सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिच्या आवाजात पुन्हा एकदा ‘हिल हिल पोरी हिला’चे सूर घुमणार आहेत. यशराज प्रॉडक्शनच्या ‘वाय फिल्म्स’ने तृतीयपंथीयांच्या संगीत अल्बमची निर्मिती केली आहे. ‘६ पॅक’ हा तृतीयपंथीयांनी गायलेल्या गाण्यांचा देशातील पहिला अल्बम असून या अल्बमसाठी जनाईने ‘हिल पोरी हिला’ हे गाणे गायले आहे. या गाण्याच्या निमित्ताने गायन क्षेत्रात पहिल्यांदाच पाय ठेवणाऱ्या जनाईने आपण एका दिग्गज गायकांच्या घरातून आहोत, याची जाणीव सतत आपल्याबरोबर असते, असे सांगितले.

जनाई ही आशा भोसले यांचे चिरंजीव आनंद भोसले यांची मुलगी आहे. ‘माझ्याकडून घरच्यांच्या खूप अपेक्षा आहेत त्यामुळे साहजिकच एक दडपण असते. मला स्वत:ला गायनाच्या या क्षेत्रात पुढे जायचे आहे आणि त्यादृष्टीने मी कठोर मेहनत घेते आहे. माझा आवाज गोड आहे असे आजीला वाटते’, असे जनाईने सांगितले. १४ वर्षीय जनाईने तृतीयपंथीयांना समाजाकडून जी वाईट वागणूक मिळते, त्याबद्दल खंत व्यक्त केली. आपण सगळे माणूस आहोत. त्यामुळे प्रत्येकाला समान वागणूक मिळाली पाहिजे, असे वाटते. माझ्या या गाण्यामुळे समाजाचा तृतीयपंथींक डे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल अशी आशा वाटत असल्याचेही तिने यावेळी सांगितले. आपली आजी उषा मंगेशकर यांनी गायलेल्या ‘हिल पोरी हिला’ या गाण्याची आपण अल्बमसाठी निवड केली होती. या गाण्यातील ‘हिल पोरी हिला’ या ओळी कायम ठेवून पूर्ण नवीन गाणे तयार करण्यात आले असल्याचे जनाईने सांगितले. मूळ गाण्याशी या गाण्याची तुलना योग्य नाही, कारण हे गाणे पूर्णपणे वेगळे असल्याचे तिने स्पष्ट केले. उषा मंगेशकरांनाही हे गाणे आवडेल, असा विश्वास तिने व्यक्त केला असून १६ मार्चला हे गाणे प्रकाशित होणार आहे.

Story img Loader