सिनेमा, सौजन्य –
तो आणि ती. विशीच्या आतलेबाहेरचे. एकमेकांना बघतात. लव्ह अॅट फर्स्ट साइट वगैरे होतं. दुसऱ्याच भेटीत ते एकमेकांबरोबर नाचू-गाऊ लागतात. या गोष्टीत एक व्हिलन असतोच. त्याने आणलेले अडथळे पार करत या दोघांना जन्मोजन्मी एक दुजे के लिए जगायचं असतं. आणि तसंच सगळं घडतं..
अशा सिनेमांवर ज्यांची अभिरुची विकसित झाली आहे, त्या आपल्यासारख्या माणसांनी एकमेकांना कधीही न भेटलेल्या, एकमेकांना कधीही न बघितलेल्या, एकमेकांशी कधीही न बोललेल्या स्त्री-पुरुषांमध्ये एकमेकांबद्दल एक अनिवार, तरल ओढ निर्माण होते, त्यांच्यात न भेटता-बोलताही एका परिपक्व नात्याचा झुलता पूल बांधला जातो याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? आणि तोही साठीचा पुरुष आणि तिशीची स्त्री यांच्यात? त्याची बायको गेली आहे. तिचा नवरा तिच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. म्हणून काय त्यांनी दोघांनी प्रेमाबिमाच्या भानगडीत पडायचं? सगळ्यांना चोरून एकमेकांना चिठ्ठय़ाचपाटय़ा पाठवायच्या?
अशी सगळी मतं असणाऱ्यांनी आणि नसणाऱ्यांनीही आवर्जून बघावा असाच सिनेमा आहे ‘लंच बॉक्स’. चिनीकम ही प्रौढ वयातल्या अविवाहित जोडीची प्रेमकहाणी जितकी एन्जॉय केली गेली, तितकाच लंच बॉक्स चटका लावून जातो. ‘लंच बॉक्स’ ही गोष्ट आहे इलाची आणि साजन फर्नाडिसची. तरीही या सिनेमाचा हीरो आहे, जेवणाचा डबा. हा सिनेमा घडतो मुंबईत. इला नवऱ्याचा डबा बनवते आणि मुंबईचा डबेवाला रोज तिच्या घरी येऊन डबा घेऊन जातो. हा डबा रोज रिकामा होऊन येत नाही, हे इलाचं दु:ख आहे. नवऱ्याला आपल्या हातचं खाणं आवडावं यासाठी ती रोज तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ करते. पण नावडतीचं मीठही अळणी असावं तसं तिच्या नवऱ्याला तिच्या हातचं जेवण आवडत नाही. योगायोगाने एक दिवस तोच डबा तिच्या नवऱ्याऐवजी दुसऱ्याच माणसाला मिळतो. चाटून पुसून परत आलेला डबा आपल्या नवऱ्याने नव्हे तर दुसऱ्याच माणसाने खाल्ला आहे, हे लक्षात आल्यावर ती त्याला धन्यवाद देणारी चिठ्ठी लिहिते. तोही त्या चिठ्ठीला उत्तर लिहितो आणि त्यांच्यात संवाद सुरू होतो.  
हा पत्रसंवाद कधी अतिशय गहिऱ्या पातळीवर पोहोचतो ते त्यांचं त्यांनाही कळत नाही. खरं तर ही रोजच्या डब्यातली पत्रं अगदी मोजकी, त्रोटक आहेत, पण ती संवेदनशील आणि कुणाशी तरी संवाद साधायला, व्यक्त व्हायला उत्सुक असलेल्या दोन मनांमधलं अंतर पार करून नात्याच्या गाभ्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळेच कुणा बाईनं मुलीसह आत्महत्या केली हे कळल्यावर ती बाई इला तर नसेल, या विचाराने तो अस्वस्थ होतो. भूतानमध्ये ग्रॉस हॅपीनेस मोजला जातो म्हणून आपल्याला तिथं जायचंय हे ती लिहिते तेव्हा तो चिठ्ठीतून विचारतो, मी तुझ्याबरोबर आलो तर चालेल? ती विचारते, कसं जाणार, मला तर तुझं नावंही माहीत नाही.
इला आणि साजन फर्नाडिस यांना एकमेकांचं नाव-गाव माहीत नाही, त्यांनी एकमेकांना बघितलेलंही नाही, ते कधी एकमेकांशी बोललेलेही नाहीत, पण पत्रांच्या देवाणघेवाणीनं त्यांच्यात एक अनोखा बंध तयार होतो. पत्नीवियोगामुळे रूक्ष, वठलेलं, एकाकी आयुष्य जगणारा, निवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेला साजन फर्नाडिस आणि नवऱ्याचं अफेअर, आजारी वडील, त्यांच्या आजारपणाशी झगडणारी आई, अगदी नकळत्या वयातली मुलगी असे अवतीभवती सगळे असतानाही एकाकी अशी इला यांची प्रौढ, समंजस माणसांची अव्यक्त प्रेमकहाणी मांडताना दिग्दर्शकाने लग्न, नातेसंबंध, त्यातली अपरिहार्यता या सगळ्यावर जी तरल अशी टिप्पणी केली आहे, ती म्हणजे आपला सिनेमा आणि प्रेक्षक दोघंही परिपक्व होत असल्याची पावतीच आहे.
पत्रांमधून इला आणि साजन फर्नाडिस यांच्यामध्ये जी एक कोवळीक  तयार होते, ती त्या दोघांचंही जगणं बदलून टाकते. इलामुळे रूक्ष साजनच्या आयुष्यात रस निर्माण होतो, तर जगण्यातला अर्थ गवसलेली इलाही साजनला भेटायचा आग्रह करते. तोही ठरलेल्या वेळी ठरलेल्या हॉटेलमध्ये जातो, पण तरुण, देखण्या इलाला बघून त्याला आपलं वय जाणवतं आणि तो तिला न भेटताच परत येतो. एवढंच नाही तर सगळं सोडून नाशिकला निघून जातो.   
सिनेमात इलाच्या वर राहणारी देशपांडे आंटी आणि इला यांच्यामध्ये दोन शेजारणींचे असतात तसे भावबंध आहेत, पण देशपांडे आंटी सिनेमात कधीही दिसत नाहीत. ऐकू येतो तो फक्त भारती आचरेकरांचा आवाज. इला साजनला लिहिते त्या पत्रातून आजारी नवऱ्याची त्या कशा गेली अनेक वर्षे शुश्रूषा करतात ते कळतं. त्यासाठी देशपांडे आंटी दाखवायची गरज नाही ही अफलातून गोष्ट. इलाच्या वडिलांचा मृत्यू होतो तेव्हा त्यांच्या मृतदेहाजवळ बसलेली तिची आई म्हणते, मला खूप भूक लागलीय. इतकी वर्षे मी फक्त यांचं आजारपण, नाष्टा, जेवण, आंघोळ ही कामं करण्यात घालवली. ते नसतील तेव्हा मी काय करेन, असा मला प्रश्न पडायचा. आता ते गेलेत आणि मला खूप भूक लागलीय. मला पराठे खायचेत.
म्हणजे आज जे इलाच्या आईचं झालंय, जे देशपांडे आंटीचं झालंय तेच उद्या या लग्नव्यवस्थेत इलाचंही होऊ शकतं. या सगळ्यातून जीव घुसमटलेली इला सगळं सोडून मुलीला घेऊन भूतानला जायचं ठरवते. त्याच वेळी नाशिकहून परतलेला, इलाचा पत्ता शोधत तिच्या घरी जायला निघालेला साजन फर्नाडिस डबेवाल्याबरोबर रेल्वेतून चाललेला दिसतो आणि इथेच सिनेमा संपतो. इला आणि साजन भेटतात का, ते दोघं एकत्र येतात का, भूतानला म्हणजे आनंदाच्या गावाला जातात का, की त्यांची भेट होतच नाही, की भेट होते, पण इलाचं लग्न आडवं येतं, या सगळ्या शक्यता दिग्दर्शकाने प्रेक्षकांवर सोडून दिल्या आहेत. तुम्हाला हवा तसा विचार करा, तुम्हाला हवा तसा शेवट तुम्हीच ठरवा..! असा शेवट करणं हेसुद्धा धाडसच म्हणायला हवं. अन्यथा ‘लाइफ इन मेट्रो’सारख्या चांगल्या, वेगळ्या सिनेमातसुद्धा लग्न झालेली विवाहित स्त्री कोणत्याही लक्ष्मणरेषा ओलांडत नाही, ओलांडू शकत नाही, ही अपरिहार्यताच म्हणूनच मांडली गेली होती.
लग्नव्यवस्थेवर भाष्य करणारा, महानगरी जीवनातल्या नातेसंबंधांच्या शक्यता सूचित करणारा हा साधा, सरळ आणि तरीही मनाला भिडणारा सिनेमा. सिनेमा म्हणून त्याच्यात त्रुटी आहेतही, पण त्याच्या मांडणीत वेगळेपणा आहे. मनं जुळण्यासाठी भेटावं लागत नाही, दर क्षणाला फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्अप असं कुठेही व्यक्त व्हावं लागत नाही. कुठेतरी कुणीतरी तुमच्यासाठी आहे ही अस्सल भावनाच खरं तर किती पुरेशी असते, हे अनुभवण्यासाठी तरी ‘लंच बॉक्स’ बघाच.

Story img Loader