एक वर्षांने म्हणजेच ५ फेब्रुवारी २००९ रोजी राय याने गोविंदाविरुद्ध बोरिवली महानगर दंडाधिकाऱ्यांकडे मारहाण केल्याची आणि नंतर धमकावल्याची तक्रार केली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने गोविंदाविरुद्ध कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात गोविंदाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती़