मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरचा प्रवास कधी खासगी वाहनाने तर कधी परिवहन मंडळाच्या बसने बरेच जण करतात. दररोज खासगी वाहनाने मुंबई-पुणे ये-जा करणाऱ्या लोकांची संख्याही भरपूर आहे. या प्रवासात नाना प्रकारचे, निरनिराळ्या सामाजिक-सांस्कृतिक स्तरांतील लोक आपल्याला सहप्रवासी म्हणून भेटतात. या अनोळखी सहप्रवाशांसोबत केलेला प्रवास, गप्पा, चर्चा यातून एकमेकांची थोडीशी ओळख करून माणसे आपापल्या मार्गाने निघून जातात. हा अनुभव आपण बऱ्याचदा घेतलेला असतो. कुणाशी न बोलताही गाणी ऐकत शांतपणे आपल्यापुरता प्रवासही एकेकटय़ाने केला जातो. हाच प्रवास, माणसांचे निरनिराळे अनुभव निरनिराळ्या गाडय़ांतून अनेक जण ‘हायवे एक सेल्फी आरपार’ या चित्रपटातून लेखक-दिग्दर्शकांनी घडविला आहे. तसा हा प्रवास पाहताना प्रेक्षकाला नेहमीचा वाटू शकेलही, पण चित्रपटकर्त्यांनी वाट वेगळी धरली आहे. अतिप्रयोगशील सिनेमा झाल्यामुळे सर्वसाधारणपणे प्रेक्षकांना ही वाट खटकेल यात शंका नाही. मात्र उत्तम कलावंत, उत्तम ध्वनिसंयोजन आणि पाश्र्वसंगीत या सामर्थ्यांवर चित्रपट निराळा अनुभव देतो हे खरे असले तरी तुकडय़ातुकडय़ांतील हे अनुभव चित्रपट पाहिल्याचे समाधान प्रेक्षकाला मिळू देत नाहीत.
अमेरिकेतून आलेला एक अनिवासी भारतीय मुंबईतील विमानतळावर उतरून आपल्या आजारी वडिलांना भेटायला भाडय़ाच्या कारने पुण्याला निघतो. आपण भाडय़ाने घेतलेल्या कारमध्ये चालकाने एका अनाहूत तरुणाला बसविल्यामुळे चिडून हा अनिवासी भारतीय त्या तरुणाला गाडीतून उतरवितो. दुसऱ्या एका ठिकाणाहून गरोदर पत्नीला स्वत:च्या गाडीतून एक कॉपरेरेट क्षेत्रात काम करणारा माणूस पुण्याकडे निघाला आहे. तिसऱ्या एका भाडय़ाच्या गाडीत निरनिराळ्या स्तरांतून आलेली पाच-सात माणसे निघाली आहेत. आणखी एका गाडीत तमाशात काम करणाऱ्या दोघी जणी, एक मध्यमवर्गीय माणूस, एक वेडगळ माणूस आणि दोन मध्यमवयीन टगेसदृश पुरुष प्रवास करताहेत. एका ट्रकमधून मुंबईहून साताऱ्याला बदली झालेले कुटुंब सामानासकट निघाले आहे. त्याच ट्रकमध्ये पुढच्या बाजूला तीन दाक्षिणात्यसदृश माणसे भलीमोठी पिशवी घेऊन निघाली आहेत. अनिवासी भारतीय एका अनाहूत तरुणाला गाडीतून उतरवितो आणि पुढे जाऊन अपघातग्रस्त मध्यमवर्गीय दाम्पत्याला गाडीत नाइलाजास्तव जागा देतो. आणखी एका स्वतंत्र गाडीतून एक गर्भश्रीमंत महिला तिच्यापेक्षा खूपच कमी वयाच्या एका तरुणाला लिफ्ट देऊन निघाली आहे. आणखी एका गाडीतून हिंदी मालिकांची सुपरस्टार असलेली अभिनेत्री एका राजकारण्याच्या आमंत्रणावरून कार्यक्रमाला निघाली आहे. राजकारण्याने एका कार्यकर्त्यांला तिला आणण्यासाठी गाडी घेऊन पाठविले आहे. तर परिवहन महामंडळाच्या वातानुकूलित बसचे अप्रूप असलेला एक माणूस आपल्या मूकबधिर मुलाला घेऊन मुंबईहून पुण्याला निघाला आहे. आणखी एका वाहनात निम्नमध्यमवर्गीय जोडपे आहे. अनिवासी भारतीयाने गाडीतून उतरविलेला तरुण या जोडप्यासोबत पुढे गाडीत बसला आहे. या जोडप्याची सतत बाचाबाची, हाणामारी सुरू आहे.
एकंदरीत दहा-बारा वाहनांमधून निरनिराळ्या स्तरांतील लोक मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास सुरू करतात. त्या प्रवासात त्यांच्या गप्पागोष्टी होतात, अनिवासी भारतीय माणूस आणि अपघातग्रस्त कुटुंब यांच्यात थोडेफार बोलणे सुरू आहे, तमासगीर बायका आणि सहप्रवाशाचे भांडण होतेय, एका गाडीत सर्वच एकेकटय़ा अनोळखी माणसांच्या महागाईपासून अध्यात्मापर्यंत सर्व गोष्टींवर वायफळ चर्चा सुरू असतात. महामार्गावर एके ठिकाणी वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होतो आणि या दहा-बारा वाहनांमधील माणसे, त्या वाहनांचे चालक सगळेच अडकून पडतात.
प्रत्येक व्यक्तिरेखेचे थोडे थोडे बोलणे, त्यांच्या बोलण्याच्या तऱ्हा, पोशाखातील तऱ्हा, त्यातून प्रेक्षकाला अंदाज करता येऊ शकेल अशा काही गोष्टी निश्चित दाखविल्या आहेत. परंतु हे सारे काही दाखविताना चित्रपटाची लांबी खूप वाढली असून प्रेक्षकांना प्रत्येक व्यक्तिरेखा, त्यांचे जगणे, त्यांच्या समस्या, त्यांची जगण्याची रीत, त्यांचे स्वभाव पडद्यावर पाहताना फक्त काही अंदाज बांधण्याची संधी दिली आहे. शक्याशक्यतांचा हा चित्रपट म्हणावा लागेल.
चित्रपटाचे शीर्षक सुचविते त्यानुसार निरनिराळ्या स्तरातील माणसांची व्यक्तिमत्त्वे, त्यांचे संघर्ष, त्यांचे आतल्या आत स्वत:शीच सुरू असलेले द्वंद्व यात डोकावताना नकळत भाष्य करण्याचा प्रयत्न चित्रपटकर्त्यांनी केला आहे. परंतु, असंख्य व्यक्तिरेखांपैकी कुठल्याची व्यक्तिरेखेची गोष्ट पूर्णत्वास गेलेली न दाखविल्यामुळे भाष्य करण्याचा प्रयत्न फारच त्रोटक, सूचक ठरतो. परिणामी प्रेक्षकाचा गोंधळ उडतो. वैशिष्टय़पूर्ण ध्वनिसंयोजन आणि पाश्र्वसंगीत याचा उत्कृष्ट उपयोग चित्रपटात करण्यात आला असून त्यासाठी दाद द्यावी लागेल.
दिग्दर्शकाने प्रथमच डिजिटल फिल्ममेकिंगद्वारे हा चित्रपट बनविला आहे. हा एक प्रयोग आहेच. तसेच सुरुवात-मध्य-शेवट, अनपेक्षित धक्के, नायक- नायिका- खलनायक अशा निरनिराळ्या फॉम्र्युल्यांची रुळलेली वाट सोडून त्याचबरोबर ‘रोडमूव्ही’ प्रकाराचाही नवीन फॉम्र्युला मांडण्याचा प्रयोग केला आहे.
मुक्ता बर्वे, विद्याधर जोशी, गिरीश कुलकर्णी, किशोर कदम, श्रीकांत यादव, रेणुका शहाणे, शशांक शेंडे, सुनील बर्वे यांसारख्या उत्कृष्ट कलावंतांबरोबरच खरोखरीचे प्रवासी ज्यांनी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर काम केले आहे अशा खऱ्याखुऱ्या माणसांना घेण्याचा प्रयोगही केला आहे. त्याशिवाय निपुण धर्माधिकारी, सतीश आळेकर, नागराज मंजुळे यांच्यासारखे दिग्दर्शक- नाटककार- अभिनेते यांना कलावंत म्हणून घेण्याचाही आणखी एक प्रयोग यात आहे. हुमा कुरेशी, टिस्का चोप्रा, अमित त्रिवेदी या हिंदूीतील कलावंतांना अभिनय आणि संगीतासाठी पाचारण केले आहे हाही एक प्रयोग केला आहे. असे असंख्य प्रयोग दिग्दर्शकाने केले आहेत; परंतु या असंख्य प्रयोगांचा चित्रपटात प्रेक्षकाला खिळवून ठेवण्याचा प्रयत्न मर्यादित स्वरूपातच यशस्वी झाला आहे.
हायवे : एक सेल्फी आरपार..!
निर्माता – विनय गानू
दिग्दर्शक – उमेश कुलकर्णी
लेखक – गिरीश कुलकर्णी
छायालेखन – सुधाकर रेड्डी
संगीत – अमित त्रिवेदी
पाश्र्वसंगीत – मंगेश धाकडे
ध्वनिसंयोजन – अंथोनी बी. जे. रुबेन
संकलन – परेश कामदार
कलावंत – श्रीकांत यादव, उमेश जगताप, गिरीश कुलकर्णी, रेणुका शहाणे, विद्याधर जोशी, मुक्ता बर्वे, शकुंतला नगरकर, सुनील बर्वे, निपुण धर्माधिकारी, हुमा कुरेशी, टिस्का चोप्रा, शुभम, नागराज मंजुळे, ओम भूतकर, पूर्वा पवार, किशोर कदम, छाया कदम, सतीश आळेकर, देवेंद्र गायकवाड, पूर्णानंद वांदेकर, शशांक शेंडे, मकरंद सप्तर्षी, धीरेश जोशी, शिवकांता औरंगाबादकर, सविता प्रभुणे, आदित्य कुलकर्णी, ऊर्मिला निंबाळकर, भूषण मंजुळे, शंकर डोंगरे, सहर्ष शुक्ला, समीर भाटे, वृषाली कुलकर्णी, मयूर खांडगे व अन्य.