‘‘मुंबईची ‘धाव’आणि पुण्याची ‘चाल’यांना जोडणारा मार्ग म्हणजे मुंबई-पुणे एक्सप्रेस ‘हायवे. मुंबई – पुण्याहून वेगवेगळ्या वाहनातून वेगवेगळी माणसे निघतात आणि हायवेवरील वाहने पळू लागतात… ’या एवढ्याशा ‘वनलाईन’ला घेऊन सध्याची ‘स्टार’लेखक – दिग्दर्शक जोडगोळी गिरीश-उमेश कुलकर्णी यांनी एक विचार करायला लावणारी, तरीही मनोरंजन करणारी चित्रकथा रंगवली आहे. उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी आणि विनय गानू यांच्या “आरभाट कलाकृती” आणि “खरपूस फिल्म्स” कृत ‘हायवे’हा नवा मराठी चित्रपट येत्या २४ जुलैला महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
‘हायवे’चा फर्स्ट लुक, ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा एका अनोख्या पद्धतीने संपन्न झाला. चित्रपटात असलेली भलीमोठ्ठी स्टारकास्ट तर उपस्थित होतीच पण पाहुण्या कलावंतांचीही विशेष हजेरी होते. चित्रपटाचा फर्स्ट लुक जेष्ठ नाटककार अभिनेते पद्मश्री सतीश आळेकर यांच्या हस्ते प्रकाशित झाला. हायवेच्या निमित्ताने बॉलीवूड मधील लोकप्रिय संगीतकार अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलेल्या गीताचे प्रकाशन सुपरस्टार संगीतकार अजय – अतुल यांच्या हस्ते करण्यात आले.
‘माणूस प्रवासाने घडतो आणि माणूस प्रवासातच कळतो… मग तो प्रवास जीवनाचा असो किंवा ‘हायवे’वरचा. या भन्नाट कल्पनेभोवती गिरीश – उमेश कुलकर्णी यांनी ही चित्रकथा रंगवली आहे. ‘चेहरे’टिपण्यात माहीर असलेल्या या लेखक – दिग्दर्शक जोडगोळीने माणसांचा ‘हायवे’वरचा प्रवास मांडताना रसिकांना एक वेगळा, नवा आणि तजेलदार अनुभव दिला आहे. वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक स्तरामधली माणसं आपापल्या भावभावनांच, प्रश्नाचं वेदनांच, बॅगेज घेऊन प्रवासाला निघतात आणि मग…? हा त्यांच्या प्रवासातील ‘पॉझ’त्या प्रत्येक प्रवाशाचा ‘चेहरा’उघड करतो. एकूणच हा चित्रपट म्हणजे आजच्या समाजाचा, नव्या जमान्याचा ‘एक सेल्फी आरपार’ असेच म्हणता येईल.
सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय ‘सुवर्ण कमळ’पुरस्कार विजेत्या ‘देऊळ’नंतर गिरीश – उमेश कुलकर्णी या दोघांचा हा आणखी एक नवा आशयघन आणि वेगळ्या धाटणीचा भन्नाट चित्रपट आहे. तर पोस्टकार्ड आणि अनुमती या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटांचे निर्माते विनय गानू यांची ‘हायवे’ च्या निर्मितीसाठी विशेष साथ लाभली आहे. ‘हायवे’मध्ये प्रमुख भूमिकेत गिरीश कुलकर्णी, रेणुका शहाणे, सुनील बर्वे, मुक्ता बर्वे, हुमा कुरेशी, टिस्का चोप्रा, सतीश आळेकर, किशोर कदम, छाया कदम, नागराज मंजुळे, नंदकिशोर चौघुले, विद्याधर जोशी, मयुर खांडगे, श्रीकांत यादव, उमेश जगताप, शुभम, शकुंतला नगरकर, पूर्णानंद वांदेकर, निपुण धर्माधिकारी, देवेंद्र गायकवाड, सविता प्रभुणे, मकरंद सप्तर्षी, धीरेश जोशी, ओम भूतकर, पूर्वा पवार, शिवकांता औरंगाबादकर, शशांक शेंडे, शिल्पा अनासपुरे, जयंत गाडेकर, आदित्य कुलकर्णी, उर्मिला निंबाळकर, भूषण मंजुळे, शंकर डोंगरे, सहर्ष शुक्ला यांच्या सोबतच प्रथम पदार्पण करणारे समीर भाटे आणि वृषाली कुलकर्णी हे आपली वेगळी छाप सोडून जातात. येत्या २४ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा