Farah Khan Holi Festival Comment: बॉलिवूडची दिग्दर्शिका आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक फराह खानच्या विरोधात फौजदारी स्वरुपाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सेलिब्रिटी मास्टरशेफ या कार्यक्रमात फराह खानने होळी सणाबाबत एक विधान केले होते, या विधानावर युट्यूबर विकास पाठक ऊर्फ हिंदुस्तानी भाऊ यांनी आक्षेप घेतला असून त्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. २० फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या भागात फराह खान म्हणाल्या की, होळी हा सर्व छपरी मुलांचा आवडता सण आहे. या विधानानंतर हिंदुस्तानी भाऊने दाखल केलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.

फराह खान यांनी होळी सण आणि त्यात सहभागी होणाऱ्या लोकांचा अवमान केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. फराह खान यांच्या विधानामुळे आपल्याला दुःख झाल्याचे विकास पाठक ऊर्फ हिंदुस्तानी भाऊ यांनी म्हटले.

त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीबद्दल माहिती देताना त्यांचे वकील अली काशीफ खान देशमुख म्हणाले, “फराह खान यांनी केलेले विधान हिंदूंच्या भावना दुखावणारे आहे, असे माझ्या अशिलांचे म्हणणे आहे. होळीसारख्या पवित्र सणास सहभागी होणाऱ्यांना छपरी म्हणणे हे आक्षेपार्ह आहे. या विधानामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते.”

तक्रारीत पुढे म्हटले आहे की, श्रीमती फराह खान या बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठीत दिग्दर्शिका आहेत. त्यांनी होळी सणाबाबत केलेले विधान हे आक्षेपार्ह आणि अपमानजनक आहे. या तक्रारीच्या माध्यमातून आम्ही न्याय मागत आहोत. कायद्याच्या आधारावर आम्हाला न्याय द्यावा आणि फराह खान यांनी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हावी. भारतीय दंड संहितेच्य विविध कलमाद्वारे या विधानावर कारवाई व्हावी, असेही तक्रारीत म्हटले आहे. यानंतर फराह खान यांच्यावर विविध कलमाअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती एबीपी न्यूजने दिली आहे.

सध्या या प्रकरणी फराह खान यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र त्यांनी केलेल्या विधानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या विधानावर टीका केली आहे.

Story img Loader