प्रेक्षकांना सातत्याने नवं काहीतरी देत राहणं हे आव्हान कायमच हिंदी चित्रपटसृष्टीसमोर आहे. प्रेक्षकांना आवडणाऱ्या पडद्यावरच्या जोडय़ा घेऊन चित्रपट करण्याची पद्धत काळानुरूप थोडी मागे पडत चालली आहे. सतत नवनव्या भूमिकांमधून स्वत:ला अजमावत राहण्याचा प्रयत्न जसं कलाकार करताना दिसतात, तसंच पडद्यावर लोकप्रिय जोडी न घेता त्यात काही बदल करत प्रेक्षकांना अचंबित करणारं नवं काही पडद्यावर एकत्र आणलं जातं आहे. रणबीर कपूर – श्रद्धा कपूर जोडीचा ‘तू झूठी मैं मक्कार’, विकी कौशल – सारा अली खान यांचा ‘जरा हट के जरा बच के’, वरुण धवन – जान्हवी कपूरचा ‘बवाल’ असे प्रयोग गेल्या काही दिवसांत प्रेक्षकांनी अनुभवले आहेत. आगामी चित्रपटांमधून नावाजलेल्या कलाकारांच्या काही हटके जोडय़ा प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या पडद्यावरच्या आणि वास्तवात लग्नबंधनात अडकलेल्या काही जोडय़ा प्रचंड लोकप्रिय आहेत. आपला आवडता अभिनेता आणि अभिनेत्री वैवाहिक नात्यात बांधले गेले की त्यानंतर ती जोडी पडद्यावर एकत्र कशी दिसेल, कशी वावरेल? याची उत्सुकता प्रेक्षकांना असते. सध्या अशी अनेक लोकप्रिय जोडपी आहेत ज्यांना पडद्यावर पुन्हा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरलेले आहेत, मात्र अशा संभाव्य जोडय़ा टाळून नवंच काही प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा फंडा निर्माता – दिग्दर्शकांनी आता उचललेला दिसतो आहे. वानगीदाखल बोलायचं झालं तर लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘जरा हट के जरा बच के’ या चित्रपटात विकी कौशलच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री कतरिना कैफला का घेतलं नाही? असा प्रश्न दिग्दर्शकाला सातत्याने विचारला गेला आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी एकदाही एकत्र चित्रपटातून काम केलेलं नाही. मात्र तरीही एकत्र काम करण्याची कोणतीही घाई ही जोडी करताना दिसत नाही. उलट कतरिना कैफ लवकरच दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीबरोबर ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात दिसणार आहे. विजय सेतुपती याने याआधी अभिनेत्री तापसी पन्नूबरोबर एक चित्रपट केला आहे, मात्र कतरिना आणि विजयची भूमिका असलेला चित्रपट नेमका कसा असेल? ही उत्सुकता आहेच.
दाक्षिणात्य अभिनेत्यांच्या हिंदी चित्रपट प्रवेशाचा सिलसिला संपलेला नसला तरी थोडा मंदावला आहे. त्याउलट दाक्षिणात्य अभिनेत्री आणि बॉलीवूडचा नामांकित कलाकार अशा जोडय़ा चित्रपटात झळकताना दिसणार आहेत. त्यात आघाडीवर असलेलं नाव आहे ते अभिनेत्री रश्मिका मंदानाचं. रश्मिकाने याआधी सिद्धार्थ मल्होत्राबरोबर ‘मिशन मजनू’ चित्रपटात काम केलं आहे, शिवाय अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘गुडबाय’ चित्रपटातही तिने काम केलं आहे. आता ती रणबीर कपूरबरोबर ‘अॅनिमल’ चित्रपटात दिसणार आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ चित्रपटात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेलं कथानक आहे. अधोविश्वातील सराईत गुन्हेगार असलेल्या बाप-लेकातील संघर्ष चितारणाऱ्या या चित्रपटात रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. रश्मिका मंदानाबरोबरच अभिनेत्री तृप्ती डिमरीही या चित्रपटात पहिल्यांदाच रणबीरबरोबर दिसणार आहे.
अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटातील गाणी, त्यातील शाहरुख खानचा लूक आणि त्याची दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराबरोबरची जोडी या सगळय़ाचीच सध्या जोरदार चर्चा आहे. दक्षिणेत लोकप्रिय असलेल्या नयनताराचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. अभिनेता शाहरुख खान आणखी एका चित्रपटात नव्या नायिकेबरोबर दिसणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ या चित्रपटात शाहरुख खान आणि अभिनेत्री तापसी पन्नू ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. नामांकित कलाकारांची आणखी एक वेगळी जोडी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे ती म्हणजे अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण. हे दोघेही सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फायटर’ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. भारतीय वायुसेनेची पार्श्वभूमी असलेले कथानक चित्रपटात असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटातील हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अभिनेता अनिल कपूर यांचे पहिले लूकही प्रेक्षकांसमोर आले असून त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणारा आयुषमान खुराणाचा ‘ड्रीम गर्ल २’ हा सिक्वेलपटही त्यातल्या मुख्य जोडीमुळे लक्ष वेधून घेतो आहे. ‘ड्रीम गर्ल’ या पहिल्या चित्रपटात अभिनेत्री नुसरत भरुचाने आयुषमानच्या नायिकेची भूमिका साकारली होती. सिक्वेलपटात नायक आणि नायिका या दोन्ही भूमिका एका अर्थी आयुषमाननेच निभावल्या असल्या तरी त्याची जोडी या चित्रपटात अभिनेत्री अनन्या पांडेबरोबर जमली आहे. या दोघांच्या चित्रपटांची जातकुळी वेगळी असल्याने त्यांना एकत्र काम करताना पाहणं हा वेगळा अनुभव ठरेल. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री दिशा पतानी ही जोडीही आगामी ‘योद्धा’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. शिवाय, झोया अख्तरच्या ‘द आर्चिज’ या आगामी वेबमालिकेत नव्या दमाच्या कलाकारांची एक वेगळीच फळी एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहे. सध्या तरी हिंदी चित्रपटसृष्टीने पडद्यावरच्या या जोडय़ा बदलत काही नवीन प्रयोग करून पाहायचं ठरवलं आहे. ही समीकरणं जुळली तर काही वेगळं पाहिल्याचं समाधान प्रेक्षकांना आणि चित्रपट चालल्याचा आनंद चित्रपट व्यावसायिकांना मिळेल.