एखाद्या चित्रपटामध्ये ऐतिहासिक कथानक साकारायचे म्हणजे पडद्यावर तो काळ जसाच्या तसा उभारणे गरजेचे असते. त्यात अगदी त्या काळातील शहरे, वास्तू हुबेहूब साकारणे हे मोठे आव्हान असते. पण त्यासोबतच व्यक्तिरेखांची वेशभूषाही त्या काळाला अनुसरून करणे हे तो काळ जिवंत करण्यासाठी आवश्यक असते. या वर्षी बॉलिवूड चित्रपटांमध्ये एक दोन नाही तर तब्बल पाच विविध काळांतील कथानके पडद्यावर जिवंत होणार आहेत. त्यानिमित्त मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृतीपासून ते थेट अलीकडच्या ६० च्या दशकापर्यंतचा माणसाच्या पेहरावाचा पट पडद्यावर उलगडणार आहे.
प्रत्येक सिनेमामध्ये कथानकाप्रमाणे व्यक्तिरेखांच्या वेशभूषेचा विचार करण्यात येतो. पण ऐतिहासिक चित्रपट साकारताना व्यक्तिरेखेसोबतच ते कथानक ज्या काळात घडते आहे, त्या काळाचे चित्रणही पडद्यावर हुबेहूब साकारणे महत्त्वाचे आहे. २०१५ मध्ये अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटामध्ये १९६० च्या मुंबईचा काळ साकारला जाणार आहे, तर दिबाकर बॅनर्जी यांच्या ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’मध्ये १९४० च्या काळातील ‘कलकत्ता’ शहराची झलक दिसणार आहे. विभू पुरी यांच्या ‘हवाईजादे’ आणि संजय लीला भन्साळी याच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटांमधून अनुक्रमे एकोणिसावे आणि सतरावे शतक पडद्यावर अवतरणार आहे, तर आशुतोष गोवारीकर ‘मोहेंजोदडो’ या चित्रपटामधून प्रेक्षकांना थेट हजारो वर्षांपूर्वीच्या सिंधु संस्कृतीमध्ये घेऊन जाणार आहे.
सिंधु-हडप्पा संस्कृती मानवी पेहरावाची पहिली पायरी मानली जाते. त्या काळातील साडी, धोतर नेसण्याच्या विशिष्ट पद्धती, लाकडाचे, पितळ, तांबे यांसारख्या धातूंपासून बनवलेले विशिष्ट प्रकारचे दागिने, कोंदण करण्याची पद्धती याचे चित्रण ‘मोहेंजोदडो’ या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. पंधराव्या शतकापासून भारतामध्ये आलेल्या विविध राजघराण्यांनी प्रत्येक प्रांतागणिक विशिष्ट प्रकारच्या पेहरावाची पद्धती रुजवली. इतिहासातील १८ वे शतक पेशव्यांनी आपल्या शौर्याने गाजवले होते. पण त्या काळातील खास मराठमोळ्या नऊवारी साडय़ा, कोल्हापुरी साज, लक्ष्मीहार असे अस्सल दागिने यांसाठीही तो काळ ओळखला जातो. तसेच त्या काळात भारतावर एकहाती राज्य करणाऱ्या मुघलांनी त्यांची अनारकली आणि चुडीदार, शरारा अशी पेहराव संस्कृतीसुद्धा भारतात बऱ्यापैकी रुजवली होती. खास मोगलाई पद्धतीच्या दागिन्यांचे भारतीय बाजारपेठेमध्ये आगमनही याच काळात झाले. मराठे आणि मुघलांच्या पेहरावातील ही जुगलबंदी ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.
या चित्रपटातील पेशवा बाजीरावच्या वेशातील रणवीर सिंग आणि काशीबाईच्या भूमिकेतील प्रियांका चोप्रा यांची अस्सल मराठमोळ्या ‘लूक’मधील छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर गाजत आहेत. तसेच राईट्स बंधूंनी विमानाचा शोध लावण्याआधीच एकोणिसाव्या शतकात मराठमोळे शास्त्रज्ञ शिवकर बापूजी तळपदे यांनी मुंबईत विमान उडवल्याची कथा सांगितली जाते.
त्यांची जीवनकथा आयुषमान खुराणा पडद्यावर साकारणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ब्रिटिशांच्या अधिपत्याखालीचा भारत आणि त्याकाळातील लोकांचे जीवन पडद्यावर पाहता येणार आहे. विसाव्या शतकातील परस्पर भिन्न दोन काळ ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ आणि ‘बॉम्बे वेल्वेट’ या दोन चित्रपटांमध्ये अवतरणार आहेत.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील साधी, सरळ राहणी आणि दुसऱ्या बाजूला साठाव्या शतकातील चित्रपट आणि संगीतामध्ये मश्गुल माया नगरी मुंबईची रंगीत दुनिया अशा दोन काळाचे चित्रण या दोन्ही चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे. साठच्या दशकात बॉलिवूडच्या प्रभावामुळे कपडय़ांमध्ये महत्त्वाचे बदल दिसून आले होते. पाश्चात्त्य पद्धतीचे सूट, जॅकेट, गाऊन्स हे भारतीय लोकांच्या जीवनाचा भाग बनले. हा संपूर्ण काळ ‘बॉम्बे वेल्वेट’मध्ये उभारला जाणार आहे. म्हणूनच अगदी कपडय़ांच्या जन्मापासून ते त्यांच्या आताच्या स्वरूपापर्यंतचे पेहरावात झालेले विविध बदल या वर्षी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
चित्रपटांमधून मानवी पेहरावाचा पट उलगडणार
एखाद्या चित्रपटामध्ये ऐतिहासिक कथानक साकारायचे म्हणजे पडद्यावर तो काळ जसाच्या तसा उभारणे गरजेचे असते.
First published on: 09-01-2015 at 12:57 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Historical costumes in indian cinema