रेश्मा राईकवार
शिवकालीन इतिहास नव्या पिढीला कदाचित तपशिलात माहिती नसेल, पण किमान दोन ते तीन पिढय़ा अशा आहेत ज्यांना तो मुखोद्गत आहे. शिवाजी महाराजांच्या मोहिमा, त्यांनी जिंकलेले गडकिल्ले, आग्र्याहून सुटका – अफझलखानाचा वध, महाराजांचा राज्याभिषेक अशा महाराजांच्या आयुष्यातील कितीतरी महत्त्वाच्या घटना आपल्याला माहिती आहेत. आपण त्याबद्दल अभ्यास म्हणून कधीतरी कथा-कादंबरी म्हणून वाचलेलं आहे. आणि गेल्या काही वर्षांत दूरचित्रवाहिनीवरील मालिकांमधूनही या कथा सविस्तरपणे अनेकांनी पाहिलेल्या आहेत. या सगळय़ा पार्श्वभूमीवर शिवकालीन इतिहास रंगवताना तो प्रेक्षकांना आवडायला हवा, परिचयाचा असला तरी त्यातलं नावीन्य, अर्थ त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं हे आव्हान लेखक – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्यावर होतं. ‘सुभेदार’ पाहताना त्यांनी ते यथोचित पेललं आहे याची जाणीव होते.
दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवराज अष्टक’ श्रृंखलेतील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’ हा नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा आहे. तान्हाजी मालुसरेंनी आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं म्हणत कोंढाणा जिंकण्यासाठी उचललेला विडा, प्राणांतिक युद्ध करत उदयभानाला दिलेली मात आणि तान्हाजी धारातीर्थी पडल्यानंतर ‘गड आला पण सिंह गेला’ हे शिवाजी महाराजांचे इतिहासात अमर झालेले उद्गार.. हे आपल्याला माहिती आहे. हाच इतिहास भव्यदिव्य रूपात आपण चित्रपटातूनही पाहिलेला आहे. तरीही दिग्पाल लांजेकर यांचा ‘सुभेदार’ यापलीकडे जाऊन अनेक गोष्टी दाखवतो, जाणवून देतो. ऐतिहासिक चित्रपट करताना कायम महत्त्वाचे प्रसंग, टप्पे, संदर्भ यांची माहिती अनेकदा इतिहास संशोधक, बखरी यांच्यातून मिळते. मात्र कथारूपात असलेले हे प्रसंग दाखवताना त्यांच्या तोंडचे संवाद, या घटनांदरम्यान शिवाजी महाराज, जिजाऊ, महाराजांचे सरदार यांच्यामध्ये नेमकं काय घडलं, काय संवाद झाला? या कित्येक गोष्टी कल्पकतेच्या आधारेच रंगवाव्या लागतात. दिग्दर्शकीय स्वातंत्र्य कुठे आणि कसं घ्यावं याची इथेच नेमकी कसोटी लागते. तान्हाजी मालूसरेंनी गाजवलेला पराक्रम आणि मुळातच शिवाजी महाराजांचे आयुष्य, त्यांच्या मोहिमा, त्यांच्या मावळय़ांच्या कथा या नाटय़पूर्ण आहेत. पराक्रम, शौर्य, त्याग, संयम, अभ्यास, युद्धकुशलता, रणनीती, डावपेच या सगळय़ा गोष्टी इथे पानापानांवर आहेत. त्यासाठी नसलेल्या गोष्टी वा नाटय़ घुसडून त्याला रोमांचक करण्याची गरज नसते. तो थरार मूळ त्या घटनांमध्येच आहे, याचं भान राखत आपल्याला यातून नेमकं काय सांगायचं आहे याची योग्य जाण असेल तर ती पडद्यावरही अचूक उतरते, याची प्रचीती लांजेकर यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने दिग्दर्शित केलेला ‘सुभेदार’ पाहताना येते.
इतिहासातील मुख्य घटना सांगताना त्याच्या पुढचे-मागचे संदर्भ असलेले टप्पे, घटना जोडणं, त्यातल्या सगळय़ा मुख्य व्यक्तिरेखा आणि उपघटनांचे दुवे सांधणं तितकंच आवश्यक आहे. चित्रपटाची सुरुवातच कोंढाणा जिंकण्याची गरज महाराजांना का भासली? याच्या सविस्तर चित्रणापासून होते. जयसिंगराजेंना तहात दिलेले २३ किल्ले, आग्ऱ्याहून सुटका आणि त्याआधी थकल्या डोळय़ांनी महाराजांची वाट पाहाणाऱ्या खंबीर जिजाऊंची भावावस्था या घटनांपासून चित्रपट सुरू होतो. स्वराज्याच्या इतिहासात प्रत्येक लहानसहान घटक सहाय्यभूत ठरला होता याची जाणीव इथे दिग्दर्शकाने जना गराडिणीच्या कथेतून करून दिली आहे. गडकिल्ल्यांची रचना कशी असावी, बाहेरचा शत्रू आत येऊन प्रजेला त्रास देऊ नये यासाठी कोट कसे सुरक्षित हवेत याचं व्यवहारी ज्ञान महाराजांना नकळतपणे जना देऊन जाते. मोहीम आखताना मानसिकरित्या शत्रूला हतबल करण्यासाठी महाराजांनी केलेले प्रयत्न, त्याकाळची सामाजिक परिस्थिती, गडकिल्ल्यांची भौगोलिक माहिती, कुठल्या मार्गाचा वापर करावा यासाठी भौगौलिक स्थितीबरोबरच हवामान, दिवस-रात्र, पौर्णिमा-अमावास्या अशा कित्येक बारीकसारीक गोष्टींचा विचार कसा केला जात होता हे सगळे संदर्भ दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी कथेच्या ओघातच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहेत. इतिहास म्हणजे फक्त युद्धाचा थरार नव्हे तर या अशा अनेक माहिती, संदर्भ, भावनिक प्रसंगांची उकल करून देत प्रेक्षकांनाही कथेत सहभागी करून घेण्याचं तंत्र दिग्पाल लांजेकर यांनी प्रभावीपणे चित्रपटात वापरलं आहे. त्यामुळे तान्हाजी मालूसरेंच्या पराक्रमाची कथा सांगताना अनेक इतर घटना, व्यक्तिरेखा, त्यांच्या उपकथांचा समावेश करूनही चित्रपट मुख्य कथेपासून ढळतो आहे अशी किंचितही जाणीव आपल्याला होत नाही.
तान्हाजींचं स्वराज्यात येण्यापासून ते त्यांचे महाराज आणि जिजाऊंबरोबरचे दृढ होत गेलेले भावनिक बंध, सरदार ते सुभेदार हा लौकिक मिळवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आणि सुभेदार म्हणून त्यांच्या पराक्रमाने अजरामर झालेली कोंढाण्याची जीत या साऱ्या गोष्टी अभ्यासपूर्ण आणि रंजक पद्धतीने दिग्दर्शकाने सादर केल्या आहेत. कोंढाणा मोहिमेतही केवळ तान्हाजींच्या शौर्याचीच कथा अतुलनीय ठरावी म्हणून इतिहासातील प्रसंगांची मोडतोड करण्याचा खोडसाळपणाही दिग्दर्शकाने केलेला नाही. त्या त्या घटनेत सूर्याजी, शेलार मामा यांचे योगदान यासंबंधी दिग्दर्शकीय स्वातंत्र्य घेऊनही त्या योग्य पद्धतीने आल्या आहेत. अर्थात, इतक्या सगळ्या प्रसंगांची साखळी मांडायची त्यामुळे चित्रपटाची लांबी अंमळ अधिक वाढते. पण चित्रपटातील कलाकारांची निवड, संयमित पद्धतीने केलेली पात्ररचना या सगळय़ामुळे चित्रपट कुठेही अतिरंजित वाटत नाही. काही प्रसंग निश्चितच टाळता आले असते. चित्रपट श्रृंखला असल्याने शिवाजी महाराज म्हणून चिन्मय मांडलेकर, जिजाऊंच्या भूमिकेत मृणाल देव, बहिर्जीच्या भूमिकेत खुद्द दिग्दर्शक, मृण्मयी देशपांडे या अशा भूमिका आधीच प्रेक्षकांच्या मनात ठसलेल्या आहेत. अजय पूरकर यांनी याआधीच्या चित्रपटात विविध भूमिका केल्या असल्या तरी इथे तान्हाजींच्या भूमिकेतील विविध कंगोरे, त्यासाठी त्यांची रंगभूषा, वेशभूषा, देहबोली या सगळय़ा गोष्टी उत्तम जमून आल्या आहेत. उदयभानाच्या भूमिकेतील अभिनेता दिग्विजय रोहिदासही लक्ष वेधून घेतो. अगदी छोटय़ा छोटय़ा भूमिकांमधील कलाकारांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. त्यामुळे काही कच्चे दुवे बाजूला ठेवले तर उत्तम पटकथा, दिग्दर्शन, छायाचित्रण, संगीत, अभिनय आणि अभ्यासपूर्ण मांडणीसह पडद्यावर उतरलेला ‘सुभेदार’ खचितच आनंद देऊन जातो.
‘सुभेदार’
दिग्दर्शक – दिग्पाल लांजेकर
कलाकार – चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, स्मिता शेवाळे, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र, विराजस कुलकर्णी, अलका कुबल, राजदत्त, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे.