‘फॅशन’मधील शोनाली गुजराल ही सहाय्यक भूमिका अप्रतिम साकारल्यानंतर आणि या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकाविल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत प्रकाशझोतात आली. त्याआधीचा गँगस्टर असो की लाईफ इन ए मेट्रो हा चित्रपट असो, तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार फॅशन चित्रपटातील भूमिकेने मिळवून दिला. मल्टिप्लेक्सची संख्या वाढली, एकाच ठिकाणी चार-पाच स्क्रीन्स उपलब्ध झाल्यानंतर हिंदी सिनेमाच्या आशय-विषय-मांडणी यात चांगल्या अर्थाने फरक पडत गेला. त्याचा फायदा स्टार कलावंत असे बिरूद तोपर्यंत न मिरविलेल्या कंगनासारख्या कलावंतांना झाला. नव्या दमाचे दिग्दर्शक, नव्या संकल्पना घेऊन चित्रपट बनवू लागले. भारतातील छोटय़ा शहरांतील तरुणाईची मानसिकता, लहान जीव असलेल्या कथा पडद्यावर दिसू लागल्या. कंगना राणावतचा अलिकडेच प्रदर्शित झालेला ‘क्वीन’ हाही एक वेगळ्या धाटणीचा, नावीन्यपूर्ण विषयावरचा चित्रपट आहे.
चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणेच कंगना राणावतच्या व्यक्तिरेखेचे नाव रानी असे आहे. ‘टिपिकल’ पंजाबी पुराणमतवादी मध्यमवर्गीय कुटूंबातली रानी. तिच्या वडिलांचे मिठाईचे दुकान आहे. दिल्लीसारख्या शहरात राहत असली तरी रानीचा भाऊ कायम तिच्याबरोबर बॉडीगार्ड म्हणून फिरत असतो. आई-वडील म्हणतील, त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणेच वागायचे असा शिरस्ता. अशा सुस्वभावी, साध्यासुध्या रानीच्या आयुष्यात विजय धिंग्रा हा तरूण येतो. त्यांचे प्रेम जुळते आणि लग्नही यथावकाश ठरते. रानी-विजय दोघेही पॅरीस-अॅमस्टरडॅमला हनिमूनला जाण्याचे ठरवितात. बुकिंगही करतात. परंतु, लग्नाच्या दोन दिवस आधी विजय अचानक रानीशी लग्न करण्यास नकार देतो. ती हादरून जाते. वडिलांना हार्ट अॅटॅक येईल हे कळले तर असे सांगते. परंतु, विजय नकारावर ठाम असतो. रानी हादरते, विजयने लग्न का मोडले या विचारात गढून जाते. मात्र एक निर्णय घेते. ठरलेल्या हनिमून ट्रीपला एकटीने जायचे ठरविते. पुढचा सगळा सिनेमा रानी पॅरीस, अॅमस्टरडॅम या शहरांमध्ये आपल्या मनाला वाटेल त्याप्रमाणे भटकते, जगण्याचा मुक्त अनुभव घेते आणि बदलते.
लाजरीबुजरी, अतिशय सरळ मनाची मध्यमवर्गीय विचार करणारी, परंपरेत अडकलेली, आज्ञाधारक रानी ते स्वच्छंदी पण निश्चयी, अदबशीर पण काहीशी बंडखोर बनते. हनिमूनला जाताना भलीमोठी सूटकेस कशीबशी रेटत विमानात चढणारी रानी भारतात परतताना ‘बॅगपॅकर्स’ बनलेली असते. आपल्या आयुष्याची ‘राणी’ म्हणजेच ‘क्वीन’ बनते. प्रेमाने विजयने तिला ठेवलेले ‘क्वीन’ हे नाव ती सार्थ ठरविते. सूटकेस ते बॅगपॅकर्स असा रानीचा प्रवास दिग्दर्शकाने छोटय़ा छोटय़ा गोष्टी दाखवून फुलविला आहे. पॅरीसमध्ये पासपोर्ट चोरापासून कशीबशी स्वत:चा बचाव करणारी रानी अनुभवांती थोडी शहाणी होती, थोडी धाडसी बनते आणि अॅमस्टरडॅममधील एका इटालियन हॉटेलवाल्याला भारतीय पाणीपुरी बनवून पैसे कमावून दाखविते. विजय या नावाची चीड आलेल्या रानीला पॅरीसमधील हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम करणारी विजयलक्ष्मी मैत्रीण म्हणून भेटते. अॅमस्टरडॅमला गेल्यावर एक कृष्णवर्णिय, एक जपानी आणि एक युरोपीयन तरुण यांच्याबरोबर रानी बिनधास्त राहते. सूटकेस ते बॅगपॅकर्स या रानीच्या प्रवासात ती जगण्याचा उत्सव साजरा करते.
विजयलक्ष्मी ही व्यक्तिरेखा लिसा हेडनने अप्रतिम साकारली आहे. दिग्दर्शकाने रानी या भारतीय मानसिकतेच्या तरुणीत अनुभवांती होणारे छोटेछोटे बदल नेमकेपणाने दाखविले आहेत. मनाने पूर्ण भारतीय असली तरी रानीला जगण्याची उमेद देणारा हा परदेश प्रवास प्रेक्षकालाही बरेच काही सांगून जातो. कंगना राणावतने पडद्यावर उभ्या केलेल्या रानीच्या प्रेमात प्रेक्षक पडेल असा हा चित्रपट आवर्जून पाहायला हवा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा