सिनेमा, सौजन्य –
देविका भगत ही ३५ वर्षीय तरुणी ‘वन बाय टू’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करतेय. वेगळ्या चित्रपटांसाठी आणि वेगळ्या भूमिका साकारणारा अभिनेता म्हणून अभय देओल याची ओळख आहे. तो या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारतोय हेच केवळ वैशिष्टय़ नाही. तर गेल्या चार वर्षांपासून अभय देओल जिच्या प्रेमात पडलाय ती ‘मिस ग्रेट ब्रिटन’ प्रीती देसाई ही प्रत्यक्षातील दोघांची जोडी प्रथमच रूपेरी पडद्यावर प्रणय करताना दिसणार आहे. हा दुर्मीळ योग जुळून आला आहे असे म्हणावे लागेल. सर्वसाधारणपणे पडद्यावर एकत्र काम करणारी कलावंत जोडपी कालांतराने विवाह बंधनात अडकताना आपण सर्वानीच पाहिली आहेत. किंबहुना आताचे ताजे उदाहरण म्हणजे ‘जान्हवी’ आणि ‘श्री’ हे गाजत असलेल्या जोडप्याचे उदाहरण लगेच आठवेल. परंतु, अभय देओल-प्रीती देसाई हे वास्तवात ‘रिलेशनशिप’मध्ये असून आता योगायोगाने ते एकाच चित्रपटात नायक-नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहेत.
विवाह, प्रणय, डेटिंग या विषयाला धरून रोमॅण्टिक कॉमेडी हिंदी चित्रपटांमध्ये आजकाल फारच वरचेवर येऊ लागली आहे. परंतु, ‘वन बाय टू’चे कथानक थोडेसे वेगळे म्हणता येईल. प्रेमात पडायचं म्हणून एकत्र न आलेले अमित शर्मा आणि सामरा पटेल मुंबईत चुकून दोन-तीनदा भेटतात. जणू त्यांची भेट होणे नियतीच्या मनात असावे. पोस्टर पाहिले तर अभय देओलने साकारलेल्या अमित शर्मा या व्यक्तिरेखेला संगीताची खूप आवड आहे आणि प्रीती देसाईने साकारलेल्या सामरा पटेलला नृत्यांगना बनायचे असावे असे दिसते. मग अनेक योगायोग घडतात आणि या दोघांची एकत्र येण्याची मनाची तयारी झाल्यावर ते एकत्र येतात असे काहीसे कथानक आहे. वरवर बॉलीवूड मसाला मनोरंजन चित्रपटाची धाटणी वाटत असली, तरी देविका भगतसारखी यशस्वी पटकथा-संवाद लेखिकाच दिग्दर्शिका असल्यामुळे हा चित्रपट वेगळा ठरावा.
पटकथा लिहिणे किंवा त्यासोबत संवाद लिहून देणे हे काम डझनभर चित्रपटांसाठी केले असले तरी पटकथा लिहिताना दिसलेला-जाणवलेला सिनेमा तयार झाल्यानंतर रुपेरी पडद्यावर पाहताना मात्र अरे आपण लिहिले होते त्याप्रमाणे दिसत नाहीये अशी भावना मनात यायची. ‘जब तक है जान’, ‘बचना ए हसीनों’ अशा चित्रपटांनंतर आता देविका भगत दिग्दर्शनात उतरली आहे. यापुढे फक्त आपल्याच चित्रपटांसाठी लेखन करण्याचे तिने मनाशी ठरविले आहे. मुख्य प्रवाहातील बॉलीवूड चित्रपटांचे लेखन करून आर्थिक स्थैर्य मिळवायचे आणि नंतर आपल्या कलात्मक जाणिवा-नेणिवांना रुचेल-पटेल अशा छोटय़ा बजेटच्या परंतु कलात्मक समाधान मिळवून देणाऱ्या चित्रपटांकडे वळायचे असे देविकाने मनाशी ठरविले होते. त्यानुसारच ती आता दिग्दर्शनात उतरली आहे. ‘वन बाय टू’विषयी सांगताना ती म्हणते की, मिळणाऱ्या संधीची अनिश्चितता आणि त्यामुळे एकूणच एखाद्याच्या आयुष्यातील अनिश्चितता हा चित्रपटाचा गाभा आहे. वेगवेगळ्या शक्यता पडताळून चाचपडून पाहत आयुष्यात पुढे सरकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्तींचा हा चित्रपट आहे. सर्वसाधारणपणे आजच्या जागतिकीकरणाच्या शहरी-महानगरीय जीवनशैली जगत असताना तरी आजघडीला तरुणाईला मिळणाऱ्या वेगवेगळ्या करिअरच्या संधी या योगायोगाने चांगल्या मिळाल्या की मनातली स्वप्नं साकार होण्याच्या शक्यता वाढतात, असे आजूबाजूला पाहता सहजपणे लक्षात येईल. अमूक एक शिक्षण घ्यायचे ठरविल्यानंतर त्यात उत्तमपैकी गुण मिळवून उत्तीर्ण होणे, मग इच्छुक करिअरमध्येही मैलाचा दगड ठरावी अशी उत्तम कंपनीत नोकरी मिळणे, मग त्यापुढे जाऊन मनात असलेल्या गोष्टी आर्थिक स्थैर्य आल्यावर करायला मिळणे, हे असे ठरवून सगळे होतेच असे नाही. हा अनुभव जवळपास प्रत्येकाला येत असतो. योग्य संधी, योग्य वेळेत, काही करण्याची उमेद असताना मिळणे, आवडते काम करतानाचा आनंद घेत घेत करिअर, आयुष्य या वाटेवर प्रगती करीत जाणे, हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडतेच असे नाही. तर त्यासाठी अनेक योग्य माणसे, योग्य वळणावर भेटणे याबरोबरच अनेक योगायोग घडत जातात तेव्हाच हे काही प्रमाणात घडू शकते, हाच या चित्रपटाचा गाभा आहे, असे देविका भगत सांगते. करिअरच्या बाबतीत योगायोग असतात तसेच आयुष्यात येणाऱ्या जोडीदाराच्या बाबतीतही असतातच असे म्हणावे लागेल. याबाबत सांगताना देविका म्हणाली की, ती आणि तिचा नवरा हे दोघे शेजारशेजारच्याच इमारतीत अनेक वर्षे राहत होते. परंतु, दोन वर्षांनंतर त्यांची भेट झाली, प्रेम जुळले, लग्न झाले. ‘वन बाय टू’ चित्रपटातील अमित-सामरा हेही असेच योगायोगाने भेटतात. योगायोग हा एखाद्याच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतो, ही चित्रपटाची संकल्पना आहे, असे देविका सांगते.
अभय देओल-प्रीती देसाई हे प्रियकर-प्रेयसी जोडपे प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहे. दोघांच्यात उमललेले वास्तवातील प्रेम, मैत्री, सहचर भावना पडद्यावर भूमिका साकारण्यासाठी कशा एकमेकांना सहाय्यभूत ठरतात ते पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. रूढार्थाने रोमॅण्टिक कॉमेडीपट असला तरी काहीसे वेगळे नक्कीच पाहायला मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. ३१ जानेवारीपर्यंत त्याची वाट पाहावी लागणार आहे.
योगायोगाची गोष्ट
देविका भगत ही ३५ वर्षीय तरुणी ‘वन बाय टू’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करतेय. वेगळ्या चित्रपटांसाठी आणि वेगळ्या भूमिका साकारणारा अभिनेता म्हणून अभय देओल याची ओळख आहे. तो या...
First published on: 24-01-2014 at 06:41 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodसिनेमाCinemaहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindi movie one by two