दिलीप ठाकूर
तुम्हाला यश चोप्रा दिग्दर्शित ‘मशाल’मधील ‘होली आई रे…’ हे गाणे आठवतेय का? नसेल तर युट्यूबवर बघू शकता. चाल ओळखीची वाटते? ‘जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजती’ हे ‘जैत रे जैत’चे गाणे ऐकल्यासारखे वाटतयं ना? दोन्हीचे संगीतकार एकच. अर्थात ह्रदयनाथ मंगेशकर. अगोदर ‘जैत रे जैत’ (१९७७) आला आणि त्यानंतर सात वर्षांनी म्हणजेच १९८४ साली ‘मशाल’ आला तेव्हा काहीनी म्हटलं हे एका भाषेतील चित्रपटाची चाल अगदी जशीच्या तशी दुसऱ्या भाषेतील चित्रपटासाठी वापरणे कितपत योग्य आहे? काहीनी म्हटले की, दोन्ही चित्रपटांचे स्वरूप भिन्न असेल तर मग त्यात हरकत काय? वगैरे वगैरे ह्रदयनाथ मंगेशकर यानी ‘धनवान’ (१९८१) मधील काही गाणी आपल्याच मूळ मराठी गाण्यावरील चालीतच दिली होती. पण असे असले तरी त्यांचेच ‘मशाल’मधील किशोरकुमारने गायलेले ‘जिंदगी आ रहा हू मै’ हे ओरिजिनल गाणे जास्तच भावते. याचाच अर्थ नवनिर्मिती महत्त्वाची आहे.

आता ‘सैराट’चेच ‘झिंगाट…’ मूळ ताल, ठेका, सूर इतकेच नव्हे तर प्रसंगासह हिंदीत गेल्यावर हाच मराठी गाण्याची चाल हिंदीत हा मुद्दा चर्चेत आलाय. गंमत म्हणजे अनेकांनी हिंदीतील ‘झिंगाट…’ डिसलाईक केलंय. अर्थात आता डिजिटल मिडियाचा वेगवान काळ आहे. कोणतीही गोष्ट आवडली अथवा नावडली की एका सेकंदात मत व्यक्त केले जातेय. पूर्वीसारखा चर्चेचा किस पाडला जात नाही. येथे खरं तर चित्रपटाच्या रिमेकसह दोन गाणी मराठीतून हिंदीत गेलीत. त्यामुळेच हे स्थित्यंतर काहीसे स्वाभाविक म्हणायचे काय? पण यापूर्वी पन्नास पंचावन्न वर्षांत ‘पाठलाग’वरुन ‘मेरा साया’ ते ‘माहेरची साडी’पासून ‘साजन का घर’पर्यंत अनेक मराठी चित्रपट हिंदीत रिमेक म्हणून गेले तेव्हा कुठे बरं मूळ चाली देखील हिंदीत गेल्या? तेव्हा नवनिर्मितच झालीय. अर्थात संगीतकार अजय-अतुल यानी मराठी गाणे तसेच्या तसे हिंदीत नेणे नवीन नाहीच. त्यात ते जणू सातत्य ठेवताहेत. त्यातील ‘जत्रा’मधील ‘कोंबडी पळाली…’ त्यानी हिंदीत ‘अग्निपथ’साठी ‘चिकनी चमेली’ केले तेव्हा मूळ गाण्यातील क्रांती रेडकरचे झक्कास नृत्य कायमच चांगले वाटले. कारण कैतरिना कैफने नृत्यात झणझणीतपणा येण्यासाठी जे काही झटके लटके दिले ते अशोभनीय दिसले. पण अशा माध्यमातून मराठीतील गाणेच हिंदीत नेल्याने ते देशभर, जगभर जाईल असा अजय-अतुलने केलेला दावा चुकीचाही म्हणता येणार नसला तरी संगीतात सात सूर आहेत त्याचा अधिकाधिक वापर करून नवनिर्मिती करता येईल आणि डिजिटल युगात कोणतीही भाषा, राज्य, देशाची सीमा श्रवणीय लोकप्रिय गाण्याला रोखू शकत नाही हेदेखील लक्षात असावे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

पण मराठी चित्रपटाची गाण्याची चाल हिंदीत अथवा उलट्या चालीने हिंदीतील गाणे मराठीत हे नवीन नक्कीच नाही. प्रसाद प्रॉडक्शन्सच्या ‘मिलन’ (१९६७) मधील ‘सावन का महिमा पवन करे…’ची चाल दादा कोंडके यानी दशकभराने ‘रामराम गंगाराम’ ‘मध्ये ‘अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान’ असे केले. तर आनंद शिंदेचे ‘नवीन पोपट…’ या गैरफिल्मी लोकप्रिय गाण्यावरून संगीतकार बप्पी लाहिरीने ‘पाप की दुनिया ‘साठी दिल तोता बन जाए…’ केले. त्यावर चंकी पांडे व नीलम नाचले.

दक्षिणेकडील चित्रपट हिंदीत येताना मूळ चाली हिंदीतही आल्या आणि ‘रोजा’ (संगीत ए. आर. रहमान) ची गाणी लोकप्रिय ठरलीदेखिल. आता रजनीकांत व कमल हसन यांचे काही चित्रपट तमिळ, तेलगूसह हिंदीतदेखील डब होऊन येतात त्यासह तिकडच्याच चाली(रिती) सह गाणीदेखिल येताहेत. हा याच विषयाचा आणखीन एक कोन.

पण मराठीची संस्कृतीच वेगळी…

‘सैराट’चे झिंगाट हिंदीत नाकारले गेल्यास हे इकडची चाल तिकडे या प्रकाराला कुठे तरी अटकाव होईल. मूळ गाण्याच्या जन्मात त्या चित्रपटाचा दिग्दर्शक, गीतकार, गायक व संगीतकार असा सर्वांचाच सहभाग असतो. ती पूर्णपणे नवनिर्मिती असते. अशा वेळेस खूपच सहजतेने ते गाणेच हिंदीत नेणे कितपत योग्य ठरेल? मग तो रिमेक चित्रपट असो वा नसो. काहीही असलं तरी नवीन गाण्याला जन्म देण्याची अनुभूती अधिकच सुखावणारी असते.

Story img Loader