राम मंदिरातल्या रामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. अयोध्येत या सोहळ्याची जय्यत तयारी होते आहे. रामाची मूर्ती गाभाऱ्यात ठेवण्यात आली आहे. एक बाळ रुपातला राम तर दुसरी रामलल्ला रुपातली मूर्ती आहे जी अरुण योगीराज यांनी घडवली आहे. या दोन्ही मूर्तींची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. हा सोहळा जवळ येऊन ठेपलेला असतानाच लेखक, पटकथा लेखक मनोज मुंतशिर यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे. हिंदू समाज खूप सहिष्णू आहे. हिंदू समाजाला शांततेचं नोबेल दिलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले आहेत मनोज मुंतशीर?
“खरं तर मला हे वाटलंच नव्हतं की रामाचं मंदिर बांधून होईल. मात्र आज राम मंदिर बांधून तयार आहे. रामलल्ला त्यामधअये विराजमान होणार आहेत. माझ्यासाठी हे सगळं स्वप्नवत आहे. तसंच हे स्वप्न असं आहे की जे संपूच नये असं वाटतं. रामाच्या मंदिरात काही तासांनीच प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. माझ्यासाठी ही स्वप्नपूर्तीच आहे.” रामाचं मंदिर होईल असं वाटलं होतं का? हे विचारलं असता त्यांनी हे उत्तर दिलं आहे. आजतक वृत्त वाहिनीच्या साहित्य तक या कार्यक्रमात मनोज मुंतशिर यांनी हे विधान केलं आहे.
रामाचा जन्म अयोध्येतच झाला हे सिद्ध करावं लागणं दुर्दैवी
मनोज पुढे म्हणाले, “आपण भारतात राहतो आणि आपल्याला हे सिद्ध करावं लागतं की रामाचा जन्म हा अयोध्येत झाला होता ही बाब म्हणजे दुर्दैवी आहे. १८८५ ते २०१९ या कालावधीत कायदेशीर लढाईच चालली ही सर्वातम मोठी वेदना होती असं माझं मत आहे. आपण मक्क्यात राम मंदिर बांधलं गेलं पाहिजे अशी मागणी तर केली नव्हती. आपण अय़ोध्येतच राम मंदिर बांधण्याची विनंती केली होती. त्यासाठी इतक्या वर्षांची कायदेशीर लढाई लढावी लागली.”
भारतीयांना शांततेचं नोबेल दिलं पाहिजे
मनोज मुंतशिर पुढे म्हणाले, जे वकील रामनवमी आणि दसऱ्याच्या दिवशी, दिवाशीच्या दिवशी सुट्टी घेत होते त्यांना पुरावा हवा होता की श्रीराम होते. ५०० वर्षे हिंदूंना आपल्या हक्कासाठी लढा द्यावा लागला. त्यासाठी रक्ताचे पाट वाहिले नाहीत. मी तुम्हाला हे कसं सांगू की हिंदू किती सहिष्णू आहेत. जर जागतिक शांततेचं नोबेल कुणाला द्यायचं असेल तर ते एका व्यक्तीला नाही तर १०० कोटी भारतीयांना दिलं गेलं पाहिजे. राम मंदिराचं आंदोलन शांततेत झालं. त्यासाठी हिंदूंना नोबेल दिलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.