डॉ. धर्मवीर भारती हे हिंदी साहित्यक्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व. ‘अंधा युग’ या केवळ एका नाटकाने चिरंतन झालेले भारतीय नाटककार. १९४७ साली झालेल्या भारत-पाक फाळणीने आणि त्यानंतर उभय देशांमध्ये झालेल्या युद्धाने व्यथित झालेल्या डॉ. धर्मवीर भारतींनी त्यावरील संवेदनशील प्रतिक्रियेतून हे नाटक लिहिलंय. एकूणच युद्धातील वैय्यथ्र्यता, मानवी मूल्ये आणि नैतिकतेचा त्यात जाणारा बळी, निरपराधांची युद्धामुळे होणारी ससेहोलपट आणि इतके करूनही कुणालाच त्यातून काहीही साध्य न होणं.. याबद्दलची तीव्र वेदना व्यक्त करण्यासाठी त्यांनी ‘अंधा युग’चा घाट घातला आहे. भारतीय रंगभूमीच्या अस्सल मूळांचा शोध हा विषयही याच काळात ऐरणीवर आलेला होता. भारतीय रंगभूमीच्या मूळ प्रेरणा आणि आशयसूत्रे धुंडाळण्याच्या प्रक्रियेतून डॉ. भारतींचं हे नाटक जन्माला आलं. महाभारताचा विशाल पट त्याला लाभला आहे. कुरूक्षेत्रावर १८ दिवस कौरव आणि पांडवांमध्ये झालेल्या घनघोर युद्धाची पाश्र्वभूमी या नाटकास आहे.
व्यासांनी महाभारतात सार्वकालिक मानवी भावभावना, व्यक्तिमात्रांचं वर्तन, स्वभावविभाव, तद्वत परिस्थितीवश उद्भवलेल्या व्यामिश्र घटना-प्रसंग कथन केलेले आहेत. महाभारतात रामायणातल्यासारखे दैवी चमत्कार फारसे नाहीत. माणसांना ‘माणूस’ म्हणून त्याच्या सगळ्या गुण-दोषांसह त्यात चितारलेलं आहे. अगदी परमेश्वराचा अवतार मानला गेलेला श्रीकृष्णही मानवी गुणदोषांसह मंडित आहे. म्हणूनच हजारो वर्षे लोटूनही महाभारत हे नित्य समकालीनच राहिलं आहे. सृजनशील कलावंत त्याचा वर्तमान काल-परिस्थितीशी कायम अन्वय लावत आले  आहेत. महाभारतात काय नाही, असा प्रश्न पडावा इतके ते सर्वागपरिपूर्ण आहे. म्हणूनच सृजनशील मनांना त्याचे नवनवे आविष्कार नेहमी खुणावत आले आहेत. त्यातूनच अनेक महान कलाकृती जगभरात निर्माण झाल्या आहेत. पीटर ब्रुकपासून अनेकांना महाभारतानं भुरळ घातली आहे. धर्मवीर भारतींनाही त्यापासून प्रेरणा न लाभती तरच नवल. ‘अंधा युग’मध्ये महाभारतीय युद्धाच्या १८ व्या- म्हणजे अखेरच्या दिवसाचं चित्रण आहे. या युद्धात कौरव पराभूत झालेच; परंतु पांडवपक्षाचीही अपरिमित हानी झाली. विजय मिळूनही त्याचा आनंद उपभोगण्याचं त्राण पांडवांत उरलं नाही. त्यांनीही आपली मुलंबाळ, आप्तमित्र या सर्वसंहारी युद्धात गमावले. त्यांचाही शक्तिपात झाला. मग नेमकं काय साध्य केलं या युद्धानं? नैतिकतेचा विजय? पण ती तरी कुठं पाळली गेली या युद्धात? उभयपक्षी ती खुंटीला टांगण्यात आली. कर्णाचा वध करताना कृष्णानंही अर्जुनाला अधर्माचा आश्रय घ्यायला लावलं. अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला गेलेला असताना ‘नरो वा कुंजरो वा’ म्हणत युधिष्ठिरानंसुद्धा आपली नैतिकता गमावली. नीतिमत्तेचा टेंभा मिरवणारे पांडव तरी कुठं नैतिकतेनं वागले? कौरव तर बोलूनचालून सत्तांध व मदांध! त्यांच्याकडून नीतीची अपेक्षा करणंच गैर.
परंतु या भीषण युद्धाची समाप्ती झाल्यावर तरी मागे उरलेल्यांना झाल्या चुकांची उपरती झाली का? तर- नाही. धृतराष्ट्र, गांधारी, अश्वत्थामा हे कौरवांचा नाश केल्याबद्दल पांडवांच्या नावानं खडे फोडतात. त्यांना शिव्याशाप देतात. अश्वत्थामा तर गाफील पांडवांच्या गोटात जाऊन त्यांना र्निवश करण्याच्या सूडाने पेटून उठतो. सत्याची बाजू घेणाऱ्या एकमेव कौरवाचा- युयुत्सूचाही ते धिक्कार करतात. त्याला दुर्योधनाच्या अंतिम संस्कारालाही येऊ देत नाहीत. गांधारी तर कृष्णाला शापच देते : तुझ्या कुळाचाही असाच यादवी युद्धात नाश होईल. कृष्णाने मनावर घेतलं असतं तर तो हे युद्ध टाळू शकला असता असं तिचं म्हणणं असतं. परंतु त्याने पांडवांची बाजू घेऊन त्यांना युद्धासाठी प्रवृत्त केलं. धृतराष्ट्र आणि गांधारीला या महाभारतीय युद्धाचा ‘ऑंखों देखा हाल’ कथन करणाऱ्या संजयालाही तो भयावह नरसंहार पाहून आपली दिव्य दृष्टी नकोशी होते.
डॉ. धर्मवीर भारतींनी ‘अंधा युग’मध्ये युद्धात संपूर्ण विनाश होऊनही माणसं भूतकाळाकडून काही शिकत नाहीत, हे अधोरेखित केलं आहे. युद्धात सर्वाचीच अपरिमित हानी होते. मानवी मूल्यं पायदळी तुडवली जातात. त्यातून कुणाचं काहीही भलं होत नाही, हा आजवरचा अनुभव असूनही माणसं त्यातून काहीच धडा घेत नाहीत. हे अंधारं युग तसंच पुढं सुरू राहतं.. अव्याहत! हेच लेखकाला या नाटकातून दाखवायचं आहे. म्हणूनच युद्धपिपासेचा धिक्कार करणारं हे नाटक कालबाह्य़ होण्याची सुतराम शक्यता नाही.
या नाटकाचे प्रयोग पं. सत्यदेव दुबे, इब्राहिम अल्काझी ते आजवर अन्य अनेक मान्यवर दिग्दर्शकांनी सादर केले आहेत. अल्काझींनी दिल्लीत फिरोझशहा कोटला आणि ‘पुराना किला’च्या पाश्र्वभूमीवर केलेले ‘अंधा युग’चे प्रयोग संस्मरणीय झाले होते. मुंबई विद्यापीठातील अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी प्रा. मििलद इनामदार यांच्या दिग्दर्शनाखाली अलीकडेच ‘अंधा युग’चा आणखीन एक असाच अविस्मरणीय प्रयोग सादर केला. विद्यापीठ परिसरातील नैसर्गिक पाश्र्वभूमीवर खुल्या आकाशाखाली रात्रीच्या नीरव शांततेत सादर झालेला हा नाटय़प्रयोग नजरबंदी करणारा होता. मूलत:च भव्य आशय व्यक्त करणारं हे नाटक मातीच्या त्रिस्तरीय टेकाडावर, सभोवताली माड, पोफळी आणि अन्य वृक्षराजीच्या सान्निध्यात निसर्गत: उपलब्ध असलेल्या नेपथ्यावर आणि अद्भुत संगीत, पात्रांचे रेखीव आकृतिबंध, तसंच त्यांच्या चौफेर वावरानं आणि प्रकाशयोजनेतील अप्रतिम जादुगिरीनं हा प्रयोग दृक्-श्राव्य-काव्याच्या पातळीवर गेला. माडाच्या झावळ्यांवर केलेल्या प्रकाशझोताच्या प्रक्षेपणामुळे सुदर्शनचक्राच्या भासानं कृष्णाच्या अस्तित्वाचं केलेलं सूचन तर अप्रतिमच. उंचसखल विस्तीर्ण झाडझाडोरा, त्याआडचे अंधारे आडोसे आणि टेकाडापल्याडची खाई यांतून मार्गिका, राजमहालाचा परिसर, प्रत्यक्ष नगरी, दुर्योधनाने आश्रय घेतलेला डोह आदी  स्थळे प्रस्थापित केली गेली होती. कलावंतांनीही या प्रचंड अवकाशाचा उत्तम वापर केला. त्यांच्या हालचाली आणि व्यवहारांतून युद्धोत्तर हताशा, विनाश, विदीर्णता, हृदय पिळवटणारा आक्रोश सारं काही प्रतीत होत होतं. इतक्या प्रचंड मोठय़ा रंगावकाशात पात्रांना संवादफेकीचं आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं मोठंच आव्हान होतं. शैलीदार अभिनयाबरोबरच वास्तवदर्शीत्वाचाही आधार कलाकारांनी घेतला होता. अश्वत्थामाच्या भूमिकेतील कलावंताचा त्वेष, हतबलता आणि त्याचा सूडाचा प्रवास मन विषण्ण करणारा होता. गांधारीनं उपस्थित केलेले प्रश्नही केवळ मातेच्या आक्रंदनातून आलेले नव्हते, तर त्याही पलीकडे जात विश्वव्यापी समस्येकडे निर्देश करणारे होते. अर्थात या सगळ्याचा एकत्रित व समन्वयित परिणाम म्हणजे नाटकाला अपेक्षित असलेला युद्धविरोध! तो प्रत्याप्रत्यक्षरीत्या प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचविण्यात हा प्रयोग नक्कीच यशस्वी झाला. आमोद भट्ट यांच्या संगीताचा त्यात सिंहाचा वाटा होता. भूषण देसाईंच्या प्रकाशयोजनेनं प्रयोगाची भव्यता आणि त्यातलं शतश: विदीर्ण करणारं वास्तव आणखीनच गहिरं केलं. चपखल रंगभूषा व वेशभूषेच्या संयोगानं हा नेत्रदीपक खेळ उत्तरोत्तर रंगत गेला.
‘अंधा युग’चा हा प्रयोग रसिकांच्या मनीमानसी बराच काळ रेंगाळत राहील यात शंका नाही.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा