‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ २० ऑक्टोबर १९९५ रोजी झळकत असताना त्याच्या स्पर्धेतील चित्रपट कोणते असाही एक प्रश्न पडू शकतो. ते होते, देव आनंद निर्मित आणि दिग्दर्शित ‘गँगस्टर’ आणि डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘याराना’. या दोन्ही चित्रपटाना पूर्णपणे नाकारण्यास प्रेक्षकानी फारसा उशीर केला नाही. देव आनंदच्या चित्रपटात त्याच्याव्यतिरिक्त फारसा कोणाला रस नसतो है ‘लूटमार’ नंतरच्या काळातील स्थिर सत्य आहे. तरी ‘गँगस्टर’च्या राजकमल स्टुडिओतील मिनी चित्रपटगृहातील आम्हा समिक्षकांच्या खेळला स्वत: देव आनंदने हजर राहून प्रतिक्रिया जाणून घेतल्या. खुद्द त्यालाच हा चित्रपट वाईट आहे हे कसे हो सांगणार? काही झाले तरी तो ‘देव’च ना?
‘याराना’च्या हैदराबाद येथील पद्मालया या भव्य स्टु़िओतील चित्रीकरणाच्या वेळी मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांचा दौरा आयोजित केला होता. तेव्हा माधुरीची नृत्यातील प्रत्येक पदलालित्यासाठीची मेहनत पाहून थक्क व्हायला झाले. ‘मेरा पिया घर आय’चा तिचा ठुमका गाजला, पण चित्रपटाला त्याचा फायदा झाला नाही.
आदित्य चेप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’चे मुख्य चित्रपटगृह न्यू एक्सलसियर होते. तेथे पन्नास आठवड्याचा त्याचा मुक्काम झाल्यावर तो मराठा मंदिर येथे सकाळच्या खेळाला अर्थात मॅटीनीला वळवण्यात आला. तेथे त्याचा हजाराव्या आठवड्याकडे प्रवास सुरू आहे.
त्याच्या स्पर्धेतील चित्रपट इतिहासजमा झाले. पण ‘दिलवाले दुल्हनिया…’ने नवा इतिहास केला.

Story img Loader