रवींद्र पाथरे
महात्मा गांधी, गोपाळ गणेश आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबा आमटे, महर्षी धोंडो केशव कर्वे अशा लोकोत्तर पुरुषांनी आपल्या विहित क्षेत्रांत उत्तुंग कर्तृत्वाची शिखरं पादाक्रांत केली असली तरी त्यांच्या राजकीय-सामाजिक कार्याच्या होरपळवणाऱ्या झळा त्यांच्या निकटवर्तीयांनाही बसल्या. त्यातून त्यांना प्रापंचिक आयुष्यात कडवट प्रसंगांना सामोरे जावे लागले. (बाबा आमटे हे यास अपवाद.) महात्मा गांधींचा पुत्र हरिलाल हा आयुष्यात भरकटत गेला. सावरकरांच्या कुटुंबीयांना प्रचंड क्लेश सहन करावा लागला. एकदा गांधीजी सावरकरांच्या भेटीस गेले असता कस्तुरबांना सोबत घेऊन गेले होते. सावरकरांशी चर्चा झाल्यावर त्यांनी त्यांच्या पत्नीला कस्तुरबा भेटू इच्छितात असे त्यांना सांगितले. स्वातंत्र्यसंग्रामात आयुष्य झोकून देणाऱ्याच्या पत्नीस काय काय सोसावं लागतं, हे कस्तुरबांना जाणून घ्यायचं होतं. याचा अर्थ गांधीजींना आपल्या सार्वजनिक कार्यापायी आपल्या कुटुंबीयांची होरपळ होत आहे याची नक्कीच जाणीव असावी. पण हे लोकोत्तर पुरुष आपल्या जीवितकार्याशी इतके एकरूप झाले होते, समर्पित होते, की त्यातून आपल्या निकटवर्तीयांची होणारी होरपळ त्यांनी दृष्टीआड केली. अर्थात त्याची किंमतही त्यांनी चुकविली. अर्थात असं असूनही या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचे कुटुंबीयही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचे दिसते. आर्थिक, मानसिक, शारीरिक क्लेश सोसत या महापुरुषांना त्यांच्या कुटुंबीयांनीही साथ दिली. मात्र, त्यांच्या या मूक योगदानाबद्दल ‘नाही चिरा, नाही पणती’ अशीच स्थिती अनुभवायला मिळते.
हे सारं आताच स्मरायचं कारण.. प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘हिमालयाची सावली’ हे चरित्रनाटक. १९७२ साली ते प्रथम रंगमंचावर आलं. आज ४७ वर्षांनी पुन्हा ते रंगभूमीवर अवतरलेलं आहे. अद्भुत व सुप्रिया प्रॉडक्शनची ही निर्मिती आहे.
शिक्षणमहर्षी धोंडो केशव तथा अण्णासाहेब कर्वे हे महाराष्ट्रातील सुधारणावादी चळवळीतील एक महत्त्वाचे अध्वर्यु! कोकणातील एका आडगावातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या धोंडो केशव कर्वे यांनी बालविधवांचे पुनर्वसन, पुनर्विवाह आणि त्यांच्या शिक्षणाचे उत्तुंग काम केले. याबाबतीत स्वत:च आदर्श घालून देण्याच्या ऊर्मीतून त्यांनी एका बालविधवेशी लग्न केलं. तद्पश्चात परिस्थितीचे भीषण चटके सोसत, समाजाचा कडवा विरोध पत्करून अविचल निष्ठेने वयाच्या शंभरीपर्यंत ते आपलं विहित कार्य करीत राहिले. त्यांच्या या कार्याची पोच त्यांना ‘भारतरत्न’ किताबाने दिली गेली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ (एस. एन. डी. टी. युनिव्हर्सिटी) ही महर्षी कर्वे यांच्या महिला शिक्षणाच्या उत्तुंग कार्याची जिवंत खूण आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात महर्षी कर्वे आणि रँग्लर परांजपे यांच्या घराण्यांनी मोठेच योगदान दिलेले आहे. आजही या घराण्यांतील मंडळी विविध क्षेत्रांत तत्त्वनिष्ठा आणि समर्पितभावाने सक्रीय आहेत. असो.
प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘हिमालयाची सावली’ हे नाटक महर्षी कर्वे आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधाभासी, पण परस्परपूरक सहजीवनाचं हृदयंगम चित्रण करतं. या चरित्रनाटय़ात कलात्मक स्वातंत्र्य घेत लेखकानं काही प्रसंग रेखाटले असले तरी त्याने नाटकास उत्कट उदात्ततेची किनार लाभली आहे. मात्र, त्यात सत्याचा अपलाप बिलकूल नाही. नाटकाच्या शीर्षकानुसार, ही ‘हिमालया’ची (महर्षी कर्वे) गोष्ट असली तरी त्याची ‘सावली’ (महर्षी कर्वेची पत्नी) तिच्या केंद्रस्थानी आहे. किंबहुना, सावलीमुळेच हिमालयाचं उत्तुंगपण अधोरेखित होत, याकडे नाटककाराने निर्देश केला आहे.
प्रा. गुंडोपंत गोविंद भानू तथा नानासाहेबांनी बालविधवांसाठी पुण्यात आश्रम स्थापन करून, त्यांना शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे करण्याकरता, त्यांच्या उपेक्षित, वंचित जीवनात आशेचे किरण निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले. त्यांच्या या कार्याला त्याकाळच्या रूढीग्रस्त, सनातनी समाजाने प्रचंड विरोध केला. त्यामुळे गावाबाहेर आश्रम हलविण्याशिवाय त्यांना गत्यंतर उरले नाही. समाजातील काही सुधारणावादी मंडळी त्यांच्या पाठीशी उभी राहिली खरी; परंतु या कार्यासाठी लागणारं अर्थबळ, अथक कष्ट, नियोजन व कार्यपूर्तीसाठी लागणाऱ्या गोष्टी नानासाहेबांनी स्वत: पदरास खार लावून, घरसंसाराकडे दुर्लक्ष करून केल्या.. करत राहिले. त्यामुळेच हे कार्य साकारू शकले. त्यांच्या या व्यापांत पत्नी व मुलं मात्र भरडली गेली. पण नानासाहेबांनी त्याकडे काणाडोळा केला. आपल्या ध्यासासमोर सांसारिक गोष्टी त्यांच्या लेखी दुय्यम होत्या. यातूनच त्यांच्यात आणि कुटुंबीयांत दुराव्याची भिंत उभी राहिली. नानासाहेबांची पत्नी बयो ही एक साधी गृहिणी. तिला आपल्या मलाबाळांची होणारी ही होरपळ बघवत नसे. नानासाहेबांचं कार्य किती महत्त्वाचं आहे हे ती ओळखून असली तरी त्यापायी आपल्या मुलांच्या आशाआकांक्षांची होणारी होळी, त्यांचं कोमेजलेलं बालपण ती पाहत होती. त्यावरून तिचे नानासाहेबांशी सतत खटके उडत. त्यांच्या लेखी आपल्या कार्यापेक्षा सांसारिक जबाबदाऱ्यांना तितकंसं महत्त्व नाही हे ती जाणून होती. म्हणूनच सगळ्या जबाबदाऱ्या बयोच निभावत होती. सगळ्या तापत्रयांशी सामना करत आश्रमवासींच्या उदरभरणाची जबाबदारीही तीच पेलत होती. परंतु आपल्या बुद्धिमान मुलाला परदेशी शिक्षणासाठी आर्थिक मदत न करणाऱ्या आणि स्वत:च्या मुलीच्या लग्नात खोडा घालणाऱ्या नानासाहेबांशी ती जोरदार भांडण करते. पण नानासाहेब आपल्या कार्याशीच इतके बांधील असतात, की ते बयोच्या या मागणीकडे नेहमीप्रमाणेच काणाडोळा करतात. त्यातून उभयतांत जो भावनिक-मानसिक संघर्ष उद्भवतो, ते ‘हिमालयाची सावली’चं प्रथमार्धातलं प्रमुख सूत्र आहे. तर नाटकाच्या उत्तरार्धात संस्थेला भरघोस आर्थिक पाठबळ मिळवण्याच्या बदल्यात तिची सूत्रं धनवंत शेठजींच्या हाती देण्यावरून नानासाहेब आणि संस्थेचे सदस्य यांच्यात जो तात्त्विक वाद उभा राहतो, त्यात नानासाहेबांना संस्थेचे नामधारी अध्यक्ष करून संस्थेचा कारभार शेठजींकडे सोपवायची चाल खेळली जाते. तेव्हा हयातभर रक्ताचं पाणी करून, घरसंसार वाऱ्यावर सोडून संस्थेची जोपासना करणाऱ्या नानासाहेबांच्या पाठीशी बयोच खडकासारखी उभी ठाकते. परंतु घडल्या प्रकाराने नानासाहेबांचा पुरेपूर भ्रमनिरास होतो. ते संस्थेतून बाहेर पडतात. कर्मयोगी आश्रम नावाची नवी संस्था उभारण्याचा संकल्प सोडतात. त्यावेळी बयोच पुन्हा त्यांच्या या संकल्पाची हिरीरीने पाठराखण करते.
प्रा. वसंत कानेटकर यांच्या नाटकांत ‘हिमालयाची सावली’ हे सर्वाधिक उजवे चरित्रनाटक! नानासाहेबांच्या जीवितकार्याच्या ध्यासामुळे आपल्या मुलाबाळांना भोगाव्या लागणाऱ्या क्लेशांच्या विरोधात सर्वसामान्य बयो प्रतिनायिकेच्या रूपात उभी ठाकते. तिचं म्हणणं अर्थातच कुटुंबव्यवस्थेच्या प्रचलित रीतिरिवाजांत रास्तच असतं. स्वाभाविकपणेच नानासाहेबांऐवजी तिलाच सहानुभूती लाभते. तथापि या पाश्र्वभूमीवर नानासाहेबांची आपल्या कार्याप्रतीची अव्यभिचारी निष्ठाही झळाळून येते. त्यामुळेच ते खलपुरुष होत नाहीत. आपल्या मुलांच्या न्याय्य हक्कांसाठी नानासाहेबांशी संघर्ष करणारी बयोच पुढे त्यांनी सर्वस्व वेचून उभ्या केलेल्या संस्थेत त्यांनाच डावललं गेल्यावर वाघिणीसारखी पिसाळते आणि नानासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. सांसारिक मायापाश तोडून त्यांच्यासमवेत नव्या संकल्पात त्यांना साथ देण्यासाठी घर सोडते.
लेखक प्रा. वसंत कानेटकर यांनी अत्यंत बांधेसूद असं हे चरित्रनाटय़ रचलं आहे. म्हटलं तर मेलोड्रामाचे सगळे घटक कथाबीजात असूनही त्यांनी ते भडक क्षोभनाटय़ केलेलं नाही. सुस्पष्ट व्यक्तिरेखाटने, तणावपूर्ण घटना-प्रसंगांची नाटय़मय साखळी, चढत्या भाजणीने उत्कर्षिबदूप्रत नाटकाचा रेखाटलेला प्रवास, परंतु तरीही पात्रं व घटनांबाबत राखलेली लेखकीय तटस्थ अलिप्तता ही या नाटकाची वैशिष्टय़ं होत. दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी संहितेतील ही मेख जाणतेपणाने प्रयोगात उतरविली आहे. प्रत्येक पात्राला ठाशीव चेहरा देताना त्यांची परस्परपूरकता, त्यांच्यातले ताणेबाणे नेमके अधोरेखित होतील याची दक्षताही त्यांनी घेतली आहे. कुणालाही झुकतं माप देण्याचं त्यांनी जाणीवपूर्वक टाळलं आहे. आणि हेच या नाटकाचं मोठं यश आहे. अन्यथा नाटक कलंडायला वेळ लागता ना! नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी पहिल्या अंकात नानासाहेबांच्या घराचा दर्शनी भाग व आजूबाजूचा निसर्गसंपन्न परिसर उत्तम उभा केला आहे, तर दुसऱ्या अंकात त्याकाळच्या ब्रिटिश स्थापत्यशैलीतला पुरुषोत्तमचा बंगला तपशिलांनिशी साकारला आहे. काळाचं सूचनही त्यातून होतं. श्याम चव्हाण यांनी नाटय़ांतर्गत संघर्षपूर्ण क्षण प्रकाशयोजनेतून अधिक गहिरे केले आहेत. राहुल रानडे यांनीही पाश्र्वसंगीतातून नाटय़मयतेस उठाव दिला आहे. शरद सावंत व योगेश यांची रंगभूषा आणि मंगल केंकरे यांची कालसुसंगत वेशभूषा नाटकाची निर्मितीमूल्यं वाढवतात.
संवादफेक व आक्रमक अभिनय हेच ज्यांचं धारदार शस्त्र आहे अशा शरद पोंक्षे यांना यात नानासाहेबांची संयत, मितभाषी भूमिका देणं हे त्यांच्यातल्या अभिनेत्याला एक प्रकारे दिलेलं आव्हानच होतं. आणि सुखद बाब म्हणजे त्यांनी हे शिवधनुष्य अत्यंत ताकदीनं पेललं आहे. नानासाहेबांचं बव्हंशी मुखदुर्बळ, अनाकर्षक व्यक्तित्त्व.. त्यांची विचार-आचारांतली सुस्पष्टता व दृढ निर्धार, गृहआघाडीवर आपल्याकडून कर्तव्यच्युती होत असल्याच्या जाणिवेनं त्यांच्या ठायी आलेला अपराधगंड अन् ओशाळलेपण, त्यापासून सुटका करून घेण्यासाठी स्तोत्रपठणाची केलेली ढाल, त्यांची आपल्या कार्यावरील अव्यभिचारी निष्ठा इत्यादी पैलू शरद पोंक्षे यांनी सूक्ष्मतेनं व्यक्त केले आहेत. नानासाहेबांची देहबोली, बोलतानाचं गोंधळलेपण, निर्णय घेतानाचा दृढनिश्चय आणि उत्तरार्धात पक्षाघातापश्चात त्यांचं काहीसं बदललेलं रूप.. थोडंसं मिश्कील अन् समंजस.. हा सारा भावनालेख त्यांनी उत्कटतेनं साकारला आहे. त्यांच्या कलाकीर्दीतील ही एक निश्चितच संस्मरणीय भूमिका ठरावी. शृजा प्रभुदेसाई यांनी बयोचा बोलभांड स्वभाव, तिचं करारीपण उत्तम दाखवलंय. बयोचा हुच्च तोंडाळपणा, त्याचवेळी पोटात दडलेली मायेची ओल, आय़ुष्यभर टक्केटोणपे खाल्ल्याने अनुभवांतून आलेलं व्यावहारिक शहाणपण, नवऱ्याच्या कार्याची जाण असली तरी त्यापायी त्याचं संसाराकडे होणारं दुर्लक्ष व मुलाबाळांचे होणारे हाल पाहून तिचा होणारा तडफडाट, त्याबद्दल नानासाहेबांना खडसावून जाब विचारणं व त्यांच्याशी संघर्षांसही मागेपुढे न पाहणं, उत्तरार्धात मुलांच्या कर्तृत्वामुळे तिला लाभलेलं निवांतपण, त्याच दरम्यान नानासाहेबांना त्यांच्या संस्थेतून एक प्रकारे हकालपट्टी केली गेल्याने नवऱ्याची बाजू घेऊन तिचं आक्रमक होणं.. असे असंख्य भावनिक आंदोळ शृजा प्रभुदेसाई यांनी प्रभावीपणे अभिव्यक्त केले आहेत. ही अतिशय हटके भूमिका त्यांच्याही कारकीर्दीतील अविस्मरणीय भूमिका ठरावी. विघ्नेश जोशी यांचा कोकणी तातोबा फर्मास. कपिल रेडेकरांनी पुरुषोत्तमच्या व्यक्तिमत्त्वात काळानुरूप झालेले बदल नीट दाखवलेत. जयंत घाटे यांचा आबाजी धोरणीपणाचा अर्क ठरावा. कृष्णा राजशेखर (कृष्णाबाई), पंकज खामकर (केशव), ओंकार कर्वे (जगन्नाथ), प्रकाश सावळे (टांगेवाला), मकरंद नवघरे (पांडू) यांनीही आपल्या भूमिका चोख निभावल्यात. तथापि डॉ. इरावती कर्वे यांच्यावर बेतलेली डॉ. अरुंधतीची (नानासाहेबांची स्नुषा) भूमिका करणाऱ्या ऋतुजा चिपडे यांना मात्र नाटकात कोणतीच ‘भूमिका’ नव्हती. लेखकानंच या पात्रावर अन्याय केला आहे. असो.
एक अविस्मरणीय चरित्रनाटय़ पाहिल्याचा अनुभव ‘हिमालयाची सावली’ नक्कीच देतं. तेव्हा ते पाहायला अजिबात विसरू नका.