रेश्मा राईकवार
हिंदी चित्रपटसृष्टीत केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर चर्चेत राहणारे फार कमी चेहरे असतात. अभिनेत्री हुमा कुरेशी या अशा मोजक्या चेहऱ्यांपैकी एक आहे. बॉलीवूडमध्ये नायिका म्हणून तिची अंगकाठी कशी असावी इथपासून ते तिच्या भूमिका निवडीपर्यंत जे काही अलिखित नियम आहेत, साचे आहेत.. त्यात कधीही न बसलेली आणि तरीही आपल्या अभिनयामुळे दखल घ्यायला लावणारी अभिनेत्री म्हणून हुमा ओळखली जाते. सध्या ‘महारानी २’ या तिच्या बहुचर्चित वेबमालिकेमुळे ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.
करोनाच्या भीतीपोटी मालिका-चित्रपट, रिॲलिटी शो या नेहमीच्या प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या कार्यक्रमांनी नांगी टाकली. याच काळात ओटीटी या नव्या माध्यमाने जोर धरला, अनेकविध विषयांवरच्या वेबमालिकांचा रतीब ओटीटीवर सुरू होता. मात्र हिंदी चित्रपटातील यशस्वी कलाकार जे कधी सोईने प्रसिद्धीसाठी छोटय़ा पडद्यावर उतरतात ते या वेबमालिकांकडे ढुंकूनही पाहायला तयार नव्हते. किंबहुना, अमुक एक मोठय़ा पडद्यावरचा कलाकार तर हा ओटीटीचा चेहरा आहे.. अशा शब्दांत कलाकारांची विभागवारी होऊ लागली होती. या सगळय़ाची जाणीव असलेली अभिनेत्री हुमा कुरेशी त्या वेळी पहिल्यांदा नेटफ्लिक्सवरच्या ‘लैला’ या वेबमालिकेत झळकली होती. ही वेबमालिका फार प्रसिद्ध झाली असं नाही, पण म्हणून हुमाचा अभिनय प्रवासही अडकून पडला नाही. तिने चित्रपटही केले. पुन्हा एकदा ती सोनी लिव्हवर ‘महारानी’ या वेबमालिकेत झळकली. या वेबमालिकेने मात्र अभिनेत्री म्हणून तिची वेगळी दखल प्रेक्षकांना घ्यायला लावली. गावातील अशिक्षित पण एका लोकप्रिय नेत्याची पत्नी ते मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या रानी भारती या महिलेची तिने साकारलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांना इतकी भावली की आता या वेबमालिकेचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. आणि आता तिसऱ्या भागाचीही जुळवाजुळव सुरू झाली आहे.
‘लैला’ ते ‘महारानी’ हा प्रवास आठवताना आपल्याकडे कायम कलाकाराला एकाच माध्यमात अडकून पडण्याची भीती दाखवली जाते. तू ओटीटीवर काम करते आहेस, म्हणजे तुझी चित्रपटातील कारकीर्द संपली. तुझ्यावर आता ओटीटीचा शिक्का बसणार, असं सांगून घाबरवलं जातं. मलाही अशाच पद्धतीचं भय दाखवत ओटीटीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला गेला होता, असं हुमा सांगते. प्रत्यक्षात तसं काही होत नाही, असं ती स्पष्टपणे सांगते. कलाकाराने कायम विविध भूमिका करत राहायला हवं. माध्यम कोणतंही असो, तुमचा अभिनय किती खरा आहे हे महत्त्वाचं असतं, असं ती सांगते. चित्रपट असोत वा वेबमालिका दोन्हीमध्ये कलाकाराच्या दृष्टीने फार फरक नाही. दोन्ही ठिकाणी त्याला कॅमेऱ्यासमोर त्याची व्यक्तिरेखा उत्तम वठवायची असते. त्यामुळे दोन्हीचं स्वरूप सोडलं तर बाकी काही फरक नसल्याचं तिने स्पष्ट केलं. अर्थात, चित्रपटांमधील भूमिकेपेक्षा वेबमालिकेत एक व्यक्तिरेखा वेगवेगळय़ा भागांतून तपशिलात जाऊन रंगवता येते, असं सांगणाऱ्या हुमाने ‘महारानी’ वेबमालिकेसाठी दुसऱ्या भागात रानी भारती रंगवताना फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत, असंही सांगितलं.
एकच व्यक्तिरेखा काही महिन्यांच्या अंतराने बदलत्या संदर्भासह साकारताना आव्हानं अधिक असतात का, या प्रश्नाला उत्तर देताना एकच व्यक्तिरेखा दीर्घकाळ धरून ठेवणं हे खचितच सोपं नाही, असं ती म्हणते. मात्र रानी भारतीची व्यक्तिरेखा, तिचा प्रवास इतक्या खरेपणाने लिखाणात उतरला आहे की तिचा प्रवास प्रेरणादायी असला तरी मुळात ती सर्वसामान्य भारतीय स्त्री आहे हे लेखक कधीही विसरत नाही, असं ती म्हणते. आपल्याकडे एखाद्या व्यक्तीला हिरो बनवत असताना त्याच्याभोवती अनेक मापदंड निर्माण केले जातात. रानी भारतीचं तसं नाही. ती एक अशिक्षित, संसारी गृहिणी आहे. तिच्यावर अचानक येऊन पडलेल्या जबाबदारीमुळे ती राजकारणात उतरते. काहीही माहिती नसताना चुकत-माकत शिकत राहते, मुख्यमंत्रीपद सांभाळते. आपला मूळ स्वभाव न सोडता तिच्या कामातून ती तिचं प्रभावी व्यक्तिमत्त्व उभं करते, ही गोष्ट आपल्याला जास्त भावल्याचंही तिने सांगितलं.
दहा वर्षांपूर्वी ती ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली होती. त्यावेळी आपण खूपच अल्लड होतो, असं ती सांगते. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ हा चित्रपट आता वैश्विक स्तरावर उत्तम माफियापट म्हणून ओळखला जातो. त्या वेळी मात्र या चित्रपटाची नेमकी ताकद काय आहे हे जाणवलं नव्हतं, असं तिने सांगितलं. कान आंतरराष्ट्रीय महोत्सवात चित्रपटाच्या प्रीमिअरसाठी हजेरी लावतानाही रेड कार्पेट म्हणजे काय? इतके कॅमेरे समोर असताना पोज कशी द्यायची? काही म्हणजे काही माहिती नव्हतं. रेड कार्पेटसाठी ड्रेसही असाच डिझायनर मित्राकडून कसाबसा मिळवला होता, अशा आठवणी तिने सांगितल्या. मात्र तेव्हापासून आजपर्यंतचा प्रवास हा अभिनेत्री म्हणून खूप काही शिकवणारा होता, हेही ती आवर्जून नमूद करते.
एकाच वेळी ओटीटी आणि चित्रपटांमधून ती काम करते आहे. वेबमालिका केल्या म्हणजे तुम्ही त्याच माध्यमात अडकून पडलात वगैरे असं काही होत नाही, याचा तिने पुनरुच्चार केला. या वर्षभरात तिने दाक्षिणात्य अभिनेता अजितबरोबर ‘वलिमाई’ हा तमिळ चित्रपट केला. मी झी ५ वर ‘मिथ्या’ ही वेबमालिका केली. ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात एक गाणं केलं. ‘महारानी २’ सध्या सुरू आहे. ‘डबल एक्सएल’ हा सोनाक्षी सिन्हाबरोबर चित्रपट केला आहे. आपलं वाढतं वजन आणि शरीरामुळे मुलींच्या मनात असलेल्या न्यूनगंडाबदद्ल बोलणारा हा चित्रपट असल्याचं ती सांगते. याशिवाय, राजकुमार राव आणि राधिका आपटे यांच्याबरोबरचा ‘ओ माय डार्लिग’, प्रसिद्ध शेफ तरला दलाल यांच्या आयुष्यावर आधारित चरित्रपट ‘तरला’ आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर बरोबरचा ‘पूजा मेरी जान’ असे लागोपाठ वेगवेगळे चित्रपट, वेबमालिका आपण करत असल्याचं तिने सांगितलं. कलाकार म्हणून कुठल्याही माध्यमाच्या वा भूमिकेच्या मर्यादा आपल्याला जाणवल्या नाहीत, उलट ओटीटीमुळे वैविध्यपूर्ण भूमिका करता आल्या. आणि याचाच परिणाम म्हणून काही वेगळय़ा विषयांवरच्या हिंदी चित्रपटातही काम करता आलं याचं समाधान वाटत असल्याचं ती सांगते. प्रादेशिक भाषेतील चित्रपट असोत वा हिंदी वा अन्य भाषेतील चित्रपट, वेबमालिका.. आपल्याला हरएक माध्यमातून वैविध्यपूर्ण भूमिका करायच्या आहेत, असं ती म्हणते. एक अभिनेत्री म्हणून आपल्याला हरतऱ्हेच्या भूमिकांमधून प्रेक्षकांनी पाहावं, ओळखावं अशी तिची इच्छा असल्याचंही तिने स्पष्ट केलं.
तू ओटीटीवर काम करते आहेस, म्हणजे तुझी चित्रपटातील कारकीर्द संपली. तुझ्यावर आता ओटीटीचा शिक्का बसणार, असं भय दाखवत मला ओटीटीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला गेला होता. प्रत्यक्षात तसं काही होत नाही. कलाकाराने कायम विविध भूमिका करत राहायला हवं. माध्यम कोणतंही असो, तुमचा अभिनय किती खरा आहे हे महत्त्वाचं असतं. चित्रपट असोत वा वेबमालिका दोन्हीमध्ये कलाकाराच्या दृष्टीने फार फरक नाही. दोन्ही ठिकाणी त्याला कॅमेऱ्यासमोर त्याची व्यक्तिरेखा उत्तम वठवायची असते. – हुमा कुरेशी