हिंदू कायमच सहिष्णू होते आणि आहेत आम्ही त्यांच्याकडून सहिष्णुता शिकलो आहोत असं वक्तव्य ज्येष्ठ संवाद लेखक, कवी जावेद अख्तर यांनी केलं आहे. मनसेने दिवाळी निमित्त शिवाजी पार्क मैदानावर सलीम जावेद या लोकप्रिय जोडीची मुलाखत आयोजित केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही मुलाखत घेतली. त्यावेळी एका प्रश्नाला जावेद अख्तर यांनी हे उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले जावेद अख्तर?
व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यात काही प्रमाणात बदल झाले आहेत. आज आम्ही जर शोले लिहिला असता तर ज्या सीनमध्ये हेमा मालिनी शंकराच्या मंदिरात जाते आणि धर्मेंद्र मागे उभा असतो तो सीन आम्ही (सलीम जावेद) लिहिला नसता. आज तो सीन लिहिला गेला असता तर तमाशा झाला असता. संजोग नावाचा सिनेमा होता त्यात ओम प्रकाश यांनी कृष्ण सुदाम्याची गोष्ट गाण्यांतून ऐकवली होती. आज असं गाणं लिहून दाखवा. असहिष्णुता वाढली आहे हे काही चांगलं नाही. एक तुम्हाला आज सांगतो काही लोक असे होते जे असहिष्णू होते. मात्र हिंदू असे कधीच नव्हते.”
हिंदूचं हृदय विशाल आहे
हिंदूंची ही खुबी आहे की त्यांचं हृदय विशाल असतं. कायमच त्यांच्या विशाल मनाचा अनुभव आम्हीही घेतला आहे. मनाची ही विशालता कुणी संपवू पाहात असेल तर मग ते दुसरे आणि तुमच्यात काही फरक राहणार नाही. हिंदू ज्या पद्धतीने आयुष्य जगतात, मनाच्या विशाल दृष्टीकोनातून आयुष्याकडे पाहातात त्यावरुन तर आम्ही जगणं शिकलो आहे. अशा हिंदूंनी आता सहिष्णुता सोडायची का? भारतात आज तरी लोकशाही आहे पुढचं पुढे काय होतं पाहू.
आपल्या देशात लोकशाही आहे कारण..
आपल्या देशात हजारो वर्षांपासून ही परंपरा आहे की एक माणूस असाही विचार करु शकतो, तसाही विचार करु शकतो. मूर्ती पूजा केली तरीही हिंदू म्हणून समाजात वावरु शकता, मूर्ती पूजा केली नाही तरीही हिंदू म्हणून वावरु शकता. एका देवावर श्रद्धा ठेवलीत तरीही हिंदू आहात, ३३ कोटी देवांवर श्रद्धा ठेवली तरीही हिंदू आहात. कुणालाच मानलं नाही, नास्तिक असाल तरीही तुम्ही हिंदू असता. ही हिंदू संस्कृती आहे, याच संस्कृतीनेच आपल्याला लोकशाहीची देणगी दिली आहे. त्यामुळेच आपल्या देशात लोकशाही आहे. मी बरोबर आहे आणि बाकीचे चुकीचे आहेत हे हिंदूंचं काम नाही असंही जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.